संकटातील वरदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2020   
Total Views |

corona fight maharashtra_



कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्‍यात संकटाची परवा न करता मदतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा आहे.

महाराष्ट्राच्या मागे संकटांची मालिका लागलेली आहे. कोरोना व्हायरसचे संकट झेलत असतानाच आता सर्व किनारपट्टी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. मराठी भाषेत ‘अस्मानी-सुलतानी’ हा एक वाक्प्रचार आहे. त्यात थोडा बदल करुन ‘अस्मानी-करोनी’ संकट उभे राहिले आहे. रोगराईमुळे लोक आधीच भयभीत आहेत. त्यांच्या भीतीत चक्रीवादळाने भर घातली आहे. कोरोना संकट वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक उपायांनी आटोक्यात आणण्याचा महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांत अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत, असे जाणकारांचे मत आहे. पण, त्यावर आता टीकाटीप्पणी करण्याची वेळ नाही. चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठीही जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या उपाययोजना शासनाने केल्या आहेत.


ही दोन्ही संकटे अकस्मात आलेली आहेत. ही संकटे आपली सत्वपरीक्षा करीत आहेत. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार म्हणत असत की, संकटे उगीचच येत नाहीत, ती आपली परीक्षा करतात. या परीक्षेत आपल्याला उतरावे लागते. संकटात धीर सोडून चालत नाही, साहस आणि धैर्याने त्याचा मुकाबला करावा लागतो. संकटांना आपल्यावर स्वार होऊ देण्याऐवजी आपण त्यांच्यावर स्वार व्हावे लागते. प्रचंड मनोधैर्याने त्यांचा मुकाबला करावा लागतो. संकटांशी लढण्याची महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात बारा वर्षांचा दुष्काळ पडला होता. एका बाजूने मुघल सरदार आणि दुसर्‍या बाजूने सुलतानी सरदार, जनतेवर अत्याचाराचा कळस करीत होते. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘मारुन मुटकून मुसलमान करणे’ अशा लाखो हिंदूंना मुसलमान करण्यात आले. रामदास स्वामी यांचे वर्णन करताना म्हणतात, ‘किती गुज्रणी ब्राह्मणी भ्रष्टविला। किती शांमुखी जहाजी फाकविल्या। किती सुंदरा हाल होऊनी मेल्या।’ माता-भगिनींच्या हालाला काही पारावार राहिला नाही. आपण आता काही जगत नाही, देवाचा प्रकोप आपल्यावर झाला आहे. परमेश्वराने अवतार घेतल्याशिवाय आपले काही खरे नाही, अशी लोकभावना झाली होती.


अशा भीषण परिस्थितीत महाराष्ट्र धर्म जागविण्याचे काम संतमंडळींनी केले. यात संत तुकाराम आणि संत रामदास यांचे कार्य अतुलनीय आहे. तुकाराम महाराज म्हणाले, आमचे काम धर्मरक्षणाचे आहे. नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचे आहे. ‘दया तिचे नाव, भूतांचे पाळन आणिक निर्दालन कटकांचे’ आमची सर्व वटवट धर्म रक्षणासाठी चालली आहे. या भीषण परिस्थितीत रामदास स्वामींनी मंत्र दिला, ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ तुळजाभवानीची प्रार्थना करताना रामदास स्वामी म्हणतात, ‘दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकिले। परंतु रोकडे मूळ सामर्थ्य दाखवी।’ आणि नंतर भवानीमातेला म्हणतात, ‘तुझा तू वाढवी राजा शीर्घ आम्हासी देखता।’ हा राजा म्हणजे शिवाजी. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी घेरलेल्या महाराष्ट्रात महाराजांनी चैतन्याची लाट निर्माण केली. आपण सर्व संकटांशी लढू शकतो, त्यांच्यावर मात करु शकतो, ताठ मानेने जगू शकतो, स्वाभिमानाने आपल्याच राज्यात हिंडू-फिरु शकतो, असे आत्मबळ निर्माण केले. अस्मानी संकटाशीदेखील ते लढत राहिले. ‘माघार जन्मात ना ठाऊकी, होऊ देत आघात सतत, होऊ देत आघात’ ही ओळ कशी जगायची, याचा आदर्श म्हणजे शिवाजी महाराज होत.


आपण या परंपरेचे पाईक आहोत. त्याचे कदापि विस्मरण होता कामा नये. या संकटसमयी आपण आपली अस्मिता विसरता कामा नये. ’मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा’, ’मी या वर्गाचा, मी त्या वर्गाचा’, ’मी या भाषेचा, मी त्या भाषेचा’, या सर्व भावना बाजूला ठेवून, ’मी मराठी, मी महाराष्ट्राचा, मी भारतीय, मी भारताचा’ एवढी एकच भावना मनात ठेवली पाहिजे. विवेकानंद सांगत की, विस्तार हेच जीवन आहे, संकुचितता हे पाप आहे. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. संकटाशी मुकाबला करताना एकजूट करावी लागते. अत्यंत विषारी सापालादेखील इटुकल्या पिटुकल्या मुंग्या हजारोंच्या संख्येने मुकाबला करुन मारुन टाकतात. संघटित मधमाशा त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांना ठार करुन टाकतात. संघटनेचे बळ असे असते. आपण एकदिलाने उभे राहिलो, तर कोणतेही संकट आपल्याला हरवू शकत नाही. संघटित राहणे ही मानवजातीची महाशक्ती आहे.

दुसर्‍या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी पुढच्या पन्नास वर्षांत उभे राहतील तरी का, असे जगाला वाटले. अणुबॉम्बने जपानच्या दोन शहरांची राखरांगोळी झाली. जर्मनीचीदेखील उद्ध्वस्त झाले. परंतु, दहा-पंधरा वर्षांतच हे दोन्ही देश पूर्वीच्या वैभवाने उभे राहिले. जपानने तर व्यापारात अमेरिकेशीच प्रतिस्पर्धा सुरू केली. संकटावर मात करून उभे राहण्याचे तीन गुण त्यांच्याकडे आहेत. १. पराकोटीचे राष्ट्रप्रेम २. चिकाटी, धैर्य, साहस आणि वाटेल ते परिश्रम करण्याची मानसिकता ३. जबरदस्त अनुशासन. दहा डोकी, दहा प्रकारचा विचार करतात, पण ही दहा डोकी जेव्हा शिस्तीत राहतात, त्याच्या अनुशासनाखाली राहतात, तेव्हा त्या दहांची शक्ती लाखपट होते आणि जेव्हा दहा डोकी दहा दिशांनी चालू लागतात, तेव्हा त्यांचा नाश होतो. समाजरचनेचा हा शाश्वत नियम आहे. या संकटसमयी आपल्याला एकजुटीनेच राहायला पाहिजे. राजकीय मतभेद, जातीय वादंग, धार्मिक कलह याचे ’कली’ आपल्यात शिरणार नाहीत, याची दक्षता घ्यायला पाहिजे. आपल्या सर्वांची प्रबळ प्रेरणा जगण्याची म्हणजे जीवंत राहण्याची आहे. सजीव प्राण्यांची ही मूलभूत प्रेरणा असते. प्राणीजगतात आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी लक्ष देतो. मनुष्य जीवनात अशा प्रकारचा पशुव्यवहार करणारे लोक असतात, पण ते अल्पसंख्य असतात. त्यांचे अनुकरण कोणी करीत नाही. जसे मला जगायचे आहे, तसेच दुसर्‍यालाही जगायचे आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. म्हणून कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या साथीत स्वत:चा जीव धोक्यात घालून लाखो तरुण रस्त्यावर उतरतात. वादळवार्‍यात संकटाची परवा न करता मदतीला जातात, हीच मानवता आहे आणि हाच मानवधर्म आहे. या संकटसमयी केवळ त्याचेच पालन आपल्याकडून व्हावे, अशीच परमेश्वराची इच्छा आहे.


व्यक्तिगत जीवनात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. व्यक्तिगत जीवनातील असे प्रसंग व्यक्तिगत कसोटीचे असतात. ते ज्याचे त्याला लढावे लागतात. समूहावर जेव्हा संकटे येतात, तेव्हा त्या संकटाशी एकेकट्याने लढून चालत नाही. एक एकटा माणूस लढूदेखील शकत नाही. एकटा माणूस कोरोनापुढे दुर्बळ आहे, चक्रीवादळापुढे दुर्बळ आहे. पण, समूहरुपाने तो सशक्त आहे. आपल्याकडे विराट समाजपुरुषाची संकल्पना मांडली गेली आहे. हजारो डोकी आणि हजारो हात-पाय असलेला एक समाजपुरुष आहे. पंडित दीनदयाळजींनी त्याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. त्या समाजपुरुषाच्या आत्मतत्त्वाला त्यांनी ’चिती’ असे म्हटले आणि त्या समाजपुरुषाच्या आत्मशक्तीला ‘विराट’असे म्हटले. या विराटाच्या साहाय्याने आपल्याला संकटाशी लढायचे आहे. आपल्याला निर्णायक विजय प्राप्त करायचा आहे. तो तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा समाजपुरुषाच्या ‘चिती’चा आणि ‘विराटा’चा संकल्प असेल. जेव्हा पवित्र कार्यासाठी आपण एकत्र येतो आणि ते कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ‘संकल्प’ म्हणतात. सात्त्विक गुणांनीच संकल्पसिद्धी होते. ही जी संकटे आलेली आहेत, ती उगाच आलेली नाहीत. ती आमचा ‘विराट’ जागविण्यासाठी आलेली आहेत. ती आमची संकल्पसिद्धी जागी करण्यासाठी आलेली आहेत. ती आम्हाला मानवधर्माकडे घेऊन जाण्यासाठी आलेली आहेत. त्या संकटांवर मात करून, त्यात लपलेले वरदान प्राप्त करण्याचा संकल्प हीच या क्षणाची सर्वात मोठी गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@