कोरोनाच्या महामारीतही दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच...
जम्मू-काश्मीर : कोरोना व्हायरस संकट देशावर असताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सातत्याने सुरु आहेत. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरातील गोरीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले. गोरिपोरा येथील चकमकीत मृत झालेल्यांपैकी २ दहशतवादी आणि १ त्यांचा साथीदार होता. सुरक्षारक्षकांनी गोरीपोरा परिसर चारी बाजूंनी घेरला आणि त्यानंतर शोधमोहीम सुरु केली. या चकमकीच्या एका दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बडगाम आणि कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ वर हल्ला केला होता.
विशिष्ट ठिकाणी दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी गोरीपोरा येथे घेराव घालत शोधमोहिम सुरु केली. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतावद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली. कुलगाम जिल्ह्यातील यरीपोरा येथे दोन अतिरेक्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. नाका पोलिसांनी अडवले असता ते त्याच्यासोबत प्रवास करत असल्याचे अतिरेक्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आणि अपहरण करण्यात आलेल्या पोलिसांना वाचवण्यात यश आले. दोन दिवसात अतिरेक्यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. शोपिया जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिसांनी तातडीने सोडवले.