युक्तिबुद्धीचे महंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |
Ramdas swami  _1 &nb
 
 
 
 
समर्थ रामदासस्वामींनी संप्रदायाची स्थापना करून त्याच्या कार्याची आखणी विचारपूर्वक केली होती. कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून स्वामी लोकांना भक्तिमार्गाला लावून संस्कृती रक्षण करीत होते. तत्कालीन अन्यायी, जुलमी राज्यसत्तेपासून सोडवणूक कशी करून घ्यायची, या विचारात असलेल्या लोकांना स्वामींचे सांगणे असे की-
 
 
 
शक्तीने मिळती राज्ये।
युक्तीने यत्न होतसे।
शक्ती युक्ती जये ठायी।
तेथे श्रीमंती धावती॥
 
 
 
 
वैभव प्राप्त करून घेण्यासाठी शक्ती-युक्तीचा व प्रयत्नशीलतेचा संदेश स्वामी देत होते. लोक तत्कालीन दुष्ट, दुराचारी, हिंसक अशा म्लेंच्छ राजवटीला कंटाळले होते. आपण त्यांना विरोध करू शकत नाही, या जाणिवेने लोक हताश झाले होते. अशा परिस्थितीत स्वामींनी लोकांना धीर दिला.
 
 
 
धीरधरा धीरधरा तकवा।
हडबडू गडबडू नका।
काळ देखोनि वर्तावे।
सांडावे भय पोटिचे॥
 
 
 
लोकांना धीर देणे तर आवश्यक होतेच; पण त्याच्यापुढे जाऊन त्यांच्यासाठी आदर्श राज्याची कल्पना ठेवणे जरुरीचे होते. यासाठी स्वामींनी लोकांसमोर रामराज्याचा आदर्श ठेवला. १२ वर्षे तीर्थयात्रेच्या निमित्ताने स्वामींनी सारा देश पायी फिरून न्याहाळला होता. त्यावेळी देशातील धार्मिक अवनती आणि सांस्कृतिक पडझड त्यांनी पाहिली होती. ती परिस्थिती सुधारायची तर जिकडे-तिकडे धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणारे हिंदवी स्वराज्य स्वामींना हवे होते आणि ते स्वराज्य रामराज्य व्हावे, अशी त्यांची मनीषा होती. ‘मानपंचक’ या स्वामींनी लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी रामराज्याचे भव्य आणि सुरेख वर्णन केले आहे. द्विरुक्तीचा दोष पत्करून रामराज्याचे सार सांगणारी ‘मानपंचका’तील समर्थांची एक ओवी उद्धृत करतो-
 
 
 
चढता वाढता प्रेमा।
सुखानंद उचंबळे।
संतोष समस्नै लोका।
रामराज्य भूमंडळी॥
 
 
 
आपापसातील सामंजस्याने लोकांचा आनंद उचंबळून येत आहे, सर्वत्र न्यायनीती असणारे, एकमेकांविषयी प्रेम वाढीस लावणारे सुखद संतोषाचे वातावरण असणारे रामराज्य आजही लोकांना हवे आहे. द्वेष, मत्सर, भ्रष्टाचार, अन्यायी वातावरण कोणालाही सुख देऊ शकणार नाही. रामराज्य हे मोठ्या कष्टाने उभारावे लागते, रावणराज्ये काय, येतात आणि जातात. त्यांची आठवण कोणी ठेवत नाही, समर्थकालीन निःस्पृह महतांचे काम म्हणजे १) कीर्तन प्रवचनांद्वारा सत्त्वशील लोकांची एकजूट, २) रामोपासनेची आवश्यकता आणि हनुमानाची जागोजागी स्थापना करून त्याची पूजा उपासना ३) भक्तिमार्गाचा प्रसार ४) प्रपंचविज्ञानाची शिकवण ५) लोकांना धीर देऊन रामराज्याची कल्पना समजावून सांगणे ६) लोकसंग्रह निःस्पृहपणे करून लोकोद्धाराचे सांस्कृतिक कार्य करणे.
 
 
 
 
स्वामींनी या विचारांचे महंत शिकवून तयार केले. जागोजागी मठ स्थापना करून स्वामींनी महंतांना लोकोद्धार कार्यासाठी पाठवून दिले. स्वामींनी अनेक मठ स्थापन केले. त्यापैकी १,१०० मठांचा उल्लेख त्यांच्या शिष्यांनी केला आहे. पण, प्रत्यक्षात ही संख्या त्याहूनही अधिक असावी. मठांच्या व्यवस्थानासाठी समर्थांनी सहस्रावधी शिष्य, महंत, कार्यकर्ते तयार केले असतील, असे आपण आज तर्काधारे म्हणू शकतो. स्वामी नुसते महंत अथवा कार्यकर्ते तयार करून थांबले नाहीत, तर या महंतांनीही असेच महंत, कार्यकर्तेतयार करून त्यांना प्रचारार्थ जागोजागी पाठविले पाहिजे, असा स्वामींचा शिष्यांना उपदेश असे.
 
 
 
 
महंते महंत करावे।
युक्तिबुद्धीने भरावे।
जाणते करून विखरावे।
नाना देसी॥ (दा.११.१०.२५)
 
 
महंत तयार करण्याचे काम केवळ स्वत:पुरते न ठेवता, हे कार्यचक्र सतत फिरते ठेवण्यासाठी स्वामींनी महंतांनाही महंत तयार करायला सांगितले, या प्रक्रियेतून अनेक महंत, कार्यकर्ते तयार होतील. त्यांना युक्ती-बुद्धी शिकवावी म्हणजे त्यांना ज्ञानसंपन्न करावे आणि मग त्यांना देशाच्या विविध भागांमध्ये लोकासंग्रहासाठी, प्रचार-प्रसारासाठी पाठवून द्यावे. ही कल्पनाच मुळात किती भव्यदिव्य आहे. हे संघटनकौशल्य आधुनिक काळातही समर्थांकडून शिकावे, असे आहे. या बाबतीत समर्थांनी लिहून ठेवलेल्या सूचना प्रसिद्ध आहेत.
 
 
 
समर्थ स्थापित मठात जो समुदाय जमत असे, त्यांच्यासाठी ही आज्ञापत्रे असत, त्या लोकांनी आपल्या घरी तसेच शेजारीपाजारी जी चुणचुणीत हुशार सद्वर्तनी मुले असतील, त्यांना चुचकारून, नीट समजावून सांगून रामदासी महंतांकडे न्यावे. महंतांनी काही काळ त्यांना जवळ ठेवून त्यांना उपासना सांगावी. त्यांची नीट परीक्षा करून त्यांना समर्थांकडे पाठवून द्यावे. समर्थ या होतकरू मुलामुलींना कार्यभार समजावून देत. युक्तिबुद्धीने भरवून स्वामी त्यांना तयार करीत. या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात, “ ‘बुद्धी’ म्हणजे सध्याचे आपण म्हणतो ते ’intellectual education आणि ‘युक्ती’ म्हणजे आपण सध्या ज्याला म्हणतो ते 'Resource fullness and character building' शिक्षण.” अशा शिक्षणासाठी जी मुले निवडायची, त्यासंबंधी समर्थांच्या आज्ञा पुढीलप्रमाणे असत-
 
 
 

सोयर्‍या धाईर्‍यांची मुले।
तीक्ष्ण बुद्धीची सखोले।
तयासी बोलणे मृद बोले।
करीत जावे॥
निकट मैत्री बरी होता।
मग त्यासी न्यावे येकांता।
म्हणावे रे भगवंता।
काही तर्‍ही भजावे।
मान्य होता जप सांगावा।
मग तो इकडे पाठवावा।
मग तयाचा सकळ गोवा।
उगऊ आम्ही॥
 
 
 
या तरतरीत, बुद्धिवान, सद्गुणी मुलांना महंत म्हणून तयार करताना कुठेही सक्ती नव्हती. महंत घडवताना आपले श्रम फुकट जाणार नाहीत, याची स्वामी अगोदरच दक्षता घेत, स्वामींना माहीत होते की, गुणी विद्यार्थ्यांवर घेतलेले श्रम वाया जात नाहीत. महंतांना शोधण्याची ही समर्थांची पद्धत स्तुत्य आहे. समर्थांच्या अंगी असलेल्या गुणग्राहकतेने त्यांना अंबाजीसारखा गुणी शिष्य लाभला होता. समर्थांनी त्याला शोधून आपल्या शिष्यसमुदायात सामावून घेतले. हा गुणी मुलगा अंबाजी म्हणजेच समर्थांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी होय.
 
 
 
-  सुरेश जाखडी 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@