सत्कर्माची जेथे प्रचिती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020   
Total Views |


manas_1  H x W:

 



प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक विचार जागृत ठेवणारे आणि त्याद्वारे आयुष्याचे संचित जपणारे, समाजासाठी कार्य करणारे एन. एम. म्हणजेच नथुराम अनंत कदम...

 


सहकारी संस्था लेखापरीक्षेची जबाबदारी सांभाळतानाच समाजात सहकार्य करत स्वत:चे आणि समाजाच्या गती-स्थितीचेही परीक्षण करत त्यातून नवी उमेद शोधणारे नथुराम कदम. समाजातील छोटे छोटे प्रश्न सोडवताना नथुराम कदम ज्यांना समाजात ‘एनएम’ म्हणूनच ओळखतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. शहापूर-टिटवाळा परिसर तसा शांतच. पण वरवर शांत असलेल्या परिसरातही मनातली तगमग शांत नसणारच. परिणाम, वार्ध्यक्य येण्याआधीच शारीरिक व्याधींची सुरुवात होते. ‘एनएम’ यांनी यावर उपाय म्हणून अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घातली. ‘एनएम’ दर महिन्याला खडवली येथील स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये नि:शुल्क शिबिराचे आयोजन करतात. तिथे सहभागी होणार्‍यांना ताणतणाव नियोजन, शारीरिक व्याधींवर संवाद, उपाययोजना केली जाते. तसेच ‘एनएम’ यांना कवितेची आवड, साहित्याची आवड. उगवत्या कलाकारांना त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ मिळावे म्हणून ‘एनएम’ सदैव प्रयत्नशील असतात. माणसाला दु:ख विसरायला लावण्याची अद्भुत शक्ती कलेत असते. हा विचार करून ‘एनएम’ दर महिन्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. पण, हे आयोजन कुठल्याही व्यावसायिक स्तरावरचे नाही, तर टिटवाळा परिसरात एक वृद्धाश्रम आहे.

 
‘एनएम’ या वृद्धाश्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. इथल्या ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करतात. आज टिटवाळा, शहापूरमध्ये ‘एनएम’ यांना एक ‘छंदिष्ट मनस्वी समाजसेवक’ म्हणूनच लोक पाहतात. त्याचे कारणही आहे. ‘एनएम’ यांना वृत्तपत्रातील विशिष्ट बातम्यांचे संकलन करण्याचा छंद आहे. पण, यातही वैशिष्ट्य असे की, एकच बातमी कशाप्रकारे विविध वृत्तपत्रांत लिहिली गेली आहे, याचे संकलन ते करतात. सध्या कोरोनाच्या बातम्यांचे त्यांच्याकडे भांडार आहे. जव्हार, ठाणे, चिपळूण आणि आता मुंबईमध्ये सहकारी संस्थांचे द्वितीय श्रेणी लेखापरीक्षक म्हणून काम करताना अनेक अनुभव त्यांना येतात. पण ‘सत्कर्म कर, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे स्वामी वचन त्यांना बळ देते. ‘एनएम’ कदमांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर जाणवते की अंधारातही एखादी प्रकाशरेषा उमटतेच. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्य घडवणार्‍या ‘एनएम’ यांचे मूळ गाव हेळवाक, तालुका पाटण जिल्हा सातारा इथला. अनंत कदम आणि मालती कदम यांना चार मुले. त्यापैकी मोठा मुलगा नथुराम. वडील भातसा धरणामध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये कामाला. आई गृहिणी. पण आई अतिशय मेहनती. कोंड्याचा मांडा करून रांधणारी. मुलांनी शिकावे ही तिची इच्छा. मुलांचे सगळ्यांचे शिक्षण करता येईल का? नथुराम याचे तरी शिक्षण व्हावे, यासाठी कदम दाम्पत्यांनी नथुराम यांना वयाच्या चौदाव्या वर्षी नातेवाईकांकडे गावी शिकायला पाठवले.
 

 

गावात शिक्षणाचा खर्च कमी होता. अनंत गावी १००-२०० रूपये पाठवित. शाळा गावापासून दोन मैल दूर. पायात चप्पल नाही, की धड कपडे नाहीत. वह्या-पुस्तके काही नाही. नुसते शाळेत बसायला मिळते हे नशीब होते. प्रोत्साहन मिळावे, काहीतरी प्रेरणा मिळावी असे काहीच नव्हते. त्याच काळात शाळेत कॅबिनेट मंत्री बाळासाहेब देसाई हे आले होते. त्यांच्यासोबत मोठमोठे अधिकारी वर्गही होते. अधिकारी वर्गाची शिस्त, दरारा या छोट्या गावातल्या लोकांनी अनुभवला. नथुराम यांनीही अनुभवले. त्यावेळी त्यांनी ठरवले की, आपणही असेच मोठे अधिकारी व्हायचे. देसाईंसमोर त्यांनी संत तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्याही कविता गायली. यावर देसाई यांनी त्यांचे खूप कौतुक केले. पुरस्कारही दिला. आपणही आयुष्यात काही तरी करू शकतो, असं त्यांना पहिल्यांदा त्यांना वाटलं. नव्या हुरूपात दिवस जात होते आणि अचानक खबर आली की अनंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने काम करतानाच मृत्यू झाला. घरचे छप्पर गेले. मालतीबाईंवर जबाबदारी आली. त्यावेळी ‘एनएम’ दहावीला असतील. पण, अभ्यासात लक्षच लागेना. आई कसे काय सगळे एकटी सांभाळत असेल, हा विचार पाठच सोडत नसे. त्यामुळे दहावीला ते अनुत्तीर्ण झाले. त्याबरोबर ते भातसा धरणा जवळच्या परिसरात आईकडे आले. आईला पेन्शन मिळत होती. पण, त्यात काय भागणार? घर सांभाळण्याची जबाबदारी चारही भावांनी वाटून घेतली. किशोर वयातली मुलं. इथे धरण कामावरच्या साहेब अधिकार्‍यांचे बंगले, कॉलनी होत्या. हे चारही भाऊ सकाळी कुणी कॉलनीत आणि मजुरांच्या वस्तीमध्येही पाव विकायला जाई. कुणी गोळ्या-बिस्किटे विकायला जाई. काहीच नाही तर जंगलातून तोडलेली करवंदे, जांभळे नेऊन विकत. दिवसाला बर्‍यापैकी कमाई होऊ लागली. त्यातून घरात आर्थिक स्थैर्य आले. याच दिवसात ‘एनएम’ दहावी पास झाले. महाविद्यालयात शिकू लागले. वयाच्या अठराव्या वर्षीच सहकार खात्यात त्यांना लिपीक म्हणून नोकरी मिळाली. आयुष्याचे ऑडिट त्यांनी समाजकार्य करत व्यवस्थित सांभाळले. साहेबांच्या कॉलनीत पाव, करवंद विकणारा मुलगा आज स्वत: साहेब झाला आहे. पण, याबद्दल ‘एनएम’म्हणतात ही सगळी स्वामीं समर्थ कृपा. आपण सत्कर्म करत जावे. समाजसेवेइतके सत्कर्म दुसरे कोणते नाही..

 
 
@@AUTHORINFO_V1@@