समाजसेवेचा गुण‘गौरव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |

gaurav potdar_1 &nbs



नि:स्वार्थी, नि:स्पृह भावनेने काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काहीअंशी कमी होताना दिसते. समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक कार्यकर्ते म्हणजे गौरव पोतदार...



‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे,’ या उक्तीनुसार कोणतीही गोष्ट तडीस न्यायची असेल, तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम हे अगदी अपरिहार्य. या स्पर्धात्मक समाजात स्वतःला घडवण्याबरोबरच आपल्या सोबतच्या सहकार्‍यांनादेखील मोठे करणारे सामाजिक कार्यकर्ते तसे विरळाच. पण, जेव्हा असे सामाजिक कार्यकर्ते समाजात सक्रिय असतात, तेव्हा समाजातील रंजल्या-गांजल्या सामाजिक घटकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना निर्माण होण्यास हातभार लागतो. याच धर्तीवर समाजसमर्पित काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे गौरव पोतदार.


गौरव यांचे बालपण अंबरनाथच्या एका छोट्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. आईवडील आणि एक बहीण असे त्यांचे छोटेसे कुटुंब. आई दर्शना अतिशय प्रेमळ आणि शिस्तप्रिय. त्यांच्या प्रेमळ आणि मृदू स्वभावाने गौरव यांना लहाणपणापासूनच विनम्रतेचे आणि सेवाभावी स्वभावाचे बाळकडू मिळाले, तर बालपणीपासूनच वडील दत्तात्रय पोतदार यांच्या शिस्तप्रिय वागण्याने करारीपणा आणि ध्येयवेडेपणाही त्यांच्या अंगात भिनला.


घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे महाविद्यालयीन जीवनापासून गौरव यांनी ज्ञानार्जनाबरोबरच अर्थार्जनाचाही मार्ग निवडला. त्यात त्यांना साथ मिळाली ते ‘कुमार प्रोसेस’चे मालक सुधीर पिसाट यांची. गेली १५ वर्षे गौरव ‘कुमार प्रोसेस’मध्ये काम करत आहेत.


शिक्षणाबरोबरच कष्ट उपसण्याचे संस्कार गौरव यांना सुधीर पिसाट यांच्याकडून मिळाले. सर्वसामान्य घरात शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थितीची नेमकी जाणीव गौरव यांना होती. नोकरी करता करता आपले शिक्षणही सुरु आहे, या गोष्टीचा वेगळा आनंद, अभिमानही गौरव यांना होता आणि त्याचीच जाणीव म्हणून त्यांनी ‘दैवज्ञ चषक समन्वयक समिती’च्या माध्यमातून बिकट आर्थिक परिस्थिती असणार्‍या गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उपक्रम सुरू केले.


यामध्ये शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मुलांना मदत करणे, त्यांच्या शिकवणीची फी भरणे, वह्यावाटप यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी आपली पत्नी पूनम पोतदार आणि कुटुंबीयांच्या साहाय्याने सुरू केले. हे सर्व करताना प्रसिद्धी पराड्.मुखतेचेच धोरण त्यांनी अंगीकारले. कोणाला दाखवण्यासाठी, नाव कमविण्यासाठी नाही, तर सर्वार्थाने गरजूंसाठी समाजकार्य करण्यातच त्यांनी धन्यता मानली.


गौरव यांना माणसांना भेटण्याची, त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधण्याची प्रचंड आवड. अगदी प्रवासातही अनोळखी माणसांना आपलसं करण्याची जणू कलाच त्यांना अवगत आहे. अनेकदा प्रवासात माणसे आपली दु:खे, अडचणी सांगून मनमोकळेपणाने गौरव यांच्याशी संवाद साधतात. या अपरिचित माणसांना जोडण्याचे, त्यांना मदत करण्याचे कौशल्यच जणू त्यांनी आत्मसात केले आहे. म्हणूनच आज जवळपास प्रत्येक क्षेत्रातील अनेकानेक माणसे त्यांच्या ओळखीची आहेत. या प्रत्येकाच्या अनुभवातून गौरव शिकत गेले आणि दोघांचेही जीवन तितकेच समृद्ध झाले. निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करणे, हाच शुद्ध हेतू मनी बाळगत गौरव यांनी समाजकारणामध्ये स्वत:ला वाहून घेतले.


हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत रात्री-अपरात्री काम करणार्‍या सुरक्षारक्षक, रिक्षाचालक, दादर-परळ येथील टाटा, वाडिया रुग्णालयांच्या बाहेर रात्रभर थांबणारे रुग्णांचे नातेवाईक अशा अनेक गरजूंना एका फोन कॉलवर मोफत ब्लँकेट पुरवण्याची संकल्पना त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केली. अल्पावधीतच त्यांच्या या ‘ब्लँकेट बँके’ला तुफान प्रतिसाद मिळाला. सदर ‘ब्लँकेट बँके’चा लाभ पनवेल येथील ‘शांतीवन’सारख्या अनेक सामाजिक संस्थांनीदेखील घेतला. यांसारख्या अनेक संस्था आणि अनाथाश्रमांना गौरव सढळहस्ते मदत करीत असतात. यातून मिळणारा निखळ आनंद त्यांना अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देत असल्याचे ते सांगतात.


शिक्षितांना रोजगार आणि अशिक्षितांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या महत प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गौरव पोतदार यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केले. त्यामुळे आजवर अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी गौरव पोतदार यांनी केलेले प्रयत्न, हे खरंच वाखाणण्याजोगे आहेत. या प्रवासात गौरव यांना अनेक कटू-गोड अनुभव आले. मात्र, या अनुभवांनी सातत्याने पुढे जाण्याचे बळ दिल्याचे ते आवर्जून सांगतात. गौरव यांनी आपले अवघे आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. कारण, आजही समाजातील कित्येक घटक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.


आज गौरव आपले समाजकार्य कोणतीही जाहिरात न करता अखंडपणे करीत आहेत. तेव्हा आज समाजाला खर्‍या अर्थाने गौरव पोतदार यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे. यासाठी गौरव यांचे काम सर्व स्तरापर्यंत पोहोचावे आणि गरजूंना मदतीचा हात मिळावा, यासाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!


- कविता भोसले 
@@AUTHORINFO_V1@@