जुन्नरमध्ये आढळले गव्यांचे मृत शरीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |
gaur _1  H x W:


कड्यावरुन पडल्याने दोन नर गव्यांचा मृत्यू

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जुन्नरमधील अडोशी गावात शुक्रवारी रात्री दोन गव्याचे मृत शरीर आढळून आले. डोंगराच्या उंच कड्यावरुन घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने म्हणणे आहे. दोन्ही गव्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा गव्यांचा वावर सह्याद्रीच्या उत्तरेकडील भागांमध्ये वाढत असल्याचे उघड झाले आहे.
 
 

gaur_1  H x W:  
 
 
सह्याद्री डोंगररांगांमधील गव्यांचे स्थलांतर हा आता अभ्यासाचा विषय बनला आहे. याच कारण म्हणजे सह्याद्रीच्या उत्तरेकडील भागात गव्यांचा वाढणारा वावर. शुक्रवारी रात्री जुन्नर वनपरिक्षेत्रातील अजानवेल बीटमधील अडोशी गावामध्ये दोन नर गव्यांचे मृत शरीर आढळून आले. स्थानिकांनी माहिती ही वन विभागाला दिल्यावर वनाधिकाऱ्यांनी आज सकाळी जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दोन वेगवेगळ्या वयातील नर गव्यांचे शरीर ताब्यात घेतले. या दोन्ही गव्यांवर विषबाधा झाल्याचे अंदाज सर्वप्रथम वर्तवण्यात आला होता. मात्र, डोंगराच्या उच्च कड्यावरुन पडल्याने त्यांच्या शरीराअंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे या दोन्ही गव्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनामधून उघड झाले आहे.
 
 

gaur_1  H x W:  
 
 
या भागात २०१७ साली देखील गव्यांचा वावर आढळून आल्याची माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. भीमाशंकर अभयारण्याच्या पट्ट्यामधून हे गवे याठिकाणी आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु, यानिमित्ताने उत्तर सह्याद्रीमधील गव्यांचा वाढत वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. काही महिन्यांपूर्वी रायगडच्या फणसाड अभयारण्यातही गव्यांचा अधिवास असल्याचे समोर आले होते. जुन्नरमधील या घटनेच्या निमित्ताने गव्यांच्या पाऊलखुणा सह्याद्रीच्या उत्तर भागांमध्ये विस्तारत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@