ठाण्यात कोविड लसीकरणावर संक्रांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

Covid 19 Vaccine_1 &
 
 

ठाणे मनपाच्या आरोग्य विभागाचा सावळागोंधळ 

 
ठाणे : ठाणे महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या सज्जतेचा ‘ड्राय रन’ शुक्रवार, दि. ८ जानेवारी रोजी पार पडल्यानंतर आठवड्याभरात मकर संक्रांतीच्या दि. १४ जानेवारीच्या मुहूर्तावर लसीकरण सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय फोल ठरला आहे. लसीकरणाच्या या निर्णयाला ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी खोडून काढल्याने मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर चांगलेच तोंडघशी पडले आहेत. यापूर्वीही ‘ड्राय रन’च्या तारखेबाबत घिसडघाईत निर्णय घेतल्याने या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ना घुमजाव करावे लागले होते. त्यामुळे एकीकडे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ समोर आला असताना दुसरीकडे ठामपा प्रशासन कोरोनाबाबत गंभीर नसल्याची चर्चा रंगली आहे.
 
ठाणे महापालिका क्षेत्रात मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच दि. १४ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती शुकवार, दि. ८ जानेवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित असलेले महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनीही याबाबतची सविस्तर माहिती सदस्यांना दिली होती. मात्र, आयुक्तांनी लसीकरणाबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट केल्याने आरोग्य विभागाचा हा दावा फोल ठरला आहे. त्यातच, एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम दि. १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केल्याने ठाणे महापालिकेच्या दि. १४ जानेवारीच्या लसीकरणावर संक्रांत ओढवली आहे.
 
यापूर्वीदेखील ‘ड्राय रन’बाबत चुकीची माहिती माध्यमांना दिल्याने डॉ. मुरूडकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तेव्हा, लसीकरणाआधीच आरोग्य विभागाचा सावळागोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान,केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या मान्यतेने देशभरात दि. १६ जानेवारीपासून लसीकरणाचा मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने तयार केलेली ऑक्सफर्डची ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसी आपत्कालीन वापरासाठी देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 

आरोग्य अधिकाऱ्यांना झापले
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये कोरोना लसीकरण करण्यासाठी ‘ड्राय रन’ मोहीम शुक्रवार, दि. ८ जानेवारी रोजी राबवण्यात आली.ठाणे महापालिकेनेही त्याचदिवशी घोडबंदर रोडवरील रोझा गार्डानिया आरोग्य केंद्रावर ‘ड्राय रन’ मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी, ठामपा आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांनी वेळेत उपस्थित राहून कर्तव्य बजावले. मात्र, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याने याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सदस्यांनी सर्वांसमक्ष शिष्टाचार न पाळल्याचा ठपका ठेवून धारेवर धरल्याने डॉ.मुरूडकरांचे चांगलेच हसे झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@