वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा ‘अथर्वयोग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |




मुंबईकर
18 वर्षीय अथर्व अंकोलेकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. त्याच्या यशस्वी जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख...


आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावण्याचे अनेक होतकरु खेळाडूंचे स्वप्न. मात्र, त्यासाठी क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे सर्वांनाच परवडण्यासारखे नसते. त्यामुळे अनेकांची मोठा क्रिकेटपटू होण्याची स्वप्न खुलण्याआधीच कोमेजतात. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. या शहराने घडविलेल्या खेळाडूंचे क्रिकेट विश्वात एक वेगळेच स्थान आहे. अगदी सर्वसामान्य परिस्थिती असणार्‍या मुंबईच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर असे काही नाव कमावले, जे कायम अनेकांच्या स्मरणात राहतील. श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘अंडर-१९’ गटातील ‘आशिया करंडक’ स्पर्धेत १८ वर्षीय मुंबईकर अथर्व अंकोलेकर याने अशी काही कामगिरी केली की, त्याच्यावर सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर आहे. बांगलादेशविरुद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावरच भारत ‘अंडर-१९’ गटात ‘आशिया करंडक’ स्पर्धेचा मानकरी ठरला. मुंबईकर १८ वर्षीय अथर्व अंकोलेकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. सर्वसामान्य परिस्थिती असतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणार्‍या अथर्वचा यशस्वी जीवन प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



अथर्वचा जन्म दि
. २६ सप्टेंबर, २००० साली झाला. त्याचे वडील विनोद अंकोलेकर हे ‘बेस्ट’मध्ये वाहक म्हणून नोकरी करायचे. विनोद अंकोलेकर यांना क्रिकेटची खूप आवड. नोकरीनंतर वेळ काढून ते आवर्जून स्वतः क्रिकेट खेळायचे. वडिलांना असलेला क्रिकेटचा छंद अथर्वलाही बालवयातच लागला. क्रिकेटची त्याची शैली निराळी आहे, हे वडिलांनी लहानपणीच ओळखत त्याला क्रिकेटचे साहित्य आणून दिले. ते आवर्जून अथर्वला क्रिकेट खेळण्याच्या सरावासाठी क्लबमध्ये घेऊन जात. दिवसा नोकरी करून अथर्वला क्रिकेटच्या सरावासाठी नित्यनेमाने घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी रात्रपाळी करण्याचा निर्णय घेतला. सलग आठ वर्षे रात्रपाळी करत क्रिकेटच्या सरावाचे बाळकडू त्यांनी लहानपणीच अथर्वला पाजले. शालेय शिक्षणासोबतच अथर्वला वडिलांकडून क्रिकेट सरावाचे धडे मिळत असल्याने क्रिकेट विश्वातच करिअर घडविण्यावर त्याने आपले लक्ष्य केंद्रित केले. जवळपास दहा वर्षांपूर्वी अथर्वच्या जीवनात मोठे संकट आले. त्याच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर अथर्वचा क्रिकेट प्रवास मंदावला. वडील घरातील एकटे कमावते असल्याने पुढील जीवन कसे जगायचे, असा प्रश्न आई वैदेही आणि अथर्वपुढे होता. यावेळी आईने अथर्वला धीर देत त्याचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. वैदेही यांनी वडिलांच्या जागेवर ‘बेस्ट’मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि अथर्वच्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला. वडिलांच्या अनुपस्थितीत क्रिकेटचा सराव करणे अथर्वसाठी अवघड जात होते. मात्र, आईने समजूत काढल्यानंतर अथर्वने स्वतःला सावरत आपला क्रिकेटचा सराव पुन्हा नियमित सुरू केला. विविध क्लब आणि मोठ्या प्रशिक्षकांकडून क्रिकेट कोचिंग घेणे हे अथर्वला शक्य होत नव्हते. मात्र, काटकसर करून का होईना, पण आपल्या मुलाचा क्रिकेट सराव कायम सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आई-वडिलांच्या या कष्टाचे चीज करण्याचे त्याने ठरवले.



अथर्व हा सध्या अंधेरी येथे वास्तव्यास आहे
. पार्ले टिळक इंग्रजी माध्यम शाळेत त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिझवी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. महाविद्यालयातर्फे क्रिकेट खेळत असताना त्याची निवड ‘अंडर-१९’ क्रिकेट स्पर्धेसाठी झाली. अथर्व हा एक डावखुरा गोलंदाज आहे. गोलंदाजीची त्याची शैली निराळी असून प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद करून माघारी धाडण्यात तो मोलाची कामगिरी बजावतो. अथर्वचे हे वैशिष्ट्य अनेक प्रक्षिक्षकांनी अचूकपणे हेरले आणि त्याची निवड ‘अंडर-१९’ गटातील क्रिकेट स्पर्धेसाठीझाली. आंतरराष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मिळालेल्या या संधीचे अथर्वने सोनेही केले. ‘अंडर-१९’ गटात ‘आशिया करंडक’ स्पर्धेत त्याने मोलाची कामगिरी बजावत स्वतःला सिद्ध केले. आता अथर्वला प्रतीक्षा आहे, ती मुख्य भारतीय संघात प्रवेश करण्याची. यासाठी तो प्रयत्नशील आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@