किल्ले भिवगड : शिवकालीन अस्तित्वाची साक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2020
Total Views |

Bhivgad_1  H x


कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर गौरकामत हे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला एक छोटीशी टेकडी आहे. ज्यावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज आहे, हाच तो ‘भिवगड उर्फ भीमगड’! ज्याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्ग हा विषय महाराष्ट्राच्या अतीव जिव्हाळ्याचा! दख्खनच्या पठारावर साधारणतः ८०० ते ८५० दुर्ग आहेत, ज्यातील जवळपास ५०० ते ५५० दुर्ग एकट्या महाराष्ट्रात आणि त्यातही विशेष करून ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या दुर्गांची संख्या जवळपास ३०० ते ३५० आहे. साहजिकच आपल्या सभोवती असलेल्या डोंगररांगांवर नजर फिरवल्यास त्यात एखादा तरी गिरिदुर्ग आपल्याला हमखास दिसतोच. दुर्गांचे बांधकाम सर्वप्रथम कोणत्या काळात झाले, हा जरी अभ्यासाचा आणि चर्चेचा मुद्दा असला तरी आज उपलब्ध असलेल्या साधनांपैकी दुर्गांचे प्रथम लिखित उल्लेख आपल्याला ‘ऋग्वेदा’पर्यंत मागे नेतात. दुर्गांना विशेष महत्त्व छत्रपती शिवरायांमुळेच प्राप्त झाले हे मात्र हमखास! हुकूमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य ‘आज्ञापत्र’ ग्रंथात लिहितात, “औरंगजेबासारिखा महाशत्रू चालोन येऊन विजापूर भागानगरासारखी महास्थाने आक्रमिली. संपूर्ण तीस, बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यासी अतिशय केला त्याचे यत्नास असाध्य काय होते. परंतु, राज्यात किल्ले होते म्हणोन अवशिष्ट तरी राज्य राहिले.” या एका वाक्यावरून शिवकाळातील दुर्गांचे महत्त्व अधोरेखित होते. छत्रपती शिवरायांची राज्यपद्धतीच दुर्गकेंद्रित होती, त्यामुळे सतराव्या शतकाचा उत्तरार्ध दुर्गांच्या इतिहासातील सुवर्णकाळच म्हणावा लागेल. चला तर मग अधिक जाणून घेऊया, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणार्‍या भिवगड या प्राचीन दुर्गाबद्दल!


इतिहास अभ्यासकांच्या मते, भिवगड किल्ल्याला काही विशेष इतिहास नाही किंवा कोणत्याही महत्त्वाच्या ऐतिहासिक साधनांत भिवगडाचा नामोल्लेखही सापडत नाही. परंतु, त्यांच्या या विधानांना एक अपवाद आहे व त्याला आजपर्यंत माझ्या मते तरी कोणीही अधोरेखित केलेले नाही. कृष्णाजी अनंत सभासद लिखित ‘सभासद बखरीमध्ये’ छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणार्‍या सर्व किल्ल्यांची यादी देण्यात आली आहे. याच यादीमध्ये, ‘नवे राजियांनी गड वसविले त्यांची नांवनिशीवार सुमारी सुमार १११.’ या मथळ्याखाली १११ किल्ल्यांच्या नावांची यादी आहे. ज्यामध्ये क्रमांक २३वर भिवगड (भीमगड) असा स्पष्ट उल्लेख आढळतो. हा उल्लेख म्हणजे कर्जत तालुक्यातील भिवगड याच किल्ल्याचा आहे. पण, मग खरंच हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला असावा का? की, येथे त्याही आधीपासून गडाचे स्वरूप असावे? भिवगडावर पुरातत्त्वीय उत्खनन केल्यास या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला मिळू शकतील.


Bhivgad_3  H x


भिवगड किल्ल्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता, तो कर्जत तालुक्यात पूर्वेकडे भीमाशंकर डोंगररांग आणि पश्चिमेकडे उल्हासनदी यांच्या दरम्यान आहे. भीमाशंकर डोंगररांगेतील मांजरसुंभा डोंगररांगेच्या खाली अर्धा फोडलेला लाडू ठेवावा, अगदी त्याप्रमाणे भिवगडाची टेकडी दिसते. पूर्वेकडे असणार्‍या या सह्याद्रीच्या पर्वतरांगेची उंची भिवगडापेक्षा साधारणतः दुप्पट आहे. गडाचा विस्तार हा उत्तर-दक्षिण असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८०० फूट इतकी आहे, तसेच गडमाथ्याचा विस्तार हा जवळपास चार एकर इतका आहे. भिवगडावरून भोवताली नजर फिरवली असता आपल्याला अनेक गिरिदुर्ग पाहता येतात. ज्यात ईशान्येला सिद्धगड, तर पश्चिमेला कर्नाळा, इर्शाळगड, सोंडाई आणि पेब उर्फ बिकटगड हे किल्ले पाहता येतात. भिवगडावर जाण्यासाठी सद्यःस्थितीत दोन वाटा उपलब्ध आहेत. मुख्य वाट गौरकामत गावातूनच आहे. परंतु, अलीकडे असणार्‍या वदप गावातून ढाक-बहिरीकडे जाणारी वाट आहे, याच वाटेवरून काही अंतर चालल्यास दोन फाटे फुटतात. ज्यातील उजव्या हाताची वाट ढाक-बहिरीकडे, तर डाव्या हाताची वाट किल्ले भिवगडावर जाते. गडाखालून दोन व्यापारी वाटा जातात, ज्यातील पहिली वदप गावातून ढाक-बहिरीकडे जाणारी ‘गाळदेवीची किंवा बहिरीची वाट’ तर दुसरी ‘खांडशीची वाट’ आहे. या दोन्ही वाटांमधील खांडशीची वाट सध्या वापरात नाही व भिवगड हा याच वाटांच्या संरक्षणासाठी आजही येथे त्याच आविर्भावात पाय रोवून उभा आहे.


गौरकामत गावातून जाणारी वाट ही भिवगडाच्या टेकडीचीच गावाकडे उतरलेली सोंड आहे. यावरून मार्गक्रमण करून वरती गेल्यास अर्ध्या उंचीवर आपल्याला पाण्याचे मोठे टाके दिसते. टाके टेकडीच्या पोटात खोदलेले असून त्याच्या द्वारामध्येच दरड कोसळल्यामुळे ते अर्धे अधिक गाडले गेले आहे. टाक्यात बराच गाळ साचला असून त्यातही उन्ह्याळ्यात काही प्रमाणात पाणी असते. येथेच अगदी काही पावलांवर गडाचे मुख्य आकर्षण व प्राचीनत्वाची साक्ष असणार्‍या कातळात खोदलेल्या दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या दोन टप्प्यांमध्ये असल्यामुळे पहिला टप्पा चढून वर गेले की, थोडे उजवीकडे वळून पायर्‍यांच्या पुढच्या टप्प्यावर जावे लागते. दोन्ही टप्प्यांमधील थांब्यातून थोडे वरती गेल्यास आपल्याला दोन प्राचीन विहार दिसतात. त्यातील पहिला विहार धान्याचे कोठार असून त्याच्या द्वाराशेजारीच एक वाघ मारणार्‍या शिकारीचे दगडी टाक स्वरूपात शिल्पसुद्धा ठेवले आहे.

या शिल्पातील वीराने त्याच्या एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल पकडली आहे. या टप्प्यापासून आणखी थोडे वरती जाण्यासाठी दगडात कोरलेल्या छोट्या पावठ्या वापरून आपण दुसर्‍या विहारापर्यंत पोहोचू शकतो. हा विहार म्हणजेच गडावर जाणारा मुख्य मार्ग व त्यासमोरील भागात होणार्‍या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीची चौकी आहे. हे पाहून खालती आल्यास आपण पायर्‍यांच्या दुसर्‍या टप्प्याच्या सुरुवातीला पोहोचतो. ज्यांमधील सुरुवातीच्या काही पायर्‍या काळाच्या ओघात कोसळलेल्या दरडीमुळे पूर्ण फुटून गेल्या आहेत. पायर्‍यांचा हा टप्पा अर्ध्या अंतरावर काटकोनात वळल्यामुळे येथून पुढच्या सर्व पायर्‍या आजही सुस्थितीत आहेत. पायर्‍यांच्या या दुसर्‍या टप्प्यामुळे गडाच्या मुख्यद्वाराकडे पोहोचण्यासाठी एक खिंडच तयार झाली आहे, ज्याचा योग्य वापर करून कोणत्याही शत्रूला नामोहरम करता येऊ शकते. पायर्‍या चढून वर आलो की, आपण गडाच्या मुख्यद्वाराजवळ पोहोचतो. आज येथे द्वाराचे कोणतेही अवशेष शिल्लक नसून फक्त पायर्‍या तेवढ्या शिल्लक आहेत. या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंस भक्कम दगडी तटबंदी आहे. या द्वाराला लागून असलेल्या तटबंदीपैकी पूर्वेकडील जी थोडी तटबंदी आज शिल्लक आहे ती पाहिल्यास आपल्याला लोहगडावरील तटबंदीची आठवण येते. या तटबंदीचे दोन दगडी चिरे एकमेकांना जोडण्यासाठी त्यात खाच करून धातूची पट्टी बसवण्यासाठीची व्यवस्था आहे. सध्या काळाच्या ओघात नजरेस दिसणार्‍या तटबंदीच्या भागात तरी अशी धातू पट्टी आपल्याला दिसत नाही.



Bhivgad_1  H x


प्रवेशद्वारापासून पुढे सरळ गेल्यास आपल्याला गडाच्या पूर्व उतारावर खोदलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते. हे टाके ‘खांब टाके’ असून सध्या मातीच्या गाळाने व झुडपांनी भरले आहे, तर प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळल्यास आपण गड माथ्यावर पोहोचतो. परंतु, या दोन्हींच्या मध्ये आणखी एक विलक्षण असे पाण्याचे टाके पाहायला मिळते. विलक्षण अशासाठी की, या टाक्याचा खूप कमी भाग आपण पाहू शकतो, उर्वरित भाग हा संपूर्णपणे गडाच्या पोटात आहे. टाक्याच्या वरच्या भागात एक छोटेसे देवकोष्ट असून टाक्यात संपूर्ण वर्षभर तुडुंब पाणी भरलेले असते. त्याच्या समोर एक छोटे कुंड असून टाक्यातील पाणी त्या कुंडात येण्याची आणि जास्तीचे पाणी कुंडातून पुढे वाहून नेण्यासाठी कोरीव दगडी पन्हाळीची व्यवस्था आहे. पाण्याच्या टाक्यासमोर असणार्‍या अशा कुंडाला ‘अर्चना’, ‘अमृत’ अथवा ‘संकल्प कुंड’ असे संबोधले जाते. या कुंडाच्या भोवताली दोन बाजूंना मिळून दगडात छोटी-छोटी आठ शिवलिंग कोरली आहेत. आहे ना, विलक्षण!

येथून दक्षिणेकडे पसरलेल्या मुख्य गडमाथ्याकडे जाण्याआधी उत्तरेकडे खाली नजर फिरवल्यास आपल्याला तेथे असणारा मोठा खंदक पाहता येतो. हाच खंदक भिवगडाला गावापर्यंत पसरलेल्या सोंडेपासून वेगळा करतो. खंदकाच्या वरच्या भागात असलेल्या ध्वजाजवळ खडकात आपल्याला काही खळगे दिसतात, त्यामुळे येथे एखादे लाकडी मेटं असण्याची जाणीव होते. येथून दक्षिणेकडे गेल्यास आपण मुख्य गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर आपल्याला वास्तूंची दोन जोती पाहायला मिळतात. त्यापैकी पश्चिमेकडे असणार्‍या जोत्याला लागूनच दोन पाण्याची टाकी आहेत. ज्यातील एक टाके फार उथळ व छोटे असून दुसरे तुलनेने मोठे व खोल आहे. या मोठ्या टाक्यात संबंध वर्षभर पाणी असते. या दोन्ही टाक्यांतून एक पन्हाळ कोरून ती गडाच्या पश्चिम उताराकडे सोडण्यात आली आहे. टाक्याच्या भोवती असणार्‍या खळग्यांपैकी एका खळग्याचा वापर करून सध्या ध्वज लावण्यात आला आहे. येथून अगदी काही पावलांच्या अंतरावर भिवगडाच्या बालेकिल्ल्याचे आकाराने आयताकृती असलेले एक मोठे जोते आहे. याच जोत्यावर आकाराने चौरसाकृती असलेले आणखी एका वास्तूचे जोते आपल्याला पाहता येते.


Bhivgad_2  H x

बालेकिल्ल्याच्या जोत्याच्या पायथ्याला लागूनच उत्तर दिशेस एक मोठे पाण्याचे टाके आहे. या टाक्यात फक्त पावसाळी दिवसांतच पाणी आढळते. जोत्यावरून खाली उतरून आणखी पुढे गेल्यास आपल्याला भिवगडाचा दक्षिणेकडचा शेवटचा भाग असलेला दक्षिण बुरूज पाहता येतो. आज येथे बुरुजाचे जे अवशेष शिल्लक आहेत ते मातीत गाढल्या गेलेल्या अवस्थेत आहेत. काही संवर्धन करणार्‍या संस्थांनी दगडी तटबंदीवर साचलेला मातीचा गाळ बाजूला केल्याने ही वास्तू आज आपल्याला पाहता येते. येथून खाली पाहिल्यास आपल्याला दक्षिण दिशेचा खंदक पाहता येतो. हा खंदक उत्तरेकडच्या खंदकापेक्षा आकाराने व विस्ताराने बराच मोठा आहे. अलीकडे दरड कोसळल्याने खंदकाचा मधला भाग पूर्णपणे मातीच्या गाळाने भरून गेला आहे. पण, यामुळेच तर आपल्याला वदप गावातून येणार्‍या वाटेने भिवगडावर जाता येते; अन्यथा त्याकाळात या बाजूने भिवगडावर जाणे अशक्यच होते. खंदक खोदताना त्यावर केलेले छिन्नी-हातोडीचे घाव आजही पाहता येतात. हुकूमतपन्हा रामचंद्रपंत आमात्यकृत ‘आज्ञापत्र’ या ग्रंथात आठव्या प्रकरणात ‘दुर्ग’ या विषयाचा संपूर्ण ऊहापोह केला आहे. यात दुर्गावरील पाण्याच्या व्यवस्थेबद्दल एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे ते असे की, ‘गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा.’ भिवगडाच्या बाबतीत हे वाक्य अगदी चपखल बसते. जलव्यवस्थापन चोख राखण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मिळून एकूण १२ पाण्याची टाकी भिवगडावर आहेत. गडाच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर पाण्याच्या टाक्यांची मुख्य व्यवस्था आहे. त्यातही गडाची पूर्व बाजू ही अधिक पाण्याच्या टाक्या असणारी आहे. गडाच्या पूर्व उतारावर असणार्‍या एकूण पाच टाक्यांपैकी दोन टाकी ‘खांब टाके’ या प्रकारातली आहेत, तर पश्चिम उतारावर एकूण तीन पाण्याची टाकी आहेत.

यातील पश्चिम उतारावरील एक टाके गडावरील इतर पाणी साठवण्याच्या टाक्यांपेक्षा फार विस्मयकारक आहे. टाक्याच्या भिंती उतरत्या असून, एका भिंतीवर रानडुकराच्या शिकारीचे आकर्षक व रेखीव शिल्प आहे. हे टाके गडाच्या तीव्र उतारावर असून आजही येथे जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग उपलब्ध नाही. शिल्पामध्ये हातात भाल्याप्रमाणे तीक्ष्ण हत्यार घेतलेल्या एका वीराची प्रतिमा आणि त्यासमोर हत्यार उगारणार्‍या वीरावर चाल करून जाणार्‍या रानडुकराची प्रतिमा कोरली आहे. शिल्पाच्या खाली तीन आणि टाक्याच्या दक्षिणेच्या भिंतीवर एक, असे मिळून एकूण चार ठिकाणी सांकेतिक रेघांचे संच आढळतात. कदाचित, ते प्रत्येक हंगामात झालेल्या रानडुकरांच्या शिकारीच्या संख्येचे आकडे दर्शविले असावे, असे वाटते. हे शिल्प पाहून आपल्याला कोकण भागात दसर्‍याला होणार्‍या रानडुकरांच्या शिकारीच्या सणाची आठवण येते. हे टाके पाहून मनात विचार येतो की, ते फक्त पाण्याच्या साठवणुकीसाठी बनवलेले नसून गरज पडल्यास याचा वापर शिकारीचा सापळा म्हणूनही करता येत असे. अशा तर्‍हेने गडाचा पूर्व उतार, माथा आणि पश्चिम उतार मिळून एकूण १२ पाण्याची टाकी, दोन खंदक, ध्वज, दोन वास्तूंची जोती, दोन शिल्प, दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तटबंदीचे अवशेष, कातळात खोदलेल्या पायर्‍यांचे दोन टप्पे, बालेकिल्ल्याचे एक जोते, एक बुरूज, प्रवेशद्वाराच्या पायर्‍या, एक अर्चना कुंड, दोन विहार इतके अवशेष शिल्लक आहेत. फक्त सध्या गरज आहे याच स्थितीत त्यांची काळजी घेण्याची आणि त्यासाठीच हा लेख प्रपंच!


- ओंकार महाडिक
@@AUTHORINFO_V1@@