कोरोना संकटानंतर मालवण सागरी अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्राबाबत जनसुनावणी

    10-Jun-2020
Total Views | 129

malvan _1  H x  

 
 
 

जनसुनावणी घेण्याची स्थानिकांची मागणी

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जनसुनावणी घेऊनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सागरी अभयारण्याचे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र (ईएसए) ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. संवेदनशील क्षेत्राबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीची मंगळवारी आॅनलाईन बैठक पार पडली. यावेळी अभयारण्याच्या क्षेत्रात सुरू असलेली मासेमारी आणि पर्यटनाला धक्का न लावता स्थानिकांची बाजू ऐकूणच 'ईएसए' क्षेत्र ठरवावे, अशी मागणी समितीमधील स्थानिक प्रतिनिधींनी केली. यावर कोरोनाच्या संकटानंतर परिस्थिती पूर्वपदावर येताच जनसुनावणी घेणार असल्याचे कांदळवन कक्षाने (मॅंग्रोव्ह सेल) सांगितले आहे.
 
 
 
 
राज्याच्या किनारी क्षेत्रात दोन सागरी संरक्षित क्षेत्र आहेत. ज्यामध्ये मालवण सागरी अभयारण्य आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश होतो. या दोन्ही संरक्षित क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह सेल'ची आहे. १९८७ साली मालवण सागरी परिक्षेत्राला सागरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या सागरी अभयारण्याचे एकूण परिक्षेत्र २९.१२ चौ.किमी आहे. तर साधारण २५.९५ चौ.किमीचे कवच (बफर) क्षेत्र आहे. अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात (कोअर) सिंधुुुदुर्ग आणि पद्मगड किल्ल्यांचा समावेश होतो. मात्र, या सागरी अभयारण्याच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभयरण्यापासून १० किमीचे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित होऊ शकते. ज्याचा फटका स्थानिक मच्छीमार आणि पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराला बसेल. त्यामुळे संवेदनशील क्षेत्राबाबत निर्णय घेण्यासाठी 'मॅंग्रोव्ह सेल'च्या उपवनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्थानिक सरपंच आणि पर्यावरण अभ्यासकांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी या समितीची आॅनलाईन बैठक पार पडली. यावेळी स्थानिक सरपंचांनी जनसुनावणी घेतल्याशिवाय संवेदनशील क्षेत्र घोषित करु नका, अशी मागणी केली.
 
 
 
मालवण सागरी अभयारण्याच्या क्षेत्रात मालवण, वायरी आणि तारकर्ली या गावांचा समावेश होतो. यामधील आॅनलाईन बैठकीत वायरीचे संरपंच घनश्याम ढोके यांनी जनसुनावणी घेण्याची मागणी केली. अभयारण्याच्या क्षेत्रात पारंपारिक मासेमारी केली जाते. शिवाय मालवण बंदरातील यांत्रिक बोटींचा जाण्या-येण्याचा मार्ग अभयारण्याच्या कोअर क्षेत्रामधून जातो. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक तरुणांनी स्कुबा डायव्हिंग, सागरी साहसी खेळ, नौकाविहार सारखे पर्यटनावर आधारित व्यवसाय सुरु केले होते. त्यामुळे मासेमारी व पर्यटन या स्थानिकांच्या रोजगाराच्या सांधनावर बंधने न लावता संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची मागणी ढोके यांनी केली. तसेच या प्रकल्पाची माहिती मराठीतून उपलब्ध करुन जनसुनावणी घेऊनच संवेदनशील क्षेत्राबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. याविषयी आम्ही 'मॅंग्रोव्ह सेल'च्या उपवनसंरक्षक निनू सोमराज यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संवेदनशील क्षेत्राचा आराखडा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केल्यानंतर त्यावर हरकती व सूचना नोंदविण्याकरिता ५० दिवसांचा कालावधी देण्यात येतो. मात्र, स्थानिकांच्या मागणीचा विचार करता केंद्राला हा आरखडा सादर करण्यापूर्वी आम्ही जनसुनावणी घेणार आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही जनसुनावणी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121