चर्चा तर झालीच पाहिजे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
Sachin Tendulkar and Tim



कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्व थंडावले असताना इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज टीम ब्रेसननने खळबळजनक आरोप करत पुन्हा एकदा वातावरण तापवले. टीम ब्रेसननने आरोप केले की, भारताचा मास्टर-ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर याला पंचांनी एकदा चुकीचे पायचीत ठरवल्यानंतर काही जणांकडून माझ्यासह अनेकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ब्रेसननच्या या आरोपांनंतर क्रिकेट विश्वात विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. सचिन हा ‘क्रिकेटचा देव’ मानला जातो. क्रिकेटच्या खेळाचा ‘मास्टर-ब्लास्टर’ म्हणवल्या जाणार्‍या सचिनसारख्या बड्या खेळाडूला पंचांनी चुकीचे बाद ठरवल्यामुळे आपल्याला थेट जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा बागुलबुवा करत ब्रेसननने क्रिकेट विश्वातील वातावरण ढवळून काढले. टीम ब्रेसनन ज्या प्रकाराचा बागुलबुवा करत आहे, तो प्रकार 2011 साली म्हणजेच जवळपास नऊ वर्षांपूर्वी घडलेला आहे. त्यामुळे नऊ वर्षांनंतर या प्रकाराला वाचा फोडत टीम ब्रेसननला नक्की साध्य तरी काय करायचे आहे, हा प्रश्न उरतोच. क्रिकेट समीक्षकांनी या प्रश्नाला वाचा फोडत ब्रेसननचे हे वागणे अगदी मूर्खपणाचे ठरवले आहे. समीक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे, टीम ब्रेसननला जीवे मारण्याच्या धमक्या ज्यावेळी आल्या होत्या. त्याचवेळी त्याने या प्रकाराला वाचा का फोडली नाही? आता नऊ वर्षांनंतर या प्रकाराबाबत गौप्यस्फोट करून ब्रेसननला आता नेमके काय साध्य करायचे आहे? टीम ब्रेसननला धमक्या नेमक्या कुठल्या प्रकारे यायच्या, त्यात काय म्हटलेले असायचे असा, काहीही खुलासा त्याने केलेला नाही. तसेच कुणाविरोधात अद्याप त्याने तक्रारही केलेली नाही. मग ब्रेसननचे हे म्हणणे कितपत खरे मानायचे? ब्रेसननने यावेळी पंचांचे नावदेखील घेतले. मात्र, पंचांनी याबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ब्रेसननचे म्हणणे कितपत गांभीर्याने घ्यावे, हादेखील प्रश्न उपस्थित होतो. खराब कामगिरीमुळे टीम ब्रेसनन सध्या इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघाबाहेर आहे. फॉर्म नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिले जात नाही. आंतरराष्ट्रीय संघात स्थान नसल्यामुळे आपल्या नावाची कुणी चर्चाही करत नाही. मात्र, सचिनसारख्या महान फलंदाजाबाबत वल्गना का होईना, भाष्य केले की, चर्चेत येणारच हे माहीत असल्याने ब्रेसननने नऊ वर्षांनंतर का होईना, हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

खोड कायमची मोडायला हवी!

सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूबाबत भाष्य केल्यानंतर आपली चर्चा होणारच, असा काहीसा ठाम विश्वास काही गोलंदाजांना त्यावेळीही होता आणि आजही आहे. इंग्लंडचा माजी जलदगती गोलंदाज टीम ब्रेसननने यावेळी नेमके तेच केले. वर्षानुवर्षे हेच होत आले आहे आणि यापुढेही हे असेच होत राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत याबाबत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हे असेच होत राहणार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याबाबत जोवर ठोस नियमावली बनवत नाही, तोवर यांची खोड काही मोडणार नाही. सचिनसारख्या महान फलंदाजावर थेट उठसूठ आरोप करणारा टीम ब्रेसनन काही पहिला-वहिला गोलंदाज नाही. यापूर्वी अशा अनेक गोलंदाजांनी सचिनला चिथावण्याचा प्रकार केला आहे. हे असे प्रकार करणार्‍यांची एक भली मोठी यादीच असून यात अनेक देशांच्या खेळाडूंची नावे आहेत. वयाच्या 16व्या वर्षी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केल्यानंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वसीम अकरम याने त्याला सर्वात आधी डिवचण्याचा प्रयत्न केला होता. सचिनने त्याला शाब्दिक उत्तर देण्याऐवजी आपल्या खेळीतूनच सडेतोड प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननेही तोच कित्ता गिरवला. विश्वचषक सामन्याआधी सचिनला बाद करणे हेच एकमेव आपल्या जीवनाचे स्वप्न असल्याचे बोलून दाखवले. मात्र, त्याही वेळी सचिनने तोंडातून एकही शब्द न काढता शेन वॉर्नसह ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांंची अशी धुलाई केली की, शेन वॉर्नला स्वप्नातही सचिन दिसू लागला. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ शोएब अख्तरनेही विश्वचषक सामन्याआधी अशाचप्रकारे सचिनची विकेट घेण्याच्या सिंहगर्जना केल्या. मात्र, प्रत्यक्षात ज्यावेळी मैदानावर सामना झाला, त्यावेळी एकामागोमाग एक तडाखे हाणत सचिनने पाकिस्तानी गोलंदाजांची दाणादाण उडवली. सचिनला आव्हान देणार्‍या यांपैकी अनेक खेळाडूंचे क्रिकेट करिअर अवघ्या कही वर्षांतच संपुष्टातआले. मात्र, 24 वर्षे करिअर घडविणारा सचिन आजतागायत एकमेव खेळाडू असून आजपर्यंत कुणीही त्याच्या विक्रमाची बरोबरीकरण्यापर्यंत देखील जवळपास पोहोचलेले नाही. क्रिकेट पूर्वीप्रमाणे आजही सुरु आहे. मात्र, सचिनसारखा शांतचित्ती खेळाडू या जगतात नाही. त्यामुळेच अनेकदा खेळादरम्यान वादाचे प्रसंग उद्भवत असून हाणामारीपर्यंत प्रकरणे पोहोचत आहेत. हे टाळण्यासाठी आयसीसीने एखादी नियमावली आणण्याची गरज निर्माण झाल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.

-  रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@