‘रंगरेषांचे’ रामकृष्ण कांबळे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020
Total Views |

vividha_1  H x

उत्कृष्ट शिक्षक विशेषतः कलाशिक्षक हा उत्कृष्ट ‘प्रात्यक्षिके’ दाखवू शकतोच असे नसते, तर उत्कृष्ट प्रात्यक्षिके दाखविणारा कलाकार हा उत्कृष्ट कलाशिक्षक असतोच असेही नसते. ही गेल्या तीसेक वर्षांची निरीक्षणे आहेत. प्रात्यक्षिकांच्या बाबतीत तरी दोन प्रकार पडतात, असे माझे निरीक्षणांती मत बनलेले आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रात्यक्षिककारांच्या कामामध्ये पाहणार्‍याला मजा येते. आनंद मिळतो. मात्र, ‘सेलिब्रिटी डेमॉन्सस्टेटर’ म्हणजे प्रसिद्धीच्या वलयात आनंद मानणारे प्रात्यक्षिककार कलाकार वेगळे! त्यांचं काम छान वाटतं. मात्र, ‘प्रसिद्धीच्या झोतात नसलेले, किंबहुना प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणारे प्रात्यक्षिककार कलाकार यांचं काम स्मरणात राहणारं असतं. या दुसर्‍या प्रकारातील एक ‘प्रात्यक्षिककार कलाकार’ जे हाडाचे कलाध्यापकही आहेत, त्यांच्या कलाप्रवासाविषयी आजच्या लेखात आपण माहिती घेऊया!



ज्येष्ठ व्यक्तिचित्रणकार आणि ज्येष्ठ कलाध्यापक प्रा. रामकृष्ण कांबळे यांच्या व्यक्तिचित्रणाबद्दल, तसेच इतर कलाशैलींबद्दल काही लिहिण्याअगोदर एक अनुभव त्यांच्या प्रात्यक्षिकासंबंधीचा येथे नमूद करणे मला फार गरजेचे वाटते. आमच्याकडे जे. जे. उपयोजित कलेच्या स्टुडिओचे प्रमुख अध्यापक प्रा. जी. ए. दांडेकर होेते. ‘अमूर्त’ आणि ‘अर्धामूर्त’ म्हणजे ‘सेमी फिगरेटिव्ह’ शैलीतील त्यांचं काम. त्यांची अनेक प्रात्यक्षिके त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांना तासन्तास पाहायला मिळायची. त्यांचं प्रात्यक्षिक झालं की भलीमोठी सही करुन ते सस्मित वदनाने विद्यार्थ्यांकडे पाहायचे, तेव्हा विद्यार्थ्यांनाही स्मितहास्य करावे लागायचे. काही विद्यार्थ्यांनी मागणी केली म्हणून ‘रिअ‍ॅलिस्टिक स्टाईल’मध्ये काम करणार्‍या प्रा. रामकृष्ण कांबळे यांना मी खास पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून बोलावले. मुंबईतील ‘प्रात्यक्षिककारां’च्या सेलिब्रिटी यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र, आजही त्यांचं प्रात्यक्षिक हे त्यावेळी हजर राहिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या नजरेआड तसेच स्मरणातून गेलेले नाही. प्रा. कांबळे यांना स्टुडिओतील रंग, ब्रश कॅनव्हास उपलब्ध करुन दिला. एका विद्यार्थिनीला मॉडेल म्हणून बसवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि हाती प्राप्त झालेल्या रंगांच्या मदतीने, एक सुंदर व्यक्तिचित्रण सरांनी काही मिनिटांतच पूर्ण केले.



म्हणजे तास तर निश्चित लागला नव्हता आणि गायक समेवर आल्यावर दर्दी कानसेनांच्या टाळ्या जशा पडतात, तशा उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कांबळे यांच्या प्रात्यक्षिकाला दाद दिली. खूप वर्षांनंतर विद्यार्थ्यांना एक सुंदर रंगांचा छाया -प्रकाशासह असलेला वास्तववादी शैलीतील खेळ पाहायला मिळाला होता. तृप्ततेचे समाधान कला विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर होते. इकडे मी, सहाध्यायी कलाध्यापक आणि कांबळे सर गप्पा मारीत होतो. सरांनी मला रंगांच्या डब्यांविषयी सांगितले. काही रंग विशेषतः पांढरा, पिवळा वगैरे हे वरुन जरी दिसत असले तरी वाळलेले होते. आम्ही एकदम अवाक झालो. दोष देत बसण्यापेक्षा वेळ निभावून नेणं महत्त्वाचं होतं. कांबळे सरांनी जिथे त्यांना पांढरा आवश्यक वाटत होता, तिथे त्यांनी कॅनव्हासच्या पांढर्‍या पोताचा, व्यक्तिचित्रणासाठी चपखलपणे उपयोग केला होता. बापरे... मी आणि सहाध्यायी अध्यापक थक्क झालो! मला ‘त्या’ बिरबल बादशहाच्या कथांपैकी एक आठवली. बादशहा बिरबलाला विचारतो “सर्वश्रेष्ठ शस्त्र कोणते?” बिरबल म्हणतो, “ऐनवेळी जे हातात येईल ते...” वगैरे इथे आजच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी प्रा. रामकृष्ण कांबळे यांनी ‘बिरबल नीती’च उपयोगात आणली.ही घटना सर कदाचित विसरलेही असतील, पण निरीक्षण, उपलब्ध रंग साहित्य आणि वेळ या तिन्ही गोष्टी केवळ तो कलाकार किती अनुभवी, प्रगल्भ आणि रंगप्रकृतींना हाताळायचं कसब असलेला असावा, हे कांबळे सरांच्या त्या प्रात्यक्षिकावरुन ध्यानात येते.



paint_1  H x W:

‘अभिनव’मधून एटीडी आणि सर जे. जे. स्कूल मुंबई येथून पेटिंगची पदविका पूर्ण केल्यानंतर कांबळे सरांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे जी.डी.आर्ट आणि डीप.ए.एड.चे कलाशिक्षण पूर्ण केले. ‘व्यक्तिचित्रण’ या विषयात त्यांना प्रथम श्रेणी होती. त्यांचे सर्व कलाशिक्षण हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन झाले आणि 1984 पासून ते अभिनव कला महाविद्यालयात एटीडी विभागाचे विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कांबळे उभे आहेत. कलाध्यापकाच्या नोकरीकडे त्यांनी सेवा म्हणून पाहतानाच अनेक कलाशिक्षकांना त्यांनी घडवले. त्यातील काही जणांना ‘आदर्श कलाशिक्षक’ असे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.संगमनेर येथे जन्म आणि अहमदनगर येथे शालेयसह कलाविषयक प्रोत्साहन त्यांना त्याचे वडील, दत्तात्रय गोपाळ कांबळे यांच्याकडून आणि ज्येष्ठ चित्रकार र. बा. केळकर यांच्याकडून प्राप्त झाले. जगप्रसिद्ध व्यक्ती चित्रणकार गोपाळराव देऊसकर यांच्या हाताखाली काम करण्याचे भाग्य कांबळे सरांना मिळालं. त्यामुळेच त्यांच्या रेखाटनात अचूकता आणि तैलरंग लेपनातील हुकूमी कसब प्रा. रामकृष्ण कांबळे सरांना लाभलं. जे. जे. तही ज्येष्ठ चित्रकार मृगांक जोशी आणि सर्वपरिचित असलेले बहुळकर यांच्या शैली-तंत्रांचा अभ्यास जवळून करता आला.

त्यांना राज्यात आणि भारतात ‘व्यक्तिचित्रण’ या कलाप्रकारांत सुमारे तीसहून अधिक पुरस्कार विविध प्रदर्शनांद्वारे प्राप्त झालेले आहेत. अनेक प्रात्यक्षिके, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि सेमिनार्समध्ये प्रा. रामकृष्ण कांबळे सरांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. जलरंगातील पारदर्शकतेचा आणि कॅनव्हॉस वा पोत असलेल्या हॅण्डमेड पेपर वा तत्सम ड्रॉईंग पेपरचा अचूक निदानात्मक उपयोग करुन सरांनी चितारलेली व्यक्तिचित्रणे ही सात्विक आणि रंगशास्त्राच्या अभ्यासाचा मूर्तिमंत दाखला आहेत. पेस्टल रंगातील त्यांचं काम हे थक्क करणारं आहे, तर ऑईल रंगाप्रमाणेच, अ‍ॅक्रॅलिक रंगामधील त्याचं कामही कलरसिकांच्या मनाचा ठाव घेते. वास्तविक अ‍ॅक्रॅलिक रंग हा फार लवकर सुकतो-वाळतो, मग दोन वा त्याहून अधिक रंगांचं मिश्रण करुन, हवी ती शेड वा हवा तो रंगभाव मिळेपर्यंत मिश्रण प्रक्रिया सुरु ठेवून वेळेचं व्यवस्थापन सांभाळून काम करत राहाणं, हे फार कमी कलाकरांना जमतं.

एम. आर. आचरेकर, साबक्ष चावडा या भारतीय चित्रकारांसह, देगा, अ‍ॅग या विदेशी चित्रकारांच्या स्केचिंग स्टाईल्सचा कांबळे सरांच्या कामावर प्रभाव पडला. अव्याहत काम, सातत्याने स्केचिंग आणि व्यक्तिचित्रणे करणार्‍या कांबळे सरांच्या कामाची ‘बालभारती’ने दखल घेतली आणि इयत्ता सातवीच्या ‘बालभारती’ पुस्तकात कांबळे सरांच्या ‘रश्मी’ या व्यक्तिचित्राची निवड केली गेली. प्रसिद्ध साहित्यकार लेखक, समीक्षक, रा. ग. जाधवांनी या रश्मीची फार सुंदर समीक्षा लिहिलेली आहे. पाचवी, सहावी, सातवीच्या ‘बालभारती’ पुस्तकांसाठी त्यांची रेखाचित्रे, दिवाळी अंकांची मुखपृष्ठे अशी विविध प्रकारची कामे करणारे कांबळे सर हे स्थिरचित्रे, वस्तुचित्रे, स्मरणचित्रे, कार्टुन, रेखाटने इ. कलाप्रकार फार हुकमतीने हाताळतात. पुण्याजवळील हडपसर येथील त्यांचा ‘रंगरेषा स्टुडिओ’ म्हणजे १९८४ ते आज दिनांकापर्यंतचा अव्याहत सुरु असलेला खर्‍या अर्थाने रंगरेषांचा उत्सव होय... जो रोजच नव्हे, तर प्रत्येक तासातासाला सृजन निर्माण करीत असतो.प्रा.रामकृष्ण कांबळे सरांना त्यांच्या कलाकार्यासाठी सुदृढ दीर्घायुष्य चिंतितो.

-प्रा. गजानन शेपाळ 
@@AUTHORINFO_V1@@