अभिनय ते शेती : यशदायी प्रवास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2020   
Total Views |


Amod Dev_1  H x


अभिनय ते यशस्वी कृषी उद्योजक म्हणून आमोद देव यांचा प्रवास विचारांना चालना देणारा आहे. वेगळ्या वाटेवरचा हा त्यांचा प्रवास समाजाला एक नवा मार्ग निश्चितच दाखवतो. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख…


बारामतीच्या पिपंनी गावात एक यशस्वी शेतकरी म्हणून आमोद देव सुप्रसिद्ध आहेत. शेती करून उज्ज्वल भविष्य निर्माण करता येते, हा बोध त्यांनी कृतीतून दिला. ते स्वत: एक कृषी उद्योजक तर आहेतच, पण त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक छोट्या-मोठ्या शेतकर्‍यांनीही शेतीमध्ये चांगला जम बसवला आहे. आमोद यांची वडिलोपार्जित शेतजमीन असली तरी ते शेतीकडे अगदी अपघाताने वळले. मुळात आमोद यांना तर अभिनेता व्हायचे होते. त्यासाठी नकळत्या वयापासून त्यांनी कितीतरी स्वप्ने पाहिली होती.

बारामतीच्या गणेश आणि शिला देव यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक आमोद. दोघेही पापभिरू. वडील एका खासगी कंपनीत नोकरी करायचे तर आई गृहिणी. संयुक्त कुटुंब. गणेश देव हे कुटुंबवत्सल आणि अभिनयामध्ये त्यांना रूची होती. छोट्या-मोठ्या नाटकांत ते कामही करायचे. पण, नोकरीमुळे त्यांना कधी नाटकात पूर्ण वेळ देता आला नाही. आमोद यांना अभिनयाच्या गोडीचा वारसा वडिलांकडूनच लाभला. वडिलांचे नाट्यप्रेम आमोद यांना माहिती होते. एकदा सोबत आमोद एका नाटकाला गेले. तिथे एका नाटक कंपनीचा निर्माता आणि काही लोक होते. गणेश काही कामासाठी तेथून बाजूला झाले. आमोद मात्र तिथेच होते. त्यावेळी नवीन नाटकाचा विषय निघाला. या नाटकामध्ये गणेश यांना मुख्य भूमिका देऊ, असे कुणीतरी म्हणाले. यावर तो निर्माता तुच्छतेने म्हणाला, “गावातली व्यक्ती आहे. तो नाही करू शकणार.” शेवटी त्या नाटकातली ती भूमिका काही आमोदच्या वडिलांना मिळालीच नाहीच. पण, ते शब्द आमोद कधीही विसरले नाहीत. त्यानंतर आपण अभिनय क्षेत्रात जायचेच, असे त्यांनी ठरवले. याचवेळी घरात आई आणि वडील आमोदवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी कसोशीने प्रयत्न करीत. तसेच लहान वयात आमोद रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. संघ संस्काराने त्यांच्यात समाजनिष्ठा जागृत झाली. हे संस्कार आमोद विसरले नाहीत. पुढे महाविद्यालयात शिकत असताना राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत आमोद यांना पारितोषिकही मिळाले. त्यावेळी त्यांना ‘ती’ व्यक्तीही तिथे दिसली, जी काही वर्षांपूर्वी आमोदच्या वडिलांबद्दल म्हणाली होती की, “तो गावातला आहे, तो नाही भूमिका करू शकणार.”आमोद त्या व्यक्तीकडे गेले आणि त्याला सांगितले की, ते गणेश यांचे सुपुत्र असून बारामतीच्या पिपंनी गावचे आहेत. त्या व्यक्तीने आमोदकडे पाहिले आणि ते पाहतच राहिले. असो.

 

पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमोद यांनी दिल्ली येथे अभिनयाचे शिक्षण घेण्याचे ठरवले. पण, अभिनयाचे शिक्षण घेऊन पुढे त्या क्षेत्रात काम मिळणे, त्यातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, या गोष्टी जर-तरच्या होत्या. आमोद यांनी या सार्‍या गोष्टींचा विचार केला. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची. वडील एक-दोन वर्षांत निवृत्त होणार होते. आमोद यांना घरची जबाबदारी सांभाळावी लागणारच होती. त्यामुळे आमोद यांनी मुंबईला ‘नेस्ले’ कंपनीमध्ये नोकरी पत्करली. मुंबईतले धकाधकीचे जीवन त्यांना नकोसे वाटले. पण मनात होते की, मुंबईमध्ये अभिनयाची संधी मिळेल. मुंबईमध्ये नोकरी करून ते अभिनयाची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, त्यांची बदली कंपनीतून बारामतीला झाली. तेथून पुन्हा ‘मदर डेअरी’मध्ये काम करण्यासाठी मुंबईला आले. पुढे मुंबईच्या गौरी शिकारखाने यांच्यांशी आमोद यांचा विवाह झाला. सगळे सुरळीत होते. अभिनय क्षेत्रातही त्यांना कामही मिळू लागले होते. पण, गावी आईला अपघात झाला, वडीलही गंभीर आजारी पडले. घरी आई-वडील आणि वयोवृद्ध आजी. मग काय, आमोद आणि गौरी यांनी मुंबईचा निरोप घेतला. दोघेही गावी आले. आई-वडिलांसोबत राहू लागले. पण, इथे येऊन करायचे काय? यावर आमोद यांचे वडील यांना म्हणाले, “आपली जमीन आहे. सर्जनशील माणूस सृजनशीलच असतो. शेती तुला साथ देईल. जमीन आपली आई आहे.” ते एक वर्ष आमोद दररोज शेतावर जायचे. त्यावर्षी पूर्ण मेहनतीने त्यांनी शेतीही केली, पण पहिल्या वर्षी म्हणावे तितके यश आले नाही. पण, दुसर्‍या वर्षी चांगले यश आले. त्यांची दुसरी एक शेतजमीन होती. तिथे विहीर होती. त्या विहिराला भरपूर गोड पाणी होते. पण, ते वापरात नव्हते. आमोद यांनी प्रशासनाला सांगितले की, लोकांच्या वापरासाठी ते विहिरीचे पाणी देऊ इच्छितात. लोकांच्या भल्यासाठी त्यांनी हे काम केले होते. गावात एका कंपनीलाही पाणी हवे होते, त्या कंपनीसोबत आमोद यांनी करार केला. आता विहिरीच्या पाण्यातूनही आर्थिक उत्पन्न मिळू लागले. हळूहळू आमोद यांची आर्थिक स्थिती बरीच सुधारली. आमोद यांची ही अशी आगळीवेगळी यशाची कहाणी...!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@