चित्रकुट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी चित्रकूटच्या १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या २९६ किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचा शिलान्यास सोहळा पार पडला . फेब्रुवारी २०१८ मध्ये सरकारने जाहीर केलेल्या उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडोरच्या करारामध्ये या महामार्गाच्या निर्माणाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बुंदेलखंडला विकासाच्या महामार्गावर आणणारा बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग याप्रदेशाचे भविष्य बदलणारा ठरणार आहे. सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा महामार्ग येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल.”
ते पुढे म्हणाले, “यंदाच्या अर्थसंकल्पात यूपी डिफेन्स कॉरिडॉरसाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गावरून यूपी डिफेन्स कॉरिडोरलाही वेग मिळणार आहे. बुंदेलखंड प्रदेश ‘मेक इन इंडिया’चे खूप मोठे केंद्र होणार आहे. येथे बनवलेल्या वस्तूंची जगभर निर्यातही केली जाईल. जर येथे मोठे कारखाने आले तर जवळपासच्या विस्तीर्ण आणि छोट्या उद्योगांनाही त्याचा फायदा होईल. इथल्या शेतकर्यां नाही याचा फायदा होईल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढेल.”
उत्तर प्रदेश सरकार बुंदेलखंड द्रुतगती मार्ग तयार करीत आहे, जो चित्रकूट, बांदा, हमीरपूर आणि जालौन जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेस वे बुंदेलखंड प्रदेशाला आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे आणि यमुना द्रुतगती मार्गाने जोडेल. यासह बुंदेलखंडच्या विकासात ही महत्वाची भूमिका बजावेल. २९६ किमी लांबीच्या या एक्स्प्रेसवेचा चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, उरैया आणि इटावा जिल्ह्यांना फायदा होणार आहे. बुंदेलखंड द्रुतगती मार्गासाठी केंद्र सरकार १४८४९.०९ कोटी रुपये खर्च करणार आहे. हा महामार्ग बुंदेलखंड प्रदेशास रस्त्यांच्या माध्यमातून राजधानी दिल्लीशी जोडेल. बुंदेलखंड द्रुतगती महामार्गासाठी ९५.४६ टक्के जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्ण होताच सुमारे ६० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. चित्रकूट ते दिल्ली असा प्रवास बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाने अवघ्या पाच तासात पूर्ण होईल.