राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आढळला वाघाच्या बछड्याचा मृतदेह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2020
Total Views |
tiger_1  H x W:

 

 
मृतदेहावरील सर्व अवयव शाबूत
 
 
 मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आज वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. गस्तीदरम्यान हा मृतदेह वनकर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. मृतदेहाच्या शरीरावरील अवयव शाबूत असून लाॅकडाऊनदरम्यान गेल्या पंधरा दिवसात देशभरात झालेला हा वाघाचा अकरावा मृत्यू आहे.
 
 
 
देशात वाघांच्या मृत्यूचा घटना सातत्याने सुरू असल्याचे समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात १० वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) 'टायगर नेट' या संकेतस्थळावरील हवाल्यानुसार ही माहिती समोर आली होती. कालच दै. 'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. आज या संख्येत आणखी एका वाघाची भर पडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात ४ ते ६ महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह १ ते २ दिवस जुना असण्याची शक्यता आहे. सलामा वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक ५३८ मध्ये हा मृतदेह आढळून आला.
 
 
 
 
वाघाच्या बछड्याच्या या मृतदेहावरील सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. त्यामुळे त्याची शिकार झाली नसल्याचे प्राथमिक स्वरुपात म्हणता येईल. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच विस्तृत माहिती समोर येईल. 'पीटीसीएफ'चे डाॅ. चेतन पातोंड, 'टीटीसी' नागपूरचे डाॅ. बिलाल, डाॅ. दिपीका मनकर यांंनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. यावेळी 'डब्लूआयआय' आणि 'एनटीसीए'कडून इंद्रनील, दिलीप लांजेवार, 'एचडब्लूएलडब्लू'कडून ज्ञानेश्वर डोके उपस्थित होते. वनाधिकाऱ्यांनी मृतदेह सापडलेल्या जागेची पाहणी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@