नवी दिल्ली : विविध बनावट कंपन्यांमार्फत बँकांना तब्बल हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या 'स्टर्लिंग बायोटेक'चे मालक संदेसरा ब्रदर्सबाबत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी मोठा गौप्यस्फोट केला. 'संदेसरा घोटाळा' हा पंजाब नॅशनल बँकेपेक्षाही मोठा घोटाळा असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
'स्टर्लिंग बायोटेक कंपनी लिमिटेड' आणि 'संदेसरा' समूहाचे प्रमुख प्रमोटर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या तयार करून बँकांना तब्बल १४ हजार, ५०० कोटींचा गंडा घातला. ईडीने याप्रकरणी बुधवार, दि. २६ जून रोजी 'स्टर्लिंग बायोटेक'ची नऊ हजार कोटींपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली. यामध्ये नायजेरियातील ऑईल रिग, एक जहाज, एक विमान आणि लंडनमधील संपत्ती जप्त केली आहे. कारवाईदरम्यान, ईडीला अनेक दस्तवेज मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat