संकटग्रस्त 'तणमोर' पक्ष्याला लावले 'सॅटलाईट टॅग'; जगातील पहिलाच प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

Lesser Florican_1 &n

गुजरात वन विभागाचा पुढाकार; 'दी काॅर्बेट फाऊंडेशन'चे तांत्रिक सहाय्य 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केवळ भारतातील काही राज्यांमध्ये अधिवास असलेल्या संकटग्रस्त तणमोर ( Lesser Florican) पक्ष्याला 'सॅटलाईट टॅग' लावून त्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. गुजरात वन विभागाच्या पुढाकाराने भावनगरमधील 'ब्लॅकबक राष्ट्रीय उद्याना'त हा प्रयोग करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन तणमोरांना टॅग लावण्यात आला असून यामाध्यामातून त्यांचे स्थलांतर आणि विणीव्यक्तिरिक्त त्यांच्या इतर अधिवास क्षेत्रांचा मागोवा घेतला जाईल.
 
 

Lesser Florican_1 &n
 
 
देशात गवताळ प्रदेशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे या प्रदेशांमध्ये अधिवास करणारे 'बस्टर्ड' प्रजातीचे पक्षी संकटात सापडले आहेत. 'बस्टर्ड' जातीमधील एकूण चार प्रजाती भारतामध्ये आढळतात. यामध्ये माळढोक, तणमोर, बंगाल फ्लाॅरिकन आणि भारतात केवळ हिवाळ्यात स्थलांतर करणाऱ्या मॅकविन्स बस्टर्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. त्यातही तणमोर हा पक्षी भारतासाठी प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच केवळ भारतामध्ये त्याचा अधिवास असून 'बस्टर्ड' जातीमधील तो आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. तीन वर्षांपूर्वी भारतीय वन्यजीव संस्थान, दी काॅर्बेट फाऊंडेशन आणि बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती भारतात केवळ ७०० तणमोर अस्तित्त्वात असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे अशा संकटग्रस्त तणमोराच्या अभ्यासाकरिता आता गुजरात वन विभागाने त्यांना 'सॅटलाईट टॅग' लावले आहेत.
 

 
 
'ब्लॅकबक राष्ट्रीय उद्याना'त विणीसाठी आलेल्या एक नर आणि मादी तणमोर पक्ष्याला ४ सप्टेंबर रोजी हे टॅग लावण्यात आले. या प्रकल्पामध्ये गुजरात वन विभागाला 'दी काॅर्बेट फाऊंडेशन'ने तांत्रिक सहाय्य पुरवले आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन्ही पक्ष्यांना साधारण २.३० ग्रॅमचे टॅग लावण्यात आले असून ते सौरउर्जेवर चालणारे असल्याची माहिती 'दी काॅर्बेट फाऊंडेशन'चे संचालक केदार गोरे यांनी दिली. हे पक्षी विणीसाठी स्थलांतर करत असल्याने त्यांच्या विणीच्या जागांची नोंद आपल्याकडे आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त त्यांच्या इतर अधिवास क्षेत्रांची माहिती आपल्याकडे नाही. या 'सॅटलाईट टॅगिंग' प्रकल्पामुळे आपल्याला तणमोरांच्या विणीव्यतिरिक्त इतर जागांचा मागोवा घेऊन या जागांच्या संवर्धनाकरिता प्रयत्न करता येतील. शिवाय या पक्ष्यांच्या स्थलांतराविषयीही माहिती मिळेल, असे गोरे यांनी सांगितले. सध्या टॅग केलेले दोन्ही तणमोर हे भावनगरमध्येच असून लवकरच ते स्थलांतर करण्यास सुरुवात करतील. तणमोर पक्ष्याचा जुलै ते आॅगस्ट हा पावसाळी हंगाम विणीचा कालावधी आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात हे पक्षी आढळतात. 
 
 

@@AUTHORINFO_V1@@