नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेंद्र भास्कर थत्ते यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे निधन नाशिक येथे राहत्या घरात झाले. थत्ते हे मुळचे गिरगाव, मुंबईचे स्वयंसेवक होते. नाशिक, तसेच मुंबईमध्ये त्यांनी संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने दीर्घकाळ वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने कार्य करणारा एक सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुरेंद्र थत्ते यांना घरातूनच संघसंस्कार मिळाले होते. त्यांनी विविध दायित्व घेत संघाचे कार्य केले. एकत्रित महाराष्ट्र प्रांतात ते महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, प्रांत सहकार्यवाह होते. स्वदेशी जागरण मंचाच्या उभारणीच्या आरंभकाळात त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. इलेक्ट्रीकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी सु-भास्कर नावाने व्यवसाय सुरू केला होता. श्रीगुरूजी जन्मशताब्दी वर्षात कोकण प्रांताच्या समितीचे ते सदस्य होते.