निर्णयक्षमता आणि मेहनत हीच यशाची पहिली पायरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020
Total Views |



pallavi ramane_1 &nb


कर्तृत्व आणि यश हे वारशाने नाही, तर कष्टाने आणि बुद्धिमत्तेने येते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दुर्गामातेने जे युद्ध केले किंवा तिच्या इतरही रूपांत करूणामयी किंवा सहनशीलतेच्या अनुभूती जपताना, देवीने जो समन्वय राखला आहे, तो संघर्ष आणि समन्वय आजही प्रत्येक महिला शक्तीमध्ये आहे. जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतीलही, पण त्यातील आंतरिक जाणिवा मात्र कुठे ना कुठे तरी समान असतात. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना या आंतरिक जाणिवेची प्रेरणा जागृत असावी, हे सांगून आपल्या जीवनातील तो संघर्ष आणि समन्वय मांडत आहेत अटल इन्क्युबेशन सेंटर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये इन्क्युबेशन मॅनेजर असलेल्या पल्लवी रामाणे...



लहानपणापासून विविध देवतांची चित्रं-मूर्ती यांचं मला अतिशय आकर्षण वाटे. त्यांचे भाव, शस्त्र, वाहनं, अलंकार आणि पौराणिक गोष्टी यांत मी रमत असे आणि देवीची तर किती रूपं! गणेशाचे लाड करणारी पार्वती, त्यागाचं प्रतीक असलेली सीता, उत्कर्ष आणि संपन्नतेचे रूपक असणार्‍या लक्ष्मी आणि अन्नपूर्णा, प्रेमाचं प्रतीक असणारी राधा ते दुष्ट शक्तींचा नाश करणार्‍या दुर्गा, चंडिका आणि पुढे इतिहास शिकत असताना ओळख झालेल्या सप्तमातृका आणि चौसष्ट योगिनी. ही सर्वच रूपं मला मुग्ध करून टाकतात. प्रत्येक स्त्री आयुष्याच्या विविध टप्प्यांवर या रूपांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गरज असते ती केवळ स्वतःला ओळखण्याची आणि आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करण्याची. मी सहावीत असताना वडिलांशी केलेलं पहिलं भांडण आजही आठवतं. त्यांना स्पष्ट बजावलं होतं की, कार्यक्रम शाळेजवळच आहे. मैत्रिणी सोबत आहेत. रस्ता नेहमीचाच आहे. मी एकटी घरी येईन. पण, तरीही ते मला न्यायला आले. एकीकडे त्यांची काळजी आणि दुसरीकडे ‘स्वतःच्या जबाबदारीवर मी प्रवास करू शकते,’ हा माझा आत्मविश्वास आणि पुढील गरज. एक देवी प्रसंगी वाघ-सिंहांसारख्या हिंस्र श्वापदांना आपले वाहन बनवून राक्षसांचा नाश करते, तेच तत्त्व आणि स्वसंरक्षणाचं सामर्थ्य माझ्याही अंगी आहे, ही तीव्र जाणीव. आजही जेव्हा अनोळखी प्रदेशांमध्ये एकटी प्रवास करते, तेव्हा इतरांवर अवलंबून न राहिल्यामुळे आपण उत्तम शिक्षण आणि अनुभव यांना मुकलो नाही, याचं समाधान वाटतं आणि कठीण प्रसंगांशी दोन हात करताना देवीचं ते तत्त्व, सामर्थ्य आणि आशीर्वाद पाठीशी आहेत, असा विश्वास वाटतो.


मध्य प्रदेशातील एका दुर्गम जिल्ह्यात इंटर्नशिपसाठी गेले होते. त्या मुलींच्या वसतिगृहातील जेवण बनवणार्‍या आणि साफसफाई करणार्‍या मावशांशी मी खूप गप्पागोष्टी करत असे. त्यापैकी एक मावशी खूप प्रेमळ आणि कष्टाळू होती. माझा आणि तिचा स्नेह जुळला. एकेदिवशी मी तिला विचारले, “तुमचे घर कुठे आहे?” तर ती म्हणाली, “बेटा, तुला घरीच नेले असते, तुला इथल्या पद्धतीचे जेवण खाऊ घालण्याची खूप इच्छा आहे. पण, तू येऊ शकत नाहीस.” त्यावर पटकन मी “का?” असे विचारल्यावर ती गप्प बसली. मी म्हणाले, “मी येऊ शकते. वसतिगृहाच्या प्रमुखांना विचारून मी येते.” यावरही ती गप्प बसली. मला अजब वाटले. मी वसतिगृहाच्या प्रमुखांना तिच्या घरी जाण्याबाबत विचारले. कारण, मी तिथे समाजजीवन अभ्यासायलाच गेले होते. तिच्या घरी जाऊन, तिच्या वस्तीचाही अभ्यास केला असता, तर वसतिगृह प्रमुखांनी ठाम शब्दात नकार देत सांगितले की, “ती दलित महिला आहे आणि आमचा दलित वस्तीमध्ये जाण्यास विरोध आहे.”(‘आमचा’ म्हणजे वसतिगृहाचा नव्हे, तर त्यांचा वैयक्तिक.) त्यांच्या या वक्तव्याचा मी विरोध तर केलाच, शिवाय त्यावेळी मनाचा चंग बांधून शहराबाहेरच्या त्या काळोख्या झोपडपट्टीवजा वस्तीतही गेले. इतर स्त्रियांचे दुःख दूर करण्याची ताकद अंबेमातेमध्ये आहे, पण आपल्यात तिचे तत्त्व वास करते आणि किमान इतरांचे दुःख समजून घेऊन चार क्षण त्यांच्यासोबत घालवणं, हे तर नक्कीच शक्य आहे. खरं वाटणारं नाही, त्या दिवशी ती संपूर्ण वस्ती मावशींच्या घराभोवती जमा झाली होती, मुंबईहून कोण पाहुणी आली आहे ते पाहायला. मावशींच्या डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले होते. बहुधा इतर जातीच्या कुणी त्या वस्तीत जाऊन जेवायची ती पहिलीच वेळ होती.नवरात्रीचा जागर करताना कितीतरी आठवणी मनात पिंगा घालतात. त्यातली आणखीन एक आठवण. मी नामांकित शाळेतून दहावीला दुसरी आले. त्यावेळी सगळ्यांनी विचारले, “मग इंजिनिअर होणार का डॉक्टर? नाहीतर सीए, आर्किटेक्ट? माझं अतिशय नम्र उत्तर- आर्टस्!


त्यावर ‘आर्टस्ला तर कलाकार मंडळी, ज्यांना भाषांमध्ये रस आहे असे लोक किंवा ज्यांना नावापुरती पदवी मिळवायची आहे, अशीच लोकं जातात ना...’ अशी अनेकविध निरीक्षणं आणि सल्ले. माझ्या या निर्णयाने घायाळ झालेल्या आईवडिलांनीही माझे ’IQ' आणि ’EQ' परीक्षण करून घेतले, संबंधितांना माझे समुपदेशन करण्यास बोलावले. सर्वांनी जंगजंग पछाडले. मी मात्र माझ्या मनाला विचारलं आणि उत्तर मिळालं, ‘मला सर्वच विषयांत रुची आहे, सतत नवनवीन शिकण्याची हाव आहे, इतिहासाचं वेड आहे, वाचनाची गोडी आहे आणि सामाजिक शास्त्रांमध्ये काही भरीव कामगिरी करू शकेन, असा विश्वास वाटतो. केवळ या जोरावर आर्र्ट्सला प्रवेश घेऊन स्वतःची एक नवी वाट तयार करण्यास सज्ज झाले. पण, ही केवळ संघर्षाची नांदी होती. बारावीत गणिताऐवजी तर्कशास्त्र विषयाची, तर पदवीसाठी अर्थशास्त्राऐवजी इतिहासाची निवड, पदव्युत्तर शिक्षण टाटा सामाजिक संस्थेमधून करण्याचा निर्णय, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यास जाऊन एकटीने राहणं आणि पुढे गोदरेजसारखी ख्यातनाम कंपनी सोडून सामाजिक बांधिलकी जपणार्‍या एका संस्थेत नोकरी स्वीकारणं, हे सर्वच वादाचा विषय ठरले.


आज जेव्हा या प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा स्वतःच्या पसंतीच्या क्षेत्रात कार्य करत असल्याचे समाधान आणि स्वातंत्र्य फार मोलाचे वाटते. ना कधी अभ्यासाचे ओझे वाटले ना कामाचा ताण. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकण्याची संधी आणि निवडलेल्या क्षेत्रात योगदान द्यायला मिळेल, या उत्साहाने सुरु होतो. विशेष कुणाचे मार्गदर्शन लाभले नाही, पण अनेक शुभेच्छुक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि आंतरिक प्रेरणा यांची साथ राहिली. अंतिम स्थान काय असेल, याची पुसटशीही कल्पना नाही, पण प्रत्येक नवं वळण हे तितकचं अनपेक्षित आणि सुखद धक्का देणारं ठरतंय. मुलींनी एक चाकोरीबद्ध आयुष्य जगावं, अशी आजही आपल्या समाजाची अपेक्षा! घरात आणि समाजात वावरताना अतिशय आदर्श वर्तवणूक असावी, मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे एवढं मिरवण्याइतपत बरी नोकरी असावी, करिअरची खूप मोठी स्वप्न नसली तरी चालेलं, पण घर सांभाळण्याचे कौशल्य हवं आणि अगदी स्वतःला पुरोगामी म्हणवणारा वर्गदेखील अगदी क्वचितच निराळं करिअर, सांपत्तिक स्थिती आणि जात या पलीकडे जाऊन मुलींना स्वीकारताना आढळतो. या परंपरागत चाकोरीमध्ये वावरणार्‍या स्त्रियांना पाहते, तेव्हा त्यांच्यात निर्णयक्षमतेचा अभाव मला प्रकर्षाने जाणवतो. अगदी सुशिक्षित महिलाही याला अपवाद नाहीत. कारण, निर्णयक्षमता म्हणजे केवळ विविध उपलब्ध पर्यायांमधून केलेली निवड नसते, तर काही वेळा नवे पर्याय तयार करणं, घेतलेले निर्णय शेवटपर्यंत निभावून नेणं, त्याचे जे काही बरे-वाईट परिणाम होतील, त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणं आणि त्यातूनही वाट काढून मार्गक्रमणा करत राहणं, यातच नवनिर्मितीचा आनंद दडलेला आहे. चला, या नवरात्रीत आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करून एक नवी ओळख निर्माण करून आपल्या हातून सत्कार्य घडावे, अशी मातेच्या चरणी प्रार्थना करूयात.


- पल्लवी रामाणे
@@AUTHORINFO_V1@@