चिमुकल्या मेंदूतील चिमुकली अक्कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |


agralekh _1  H


द क्विंट, एनडीटीव्ही, अल्ट न्यूज यांसारख्या माध्यमांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची आरोळी ठोकणार्‍या अमूल्या लिओनाच्या पाठराखणीसाठी शाब्दिक कसरती, कोलांटउड्या सुरू केल्या तर आपल्याकडच्या माफीवीर संपादकानेही कलम १२४ (अ)चे रडगाणे गात अग्रलेख खरडला आणि स्वतःच्या बुद्धीशून्यतेचे दर्शन घडवले.



एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूतील सीएएविरोधी रॅलीत अमूल्या लिओना हिने
पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि देशभरात एकच गदारोळ माजला. आतापर्यंत केवळ नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाआडून मोदी व हिंदुत्वाची कब्र खोदण्याची भाषा करणार्‍यानी पाकिस्तानच आमचा मायबाप असल्याचे जाहीर केल्याने त्यांचे बुरखे टराटरा फाटले. मात्र, जामिया मिलिया इस्लामिया आणि शाहीनबागसह इतरत्रच्या सीएएविरोधी आंदोलनांवरील लक्ष आपल्याकडे वळावे म्हणून डोळे लावून बसलेल्या असदुद्दीन ओवेसींची जे दडवायचे, तेच ओठांवरती आल्याचे पाहून बोलती बंद झाली. ओवेसींना अमूल्याबद्दल कोणी काही विचारले की, ते तोंड फिरवून तिथून पळू लागले, प्रश्नांना टाळू लागले. एकीकडे असे होत असतानाच देशातील राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त नागरिकांकडून अमूल्या लिओनावर टीकेचा भडीमार सुरू झाला आणि त्याचवेळी स्वतःचे पांडित्य मिरवत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला योग्य ठरवण्यासाठी डाव्या पत्रकार, संपादक, माध्यमांची फळी कामाला लागली. अमूल्या लिओनाच्या निरागसपणाचे, लहानपणाचे किती कौतुक करू आणि किती नको, असे या सगळ्याच शहाण्यांना झाले. अमूल्याच्या अवघ्या १९ वर्षे वयाची सबब सांगत इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील दंडुकेबहाद्दर आणि छापील माध्यमांतील बोरूबहाद्दर चेकाळले. सगळ्यांनी एका तालासुरात अमूल्यापुराणाची महती गायला सुरुवात करत ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यानाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. अर्थात सभ्य-सुसंस्कृत समाजात कोणी विचारणारे नसले की डाव्या बुद्धीजीवी पत्रकार-संपादकांना देशविघातक शक्तींचाच पुळका येणार. त्याची कितीतरी उदाहरणे आपल्यासमोर आहेतही.



काश्मिरात मारला गेलेला दहशतवादी बुर्‍हान वाणी
, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन ते तुकडे तुकडे गँग, कन्हैयाकुमार, उमर खालिद आणि आसामला भारतापासून तोडण्याचे कारस्थान रचणार्‍या शरजील इमामपर्यंत प्रत्येकाचेच समर्थन या टोळक्याने कधी ना कधी केलेच आहे. आता तेच लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावणार्‍या अमूल्या लिओनाच्या निर्दोषत्वाची ग्वाही स्वतःच्या चिमुकल्या मेंदूतील चिमुकल्या अकलेने देऊ लागले. कोणी ब्रिटिशांनी आणलेल्या कलम १२४(अ)चे रडगाणे लावले तर कोणी मोहम्मद अली जिनांच्या निधनानंतर भारताच्या तत्कालीन नेतृत्वाने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीची आठवण सांगितली. द क्विंट, एनडीटीव्ही, अल्ट न्यूज यांसारख्या माध्यमांनी अमूल्याच्या पाठराखणीसाठी शाब्दिक कसरती, कोलांटउड्या सुरू केल्या तर आपल्याकडच्या माफीवीर संपादकानेही अग्रलेख खरडत स्वतःच्या बुद्धीशून्यतेचे दर्शन घडवले. मात्र, या लोकांनी अमूल्याची गेल्याच महिन्यातली मुलाखत पाहिली-ऐकली नसावी. म्हणूनच फक्त ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटल्याने काय होते, प्रत्यक्ष कृती कुठे झाली, एकट्या-दुकट्याच्या घोषणांनी काय होणार आणि तिने तर कितीतरी देशांचा जयजयकार केला मगपाकिस्तान जिंदाबाद’वरच आक्षेप का, असले प्रश्न ते विचारू लागले. परंतु, अमूल्या एकटी नाही नि तिच्या घोषणेनुसार काही कारवाया होतच नसतील, असेही नाही. कारण तिचाच गेल्या महिन्यातला व्हिडिओ.



अमूल्या लिओना मागील अनेक दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे
. यासंदर्भात तिने एक मुलाखतही दिली असून आपली कार्यपद्धतीही सोप्या भाषेत समजावून सांगितली. नव्या क्रांतीमागे मी एकटीच नाही, मी केवळ चेहरा आहे, असे स्पष्ट करत माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते, अनेक संघटना, अनेक सल्लागार समित्या असल्याचे ती म्हणाली. सर्वांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनानेच आज काय करायचे, उद्या काय करायचे, काय बोलायचे, काय घोषणा द्यायच्या, हे ठरते, असे अमूल्याने यात सांगितले. यावरूनच हे विष, हा विखार कुठपर्यंत पसरला असेल, याची कल्पना करता येते. तथापि, तिचा हा व्हिडिओ ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या नारेबाजीच्या आधीचा आहे, तरीही तिने ज्या पद्धतीने माझ्यामागे संपूर्ण टीम काम करत असल्याचे सांगितले, त्यावरून तिने सर्वसंमतीनेच ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे म्हणावे लागेल. सोबतच ‘पाकिस्तान जिंदाबाद’लाच विरोध का? कारण त्या देशाचे भारताबरोबरचे आतापर्यंतचे वर्तन. देशाच्या फाळणीपासून चार युद्धे त्या देशाने भारतावर लादली व त्यात सपाटून मारही खाल्ला. तसेच ९0च्या दशकापासून जम्मू-काश्मीरसह भारताच्या कितीतरी शहरांत पाकिस्तानने दहशतवादी कारवाया केल्या, बॉम्बस्फोट घडवले आणि फुटीरतेच्या भावनेलाही खतपाणी घातले, रसदपुरवठा केला. पाकिस्तानच्या या प्रत्येक कुरापतीत अनेक भारतीय जवानांना आपल्या प्राणास मुकावे लागले, कित्येकांची म्हातारपणाची काठी मोडून-तोडून पडली, कित्येक विवाहितांचे कपाळ पांढरे झाले तसेच भारताची आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक हानी झाली. म्हणूनच अशा देशाचे नाव घेऊन ‘जिंदाबाद, जिंदाबाद’ करायला कोणाची जीभ कशी रेटू शकते? अशा व्यक्तीला देशद्रोही नव्हे तर काय म्हणायचे? आणि तिने सरकारचा विरोध केलेला नाही तर तिने देशाचा विरोध केलेला आहे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य तिला आहेच पण स्वदेशाविरुद्ध कटकारस्थाने करणार्‍या देशाचे नाव घेऊन ‘जिंदाबाद’ म्हणण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही.



दरम्यान
, भारतात ‘पाकिस्तान जिंदाबाद’साठी अमूल्या व डावे पत्रकार, संपादक, माध्यमे उभी राहिलेली असतानाच तिकडे इमरान खान यांनी या लोकांच्या आशेवर पाणी फेरले. “भारतात जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत काश्मीर समस्या सुटणार नाही-म्हणजेच काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात येणार नाही,” असे ते एका मुलाखतीत म्हणाले. अर्थात नरेंद्र मोदींच्या आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण नीतीसमोर इमरान खान यांनी सपशेल लोटांगण घातल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत युद्ध, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानचे नेतृत्व प्रत्यक्षात शेळपट असल्याचेही जाहीर झाले. तरीही इथल्या काही मंडळींना पाकिस्तानचे गोडवे गावेसे वाटतात, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणावेसे वाटते. अशा सर्वांचेच डोके ठिकाणावर नसून त्यांच्या अकलेची दिवाळखोरी निघाल्याचेच ते लक्षण असल्याचे समजते.

@@AUTHORINFO_V1@@