बंगालमध्ये द्विशतकी विश्वास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |

Amit Shah_1  H
 
 

भाजपने लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये १८ खासदार निवडून आणले व आता अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात २०० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. अर्थात त्यामागे अमित शाह, नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीची, परिश्रमाची, सातत्यपूर्ण प्रयत्नांची व संघटना बांधणीची तपश्चर्याच असेल.
 
 
साधारण दहा वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ‘माँ, माटी, मानुष’चा नारा देऊन पश्चिम बंगालमधील डाव्यांची ३५ वर्षांपासूनची जुलमी राजवट उलथवून टाकली. डाव्यांच्या अराजकाला त्रासलेल्या, हैराण झालेल्या बंगाली जनतेने मोठ्या आशेने ममता बॅनर्जींच्या हाती त्यावेळी राज्याची सत्ता सोपवली होती. तथापि, ममता बॅनर्जींनी आपणच दिलेल्या घोषणेला-आश्वासनाला पायदळी तुडवण्याचे काम केले आणि ‘माँ, माटी, मानुष’ऐवजी फक्त टोलाबाजी, तुष्टीकरण आणि घराणेशाहीचाच कारभार केला. डाव्यांपेक्षाही अधिक रक्तपिपासू व हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी, मुस्लीमधार्जिणे होत हिंसाचाराचे थैमान घातले.
 
 
परिणामी गेल्या दहा वर्षांपासून ममता बॅनर्जींच्या एकाधिकारशाहीला बंगाली जनता कमालीची कंटाळली व तिला आता पर्याय हवा आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत इथल्या मतदारांनी त्याचे संकेत दिले आणि भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात सुमारे १८ खासदार दिले. तेव्हापासून तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष इतका खवळला की, सत्ता जाण्याच्या भयाने त्यांनी भाजप नेते-कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले केले, अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या, इतकेच नव्हे तर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरही दगडफेक केली.
 
 
मात्र, ममता बॅनर्जींच्या ‘फॅसिझम’पासून पश्चिम बंगालच्या जनतेला मुक्त करण्यासाठी सरसावलेल्या भाजपला रोखणे तृणमूल काँग्रेसच्या आवाक्यातली बाब अजिबात नाही. शनिवार व रविवारच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मिदनापूर व वीरभूम दौर्‍यातून तेच स्पष्ट होते. तसेच बंगाली जनतादेखील भाजपच्या पाठीशी किती ठामपणे उभी आहे, हेदेखील यावेळी अमित शाह यांच्या सभेला उपस्थित अफाट जनसमुदायातून प्रतीत होते.
 
अमित शाह यांनी या पार्श्वभूमीवर बंगाली जनतेला संबोधित केले व ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस पक्ष व त्याच्या नेते-कार्यकर्त्यांना ललकारले. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ व जनाधार लाभलेले नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपत प्रवेश केला. तसेच अन्यही एका खासदार आणि आठ आमदारांनी भाजपला आपलेसे केले. मात्र, आताशी सुरुवात झाली असून येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षात ममता बॅनर्जी एकट्या उरतील, इतकी गळती लागेल, असा इशारा यावेळी अमित शाह यांनी दिला. ते साहजिकच म्हटले पाहिजे.
 
कारण, ममता बॅनर्जी यांचा स्वभाव ‘हम करे सो कायदा’ या प्रकारातला आणि आक्रस्ताळा. ‘इतरांपेक्षा मीच शहाणी,’ असा कारभार असल्याने ‘मी म्हणेल तेच बाकीच्यांनी ऐकावे, तसे वागावे,’ अशी त्यांची अपेक्षा. इतकी वर्षे ममतांकडे सत्ता असल्याने व त्यांना आव्हान देणारे कोणी दिसत नसल्याने पक्षातील नेते-कार्यकर्ते दबावाखाली राहिले. पण आता भाजपने ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कंबर कसली, जनतेचीही त्याला साथ मिळू लागली व एक-एक जण ममता बॅनर्जींना सोडून जाऊ लागला.
 
पक्षाला आपल्या कुटुंबाची खासगी मालमत्ता समजणार्‍यांचे असेच होत असते, त्यांच्याकडे सत्तेच्या नाड्या असतात तोपर्यंत त्यांच्यामागे लोक राहतात, पण त्यांचा पाया ढासळू लागला की, लोक त्यापासून दुरावू लागतात. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडणार्‍या आमदार-खासदारांकडे पाहिले की, ते समजते. हिंसाचाराचा, भ्रष्टाचाराचा, लाचखोरीचा हैदोस घालणार्‍या तृणमूल काँग्रेसला जनतेच्या दरबारात, निवडणुकीच्या राजकारणात भवितव्य नाही, परिणामी अशा दिवाळखोरीत जाणार्‍या पक्षात राहिलो तर आपलेही भविष्य काळवंडणार, याची जाणीव झालेली ही सर्व मंडळी आहेत. अशा परिस्थितीत ममतांव सत्तेसाठी थेट काँग्रेस वा डाव्यांशीही हातमिळवणी करण्याची वेळ येईल, असे वाटते.
 
दरम्यान, बंगाली मतदारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून तीन दशके काँग्रेसला, ३५ वर्षे डाव्यांना आणि १० वर्षे तृणमूल काँग्रेसला सत्तेच्या सोपानावर बसवले. मात्र, आताच्या निवडणुकीत भाजपला केवळ पाच वर्षे द्या, आम्ही राज्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवू, असे अमित शाह म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीतील यशाचा दाखला देत जे लोक भाजपचे खातेही उघडणार नाही, असे म्हणत होते, त्यांच्या नाकावर टिच्चून भाजपने १८ खासदार निवडून आणले तर आताच्या निवडणुकीत २०० आमदार विजयी करु, असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
अर्थात, अमित शाह असे बोलतात, त्यामागे त्यांनी स्वतः, नरेंद्र मोदींनी, जे. पी. नड्डा यांनी, बंगालमधील दिलीप घोष, मुकुल रॉय, कैलाश विजयवर्गीय यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी व कोट्यवधी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीची, परिश्रमाची शक्ती उभी असते. सातत्यपूर्ण प्रयत्नांची, सत्ता डोक्यात जाऊ न देता संघटना बांधणीची व जनसमूहाला आपल्या बाजूला वळवण्याची तपश्चर्या याचा त्यात समावेश असतो. तसेच आकडेवारीचाही आधार असतोच असतो. भाजपने लोकसभेला ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला याचा अर्थ जवळपास १२२ पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघातील जनतेने भाजपला निवडले.
 
 
पश्चिम बंगालच्या विधानसभेची सदस्यसंख्या २९४ असून बहुमतासाठी तिथे १४८ जागांची आवश्यकता असते. हे पाहता, लोकसभा निवडणुकीतील भाजपने मारलेली जोरदार मुसंडी व तृणमूल काँग्रेसची दारुण पीछेहाट भाजपला विधानभेचे मैदान गाजवणे अवघड नाही, असे दिसते. अमित शाह यांच्यासारखा रणनितीकार, नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय चेहरा, भाजपची भक्कम संघटना आणि तृणमूलसह अन्य पक्षांतून बाहेर पडून भाजपमध्ये सामील होणार्‍या नेत्यांचा आधार या माध्यमातून आगामी निवडणुकीत भाजप नक्कीच निर्भेळ यश मिळवू शकतो, असे वाटते. अर्थात, बिहार विधानसभा निवडणूक, हैदराबाद महापालिका निवडणूक आणि केरळमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांतून प्रत्येक जण हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ व विकासनिष्ठ भाजपचा झेंडा हाती घेऊन कमळ फुलवण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट होते, पश्चिम बंगालमध्येही तसेच होईल, अमित शाह यांच्या हुंकारातून त्याचाच दाखला मिळतो.






@@AUTHORINFO_V1@@