केंद्रात 'नरेंद्र' आणि राज्यात पुन्हा 'देवेंद्र'च!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019   
Total Views |



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख कारभाराची नाशिकमध्ये गुरुवारी महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत जाहीररित्या स्तुती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीची पंतप्रधानांनी तोंडभरुन स्तुती केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा फडणवीस यांच्याकडेच असेल हे नि:संशय.


भाजपला महाराष्ट्रात पूर्ण बहुमत नसतानाही शिवसेनेला सोबत घेऊन फडणवीसांनी मोठ्या कौशल्याने पाच वर्षं राज्याचा गाडा हाकला. महाराष्ट्राला एक प्रगतिशील आणि स्थिर सरकार लाभले. अखंड साधनेतून महाराष्ट्राची त्यांनी सेवा केली आणि राज्याच्या विकासाला एक नवीन दिशा दिली. 'जलयुक्त शिवार'सारख्या योजनेतून राज्यातील अनेक गावे दुष्काळमुक्त केली, असे गौरवोद्गार मोदींनी फडणवीसांबद्दल काढले. हे कौतुक नेहमीच्या नम्रतेने स्वीकारत फडणवीस आता विधानसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. याच सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही फडणवीस सरकारच्या कारभाराची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही प्रशंसा सरकार आणि पक्षसंघटन यांच्यातील समन्वय आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. अशी स्थिती आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या संसारात कधी आली नाही. भाजप, शिवसेनेने पाच वर्षे एकमेकांना ठोसे देत, सांभाळून घेत, कधी गोडीगुलाबीने पाच वर्षे हे सरकार टिकवले. मात्र, याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा संसार २०१४च्या निवडणुकीपर्यंतही टिकला नव्हता. पृथ्वीराज चव्हाण सरकारचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि चव्हाण यांना अक्षरशः अगतिकपणे राजीनामा द्यायले भाग पाडले. हा महायुती आणि आघाडी या दोन सरकारमधील निवडणुकीला सामोरे जातानाचा एक महत्त्वाचा फरक. पण, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती गेल्या निवडणुकीपेक्षाही भयंकर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवर मोदींच्या मोठ्या यशाचे सावट होते. यावेळीही लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा अंदाज घेत दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपापल्या पक्षाला रामराम ठोकून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणे पसंत केले आहे. मात्र, या 'आयाराम-गयारामां'मुळे महायुतीमधील गुंतागुंतही वाढली, एव्हढे निश्चित.

 

पाच वर्षे सलग राज्य केल्यावर प्रस्थापित विरोधी जनमताची भीती असते. पण, जनतेशी थेट संपर्क हा फडणवीसांच्या राजकारणाचा कायमच स्थायीभाव राहिला. त्यातूनच ते आपल्या सरकारचे प्रगतिपुस्तकच घेऊन थेट जनतेमध्ये उतरले. "आम्ही विरोधात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो आणि सत्तेत असताना जनतेशी संवाद साधणारी महाजनादेश यात्रा काढतो," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि २२ दिवसांमध्ये साधारण लहान-मोठ्या १६० सभा घेतल्या. प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप १५० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये पोहोचला. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापासून ते उत्कृष्ट पायाभूत सुविधांपर्यंत त्यांनी फक्त भव्यदिव्य स्वप्नेच पाहिली नाहीत, तर त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याच्या दिशेनेही पावले टाकली. महाराष्ट्रासारख्या सधन आणि प्रगत राज्याचे नेतृत्व करताना त्यांनी स्वतःवर भ्रष्टाचाराचा एक शिंतोडाही उडू दिला नाही. "राज्याच्या सोशल इंजिनिअरिंगच्या सूत्रात न बसताही मोदींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च पदावर बसवून राज्याची सेवा करण्याची संधी दिली," असे म्हणून फडणवीसांनी नाशिकच्या सभेत नम्रपणे कृतज्ञताही व्यक्त केली.

 

अनाकलनीय पवार

 

शरद पवार आता वयाच्या ७९व्या वर्षीही महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. "मला सोडून गेलेले सगळे माझे जवळचेच आहेत. त्यांना शुभेच्छा. या वयात मला माझ्यासाठी काही मिळवायचे नाही. परंतु, मला आयुष्यभर साथ दिलेल्या तळागाळातील लोकांसाठी, शेतकरी-कष्टकर्‍यांसाठी मला ही लढाई लढण्यावाचून पर्याय नाही," या त्यांच्या सादेलाही सध्या राज्यभरातून कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी पण पवारांच्या राजकारणाचे वर्णन गूढ, रहस्यमय काहीसे पाताळयंत्रीपणाकडे झुकणारे असे केले जाते. पण, अलीकडे त्यांचे राजकीय डावपेच काहीसे अनाकलनीयही वाटू लागले आहेत. आघाडीच्या लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक दिग्गजांनी 'एक्झिट' घेतल्याने भाजप-शिवसेना महायुती होवो अथवा न होवो भाजपची वाढलेली ताकद बघता त्यांचेच सरकार पुन्हा येणार हे स्पष्टच आहे. असे असूनही 'जाणते नेते' म्हणवणारे पवारसाहेब अनाकलनीय का वागत असावेत? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने निर्माण झाला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये जंगी प्रवेश केला. असे याआधी लोकसभा निवडणुकीच्यावेळी विखे-पाटील यांच्याबाबत घडले होते. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेला नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे डॉ. सुजय विखे-पाटील यांची कोंडी झाली. गेली तीन वर्षे जोरदार प्रचार मोहीम राबवून रान तयार केले असले तरी आपले राजकीय शत्रू असलेल्या माजी खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नातवाचा नगरमधून राजकीय उदय होऊ द्यायचा नाही, अशी अटकळ बांधून राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे वडिलांच्या म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटलांच्या विरोधात जात चिरंजीव डॉ. सुजय यांनी भाजपची वाट धरली आणि मोदी लाटेचा फायदा घेत निवडणूक जिंकली. सुजयनंतर राज्यातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटीलही भाजपवासी झाले. आता तर पूर्ण नगर जिल्हाच काँग्रेस व राष्ट्रवादीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कर्जत-जामखेडची जागा सोडली तर राष्ट्रवादीला नगरमध्ये भवितव्यच उरले नाही. ही स्थिती ज्या नगरच्या लोकसभा जागेवरून निर्माण झाली, ती जागा जर लोकसभा निवडणुकीत पवारांनी हटवादीपणा सोडून काँग्रेसला दिली असती तर दोन्ही पक्षांचे नुकसान टळले असते. त्याआधीचा पवारांचा अशाबाबतीमधील इतिहासही तसाच आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी आयुष्यभर पवारांच्या विरोधात संघर्ष केला. १९९०च्या दशकात 'गडाख विरुद्ध विखे' हा निवडणूक खटला उच्च न्यायालयात नेऊन विखे यांनी पवारांना न्यायालयात खेचले होते. पवार व विखे घराण्यातील असा हा जुना राजकीय संघर्ष आहे. 'नगरची जागा काँग्रेसला सोडणार नाही. पण, तुम्हाला लढायचेच असेल तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावे लागेल,' असा प्रस्ताव राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला होता व काँग्रेसकडूनही त्याला अप्रत्यक्षपणे होकार होता. पण 'घड्याळ' एकदा का स्वीकारले तर शरद पवार आपलीच राजकीय विकेट काढतील व जुना हिशोब चुकता करतील, अशी भीती राधाकृष्ण विखे-पाटील यांना वाटली असावी. अगदी नगरचीच कॉपी म्हणता येईल, अशी स्थिती पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात दिसून येते. "मी कुठल्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापुढे पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर टाकेल, ती मी प्रामाणिकपणाने निभावेन," असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा जवळपास १४ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजप तिस़र्‍या क्रमांकावर होता. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी 'राष्ट्रवादी विरुद्ध भाजप' असा सामना रंगणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे निश्चितपणे बदलणार आहेत. पवारविरोधी राजकारणासाठी हर्षवर्धन पाटलांचा उपयोग भविष्यात भाजपला होणार आहे. जर शरद पवारांनी नगरची लोकसभेची व आता इंदापूरची विधानसभेची जागा काँग्रेससाठी सोडली असती, तर विखे-पाटील व हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते आज कदाचित पक्ष सोडून गेले नसते.

 

पुन्हा घराणेशाहीच!

 

जिल्हाजिल्ह्यात शरद पवारांनी उभ्या केलेल्या राजकीय सरदारांनी संकटसमयी त्यांची साथ सोडल्याने आतातरी पुढील काळात पवार अशी घराणी मोठी करणार नाहीत व सामान्य वर्गातील तरुण-तरुणींना संधी देतील, अशी वंदता होती. पण, पवारांनी आपले 'इलेक्टिव्ह मेरिट' हे आवडते सूत्र वापरता पुन्हा घराणेशाहीचीच कास धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातून पितृपंधरवड्याची धास्ती न बाळगता पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. परळीमधून मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे आव्हान देतील,तर शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीतर्फे आव्हान देतील. पाचपैकी दोन लढतींवरूनच राज्यात निवडणुकीत भाऊबंदकी किती पेटणार आहे, याचीच कल्पना येते. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांचे चिरंजीव विजयसिंह पंडित, केजमध्ये माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी नुकतेच जाहीर केले आहेत. आता सर्व पक्षांच्या यात्रा संपल्या असल्या तरी राजकारणाचा खेळ मतदानाच्या दिवसापर्यंत पाहत बसणेच मतदाराच्या सध्यातरी हाती आहे.

@@AUTHORINFO_V1@@