खेडे सक्षम होण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019   
Total Views |


 


शिक्षणातील बाजाराची चौकट भेदत 'राजा का बेटाही राजा नाही बनेगा। तो जो हकदार है वो राजा बनेगा।' अशी वास्तविकता निर्माण करणार्‍या हरीश बुटले यांच्या आयुष्याचा हा संवदेनशील पट...

 

मूळ कोठारी, चंद्रपूरचे हरीश बुटले कुटुंब. आई वेणुबाई आणि वडील तुळशीराम दोघेही कष्टाळू. वडील शेतकरी. हरीश यांच्यावर आजोबा बापूजी आणि आजी राधाबाई यांचा फार प्रभाव. बुटले कुटुंबामध्ये सामाजिक नीतिमत्ता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे नीतितत्व कसोशीने पाळले जात होते. हे संस्कार हरीश यांच्यावर होत होते. कालांतराने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बदलली. शेतीतून उत्पन्न घटले. शाळेमध्ये अत्यंत हुशार असलेले हरीश मग दहावीनंतर शिकवणी घेऊ लागले. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. पण, बारावीच्या परीक्षेला एका पेपरला ते अचानक खूप आजारी पडले. आजारपणामुळे ते वर्ष वाया गेले. त्यावेळी त्यांना अतोनात दु:ख झाले. मात्र, घरच्यांनी धीर दिला. पुढच्या वर्षी पुन्हा त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि ते जिल्ह्यात प्रथम आले.

 

वैद्यकीय शिक्षण न घेता त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता. त्यामुळे पुण्याला ते खाजगी क्लासेसमध्ये शिकवू लागले. त्यांची शिकवण्याची हातोटी बघून अल्पावधीत ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाले. इतके की, खाजगी शिकवणी वर्गाच्या मालकाने एकदिवशी हरीश यांना बोलावले आणि उगीचच हिणवले. "क्लास चालवणे हे येर्‍या गबाळ्याचे, त्यातही खेड्यातून आलेल्याचे कामच नव्हे वगैरे..." असे बोलून त्यांनी हरीश यांना भरपूर अपमानित केले. हरीश त्यांना परोपरीने समजावत होते की, मला अभियंता बनायचे आहे. आर्थिक मदत मिळावी म्हणून मी आता शिकवणी घेतो आहे. पण, तरीही क्लासच्या मालकाने त्यांना बोलणे सुरूच ठेवले.

 

शेवटी सहनशक्तीची सीमा संपून तरुण हरीश म्हणाले की, "ठिक आहे., तुम्ही म्हणता ना की शिकवणे हे येर्‍या-गबाळ्याचे काम नाही, तर मी शिकवणी वर्ग उघडतो. त्या क्षणानंतर हरीश यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या 'श्रद्धा क्लासेस'च्या १२ वर्षात महाराष्ट्रात ४२ शाखा सुरू झाल्या. या शिकवणी वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी अत्युच्च गुण मिळवून यशस्वी व्हायचे. पण, साधारण एक तप 'कोचिंग क्लासेसशमधून सन्मान प्राप्त झाल्यावर हरीश यांनी कोचिंग क्लासेसना रामराम केला. का? कारण, तोपर्यंत शिकवणी वर्ग म्हणजे एक धंदाच झाला होता. ज्या पालकांकडे पैसे असतील, ते आपल्या मुलांना शिकवणीला पाठवायचे. त्या मुलांना उत्तम शिक्षण मिळायचे.

 

परीक्षेतील युक्त्या समजायच्या. पण, ग्रामीण भागातील गरीब मुलांचे काय? 'सीईटी', 'नीट' वगैरे परीक्षा देण्याची त्यांची इच्छा असली तरी त्यात बहुतेकदा मार्गदर्शन आणि अपुर्‍या माहितीमुळे या मुलांना या परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळतच नव्हते. या मुलांसाठी व्यवस्थित चाललेले शिकवणी वर्ग बंद करून हरीश यांनी 'डीपर'ची संकल्पना मांडली. 'डीपर' म्हणजे 'डिस्ट्रिक एन्ट्रन्स एक्झाम परफॉर्मन्स इनव्हॅन्समेंट अ‍ॅण्ड रिसर्च.' त्यासाठी हरीश यांनी पुणे, सोलापूर, अहमदनगर शहराचे सर्वेक्षण केले. ग्रामीण भागातल्या मुलांमध्येही शिक्षणाची आणि उज्ज्वल भवितव्याची आस आहे. त्यांना स्पर्धा परीक्षांचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, या उदात्त हेतूने हरीश यांनी 'डीपर' सुरू केले. यामध्ये ग्रामीण भागातल्या किंवा कोणत्याही गरजू मुलांच्या 'सीइटी,' 'नेट' वगैरे परीक्षांच्या सराव परीक्षा घेतल्या जातात; त्याही नाममात्र शुल्कामध्ये.

 

या 'डीपर'मध्ये परीक्षा दिलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा चक्रव्यूह भेदू शकले आणि यशस्वीही झाले. १३ वर्षाच्या कालावधित डिपरमध्ये दहा वेळा राज्यातून विद्यार्थि पहिले आहे. यावर्षी निटची हॅटट्रिक झाली. हे करत असताना हरीश यांनी शिक्षक आणि पालकांसाठीही प्रशिक्षण सुरू केले. याच प्रवासात त्यांना एकदा एक अत्यंत नामांकित व्यक्ती भेटली. ती व्यक्ती हरीश यांना म्हणाली, "तुम्हीच ना ते जे मुलांमध्ये अभ्यासाची स्पर्धा लावता. तुम्ही व्यावसायिक आहात." यावर हरीश यांना हसावे का रडावे, तेच समजेना. कारण, ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवता यावे म्हणून त्यांनी त्यांचे चांगले चालणारे क्लासेस बंद केले होते. ज्यांची उलाढाल लाखो रुपयांची होती. पण, तरीही सामाजिक क्षेत्राचा अभ्यास करायलाच हवा म्हणून हरीश यांनी सामाजिक कार्य करणार्‍या नामांकित संस्थांना भेटी दिल्या. त्यांचे काम पाहिले. यातून मग त्यांना जाणवले की, खेड्यातील सर्वच बाबतीतील अंधार कायम आहे. खेडी सक्षम झाली पाहिजे. 'साद माणुसकीची' नावाची संस्था सुरू केली. या सगळ्या घडामोडीत ते आपल्या गावाला विसरले नाहीत.

 

आपल्या गावाचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी यशस्वी योजना कार्यान्वित केल्या. आज खेडोपाडी शैक्षणिक जागृती व्हावी म्हणून हरीश काम करीत आहेत. एक यशस्वी शिकवणी वर्गाचे चालक ते समाजसेवक असा हरीश यांचा जीवनप्रवास आहे. असो, २०२५ साली हरीश आणि डॉ. रोहिणी एका खेड्यात राहून तेथील विकास करणार आहेत. मृत्यूनंतर त्यांच्या नावावर एक छदामही न राहता ती सर्व संपत्तीही सामाजिक कार्यासाठीच वापरली जाईल, याची दक्षता हरीश यांनी घेतली आहे. ते म्हणतात, "माझे आजी-आजोबा, आई, सुरेश रहाळकरसर, घुलाराम टोंगे गुरुजी यांचा माझ्यावर प्रभाव आहे. पत्नी डॉ. रोहिणीचीही साथ आहे. यामुळे येणार्‍या काळात जास्तीत खेड्यांना सक्षम बनविणे हे माझे ध्येय आहे. शेवटी माणसाने माणसाशी माणसासारखेच वागायचे असेल, तर शहर आणि खेडे यातील विषमतेचे क्रूर अंतर संपायला हवे."

 
 


माहितीच्या
महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@