दुर्गास्वरूप आत्मशक्ती प्रत्येक स्त्रीचे सामर्थ्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020
Total Views |

kunda fatak_1  


स्त्री म्हणून जन्म घेतल्यावर माणूस म्हणून त्या व्यक्तीची जबाबदारी आणखीनच वाढते. मानवी शाश्वत मूल्य जगताना त्या स्त्रीशक्तीला जगण्याची आणि जगवण्याची पराकाष्ठा करावी लागते. मळलेल्या वाटेवरून न जाता, स्वत:चा प्रकाशमान मार्ग तयार करणार्‍या समाजात काही दैवीस्वरूपी स्त्रीशक्ती आहे. या स्त्रीशक्तीचे वास्तव रूपच राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारक, गृहिणी विद्यालयाच्या व्यवस्थापिका कुंदा फाटक आपल्या मनोगतातून मांडत आहेत.



तो दिवस मी कधीही विसरणार नाही. समाजसेवा करावी, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून सरकारी नोकरी सोडली आणि विक्रमगडच्या वनवासी पाड्यातील वसतिगृहात सेवाकार्य करू लागले. पाड्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागले. काहीही झाले की भुताटकी आणि भगतबिगत करणार्‍या बांधवांनी डॉक्टरांकडे जावे, उपचार करावे यासाठी जंगजंग पछाडले. पण, लोक बरी झाली की पुन्हा कर्ज काढत, भगताकडे जात आणि म्हणत की, ‘डॉक्टरांनी नाही, तर भगताने आम्हाला बरे केले.’ प्रत्येक वेळी हे असेच व्हायचे. लोकांची अंधश्रद्धा का दूर होत नाही? कर्ज, जादूटोणा यातून ते का बाहेर पडत नाहीत? मी कितीही समजावले, त्यांना सत्यता पटवून दिली, तरी ते अंधश्रद्धा सोडत नाहीत. या लोकांच्या कल्याणासाठी मी का काम करते? माझ्या डोळ्यांतून आसवं आली. वाटले निघून जावे इथून पुन्हा शहरात. मी मनाने थकून तिथल्याच एका देवळात बसले. देवळात गणपतीची मूर्ती! कसे कोण जाणे गणपती, पार्वती, सरस्वती, दुर्गा, कालीदेवीची असंख्य रूपे समोर आली. क्षणात मनात विचार आला, ‘नाही नाही, आता तू माघार घेऊ शकत नाहीस. आतापर्यंत तुझ्या आयुष्यातील सर्वच निर्णय तुझे होते. त्याचे बरेवाईट परिणाम आणि त्याची परिणतीशी तुलाच सामना करावा लागेल. हरून कसे चालेल? प्रयत्न कर, पुन्हा प्रयत्न कर!!’ आणि खरं सांगते, माझ्या मनातला नकारात्मक विचार दूर झाला. पुन्हा वनवासी समाजबांधवांसाठी काम करण्यास सिद्ध झाले. ही शक्ती कसली होती? त्या दुर्गाशक्तीची जिद्द, संघर्ष माझ्यात जात्याच होती का?


तसे पाहिले तर माझी आई खूप साधी आणि श्रीमंत घरातली लेक. माझे वडील नारायण फाटक हे शेतकरी, पण कर्मठ ब्राह्मण. कूळ कायद्यात जमीन गेली आणि आमच्यावर उपासमारीची पाळी आली. त्यावेळी आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक होती की, सातवीनंतर माझे शिक्षण थांबले. पण, त्याचवेळी रा. स्व. संघाच्या अभिनव विद्यालयाचे प्रधान सर घरी आले. त्यांनी आईबाबांना सांगितले की, ‘मुलींना शिकवा, शाळा त्यांची जबाबदारी घेईल.’ साठीचे दशक होते ते. तिथे रा. स्व. संघाचे संस्कार माझ्यावर झाले. घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. एके दिवशी स्वयंपाकाला घरात काहीच नव्हते. त्यामुळे नेहमीच्या किराणा दुकानदाराकडे गेले, तर कर्ज झाल्यामुळे किराणा दुकानदारानेही किराणा देण्यास नकार दिला आणि कर्ज, गरिबीवरून वाट्टेल ते बोलला. त्याचवेळी मी ठरवले की, कामाला जायचे आणि याचे कर्ज फेडायचे. पुढे मी नर्सिंगचा फॉर्म भरला. पण, त्याला घरातून प्रचंड विरोध झाला. दुसर्‍या बायांची बाळंतपणं विटाळ, हे ब्राह्मण मुलीने करावे, याबाबत त्यांचा आक्षेप होता. पण, यावर मला ठामपणे वाटले की, मीही स्त्री आहे आणि स्त्रियांची आरोग्य सेवा करणे यात पाप कसे असू शकते? त्यामुळे मी नर्सिंग केले. सरकारी रुग्णालयात नोकरी लागली. घराची घडी नीट बसली. मग मी ठरवले की, समाजासाठी काम करायचे.


समाजकार्य हेच माझ्या जीवनाचे लक्ष असल्याने विवाह केला नाही. एकटी स्त्री म्हणून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वेळा मी व्यथित होत असे. पण, त्याही वेळी माझ्या मनात एक विचार आलाच की, ती देवी माताही एकटी असूनही सर्वशक्तिमान आहे. तिचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी एकटी नाही. समाजाची सज्जन शक्ती आणि मुख्य म्हणजे माझी आंतरिक आत्मशक्ती माझ्यासोबत आहे. पुढे मला राष्ट्र सेविका समितीची प्रचारक म्हणून शांताक्कांनी, प्रमिला मेढेताईंनी घोषित केले. त्यानंतर वनवासी पाड्यातील मुलींनी नर्सिंग शिकावे, आपल्या पाड्यातील आरोग्य क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर कराव्यात, यासाठी राष्ट्र सेविका समितीतर्फे गृहिणी विद्यालयाची स्थापना झाली. वनवासी पाड्यातील शेकडो लेकीबाळी येथे शिकून आपल्या पायावर उभ्या राहिल्या. समाजातील कुप्रथांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. मी त्या मुलींना सांगते, ‘बाई गं काहीही कर, पण व्यसनी मुलाशी लग्न करू नकोस. तुझे निर्णय तू स्वत: घे. निर्णयक्षम बन, घेतलेल्या निणर्याचे परिणाम स्वीकारण्याइतकी सक्षम बन. समाजासाठी दायित्व निभव.’नवरात्रीचा जागर करताना आयुष्यातल्या प्रत्येक वाटेवरचा संघर्ष आठवतो. या सर्व संघर्षाला निर्णायक यश मिळवून दिले, त्या माझ्यातल्या दुर्गास्वरूप आत्मशक्तीनेच...!


- कुंदा फाटक
(शब्दांकन - योगिता साळवी)
@@AUTHORINFO_V1@@