प्रत्येक दिन सत्कार्याचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
RSS_3  H x W: 0
 


रक्तदान शिबीर
‘दोशी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ‘बोरिवली रक्तपेढी’ला बोरिवली महानगरपालिका रुग्णालयातील ४० थॅलेसेमियाबाधित मुलांच्या उपचारासाठी रक्ताची तातडीने आवश्यकता असल्याने कृष्णा महाडिक (समाजसेवक व नाना पालकर सेवा समिती व्यवस्थापक) यांच्या पुढाकाराने, गोरेगावतील रा. स्व. संघ,जनकल्याण समिती आणि राजहंस प्रतिष्ठान या दोन संस्थांनी एकत्र येऊन नुकतेच गोरेगाव जिमखाना येथे रक्तदान शिबीर आयोजित केले. योगायोगाने २६ जुलै हा कारगिल विजय दिन! २१ वर्षांपूर्वी भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या वीर जवानांनी रक्त सांडले आणि आज गोरेगावकरांनी कोरोनाच्या संकटकाळातही रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 
‘सोशल डिस्टन्सिंग’चे योग्य पालन व्हावे आणि रक्तदात्यांचा वेळ वाया जाऊ नये, याकरिता २३ ते २५ जुलै या काळात ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा केली होती. यामुळे एक दिवस आधीच रक्तदात्यांना अपॉईंटमेंट देऊन त्यांच्या वेळेची निश्चिती करण्यात आली. योग्य सूचना आणि माहिती रजिस्ट्रेशनच्या वेळी घेतलेली असल्यामुळे प्रत्यक्ष रक्तदानाचा कार्यक्रम शिस्तीत आणि वेळेत पार पडला. ९ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी कृष्णा महाडिक, जयप्रकाश नगर संघचालक रत्नाकर गावस्कर व राजहंस प्रतिष्ठानचे सुहास कबरे यांच्या हस्ते झाले.
 
 

RSS_2  H x W: 0 
नंतर बोरिवली रक्तपेढीच्या आलेल्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले व रक्तदानास सुरुवात झाली. रक्तदान यशस्वी होण्यासाठी अजित वर्तक, नरेंद्र फणसाळकर, ऋषिकेश गोखले, वीणा सामंत यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमास डॉ. अश्विन सामंत, वनराई पोलीस स्थानकाच्या इन्स्पेक्टर राणी पुरी, जनकल्याण समितीचे विभाग स्तरावरील कार्यकर्ते मनोज चालिकवार आणि अरविंद शिंदे अशा मान्यवर व्यक्तींनी भेट दिली.चार तासांत ८५ गोरेगावकारांनी रक्तदान केले. यात सर्व वयोगटातील महिला व पुरुष संमिलित झाले होते. १८ वयवर्षाच्या स्टेफनी डिमेलो हिने पहिल्यांदाच रक्तदान केले आणि त्यादिवशी सर्वात लहान वय असलेल्या रक्तदात्याचा मान मिळवला. रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रकाबरोबर ‘आर्सेनिक अल्बम’ या रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या औषधाची भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
 
 
 

Arey Forest _1   

फ्रेंडशिप डे - ‘फ्रेंडशिप विथ आरे’ - ‘ग्रो आरे’ -


या लॉकडाऊनमध्ये बरेच आंबे खाल्ले, पण बाठी कचर्‍यात न टाकता काही छतबागेत तर काही सोसायटीच्या झाडाच्या बुंध्यात नेऊन ठेवल्या. पाऊस सुरू झाल्यावर सगळ्यांची छान रोपे तयार झाली आणि मनात विचार आला की, आता ही ‘आरे’ मध्ये लावली पाहिजेत. योगायोगाने माझा संपर्क गोरेगावतील ‘शंखनाद’ ग्रुपच्या अरविंद सुतार (संपर्क ९८२११७१६७७) यांच्याशी आला.
 

‘शंखनाद’ ग्रुप आनंद टोपले (गुरुजी संपर्क ९८९२१५९४३३) यांनी स्थापन केला. दररोज सकाळी ८.१० ते ८.३० वाजता ते पु. ल. देशपांडे उद्यानात शंख वाजवण्याचा सराव घेतात. रविवारी सकाळी ७ ते ९ वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. त्यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी वृक्षारोपणासाठी २ ऑगस्ट हा ‘फ्रेंडशिप डे’ निवडला.
 
 
आदल्या दिवशीच मी आंब्याची ३० रोपे खोक्यात भरली. सोबत सोसायटी परिसरातील पानफुटी, अबोली, कण्हेरी, बेल, अशोक, पिंपळ व वडाची रोपे/फांद्या घेतल्या. ‘शंखनाद’ ग्रुपमधील मित्रांनीही त्यांच्याकडील रोपे घेतली. सकाळी ७ वाजता ठरल्याप्रमाणे ‘आरे’ चेकनाक्याला भेटलो. मी दिंडोशी येथील माझा मित्र समीर करमरकर याच्याकडून कुदळ, फावडे, घमेले अशी सगळी साधनसामग्री घेतली व आम्ही थेट ‘आरे’मधील शासकीय विश्रामगृह गाठले.
 
 
विश्रामगृहाच्या जवळच्या रोडच्या बाजूला सकाळी ७.३० ला लागवडीला सुरुवात केली ते जवळपास ९.३० पर्यंत. एवढे श्रमदान झाल्यावर पोटात कावळे ओरडत होते. आनंद टोपले यांनी घरून बटाटा-पोहे, मिरचीचे लोणचे, चहा व कॉफी असा झकास नाश्ता करून आणला होता. ‘शंखनाद’ ग्रुपची नियमित प्रार्थना व मंत्र म्हणून आम्ही न्याहारीवर तुटून पडलो. तिथून गोरेगावचा सुंदर हेलिकॉफ्टर व्ह्यू टिपला आणि मग आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला.
 
 
योगायोगाने पवईहून दर रविवारी ‘आरे’ कॉलनीत येणार्‍या नार्वेकर यांची भेट नाश्ता करता करता झाली.‘शंखनाद’ ग्रुपमधील दीपक रामाणे, विजय कुंभार, जयेश पुरंदरे, प्रकाश शिर्के व संदीप कराळे हे मित्र आजच्या वृक्षारोपणात सहभागी झाले होते. समारोप अरविंद यांनी दिलेल्या ‘अमूल’च्या नवीनच आलेल्या ‘पुदिना चाकलेह’ (चॉकलेटसाठी संस्कृतशब्द) ने झाला. ‘फ्रेंडशिप डे’ आज अनोख्या पद्धतीने साजरा झाला आणि ‘फ्रेंडशिप विथ आरे बाय ग्रोईंग आरे’ याची मुहूर्तमेढ रोवली.
 
 
- अजित वर्तक, ८०९७७९६०७०
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@