कर्नाटकचे काय होणार? : भाजपची सत्ता की राष्ट्रपती राजवट ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



बंगळुरू/दिल्ली : कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळून दोन दिवस झाले तरीही कर्नाटकचे काय होणार, हा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. काँग्रेस-जेडीएसमधील १७ बंडखोर आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नसल्याने भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेचा दावा करणार की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

 

काँग्रेसमधील १३ तर जनता दल (सेक्युलर) च्या ३ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले व विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्याने कोसळले. यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरीही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप १६ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे सत्ता कुणाची? हा प्रश्न दोन दिवसांनंतरही अनुत्तरितच राहिला आहे. कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते व पुढील संभाव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरुवारी सायंकाळी अथवा रात्री नवी दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार असल्याची चर्चा होती. परंतु, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतेही ठोस वृत्त हाती येऊ शकले नाही.

 

दुसरीकडे, एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटक भाजपचे प्रवक्ते आ. जी. मधुसूदन यांनी याबाबत बोलताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत दिले. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यास असाच विलंब केल्यास राज्यपाल वजुभाई वाला हे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात, असे मधुसूदन यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बंगळुरूमध्ये बोलताना सांगितले की,‘’बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि मी त्या विश्वासाला जागेन.” माझ्या विवेकबुद्धीनुसार बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष कुमार यांनी काँग्रेस आमदार रमेश जर्कीहोली आणि महेश कुमटल्ली तसेच अपक्ष आमदार आर. शंकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@