शहरी माओवाद आणि उपाययोजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019   
Total Views |



खूप आधीपासून माओवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत. शहरी माओवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल, अशा भ्रमात कोणीच राहू नये. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत न आलेले असंख्य शहरी माओवादी आपल्या आसपास वावरत असतील.


माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांनी तात्पुरता जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयाने २९ एप्रिलला फेटाळून लावला. राव यांना जामीन मंजूर केल्यास ते भूमिगत होण्याची शक्यता आहे. राव हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे वरिष्ठ व सक्रिय नेते आहेत. ते सध्या अतिशय गंभीर व देशविरोधी गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच, नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. सत्य काय आहे, याचा शोध घेण्यासाठी, पुस्तकांच्या कामासाठी आपण माओवाद्यांच्या संपर्कात होतो, अशी कबुली माओवादी समर्थक गौतम नवलखा यांच्यातर्फे १५ एप्रिलला न्यायालयात देण्यात आली. माओवादी आणि सरकार यांच्यातील मध्यस्थ म्हणून नवलखांनी भूमिका बजावली होती, अशा व्यक्तीवर माओवादाला खतपाणी घातल्याचा आरोप कसा काय ठेवला जाऊ शकतो? असा सवाल त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला. माओवादी समर्थकांच्या वकिलांनी केलेले हे विधान बरोबर आहे का? लक्षात असावे की माओवादी संघटनांवर देशांमध्ये अनेक वर्षांपासून बंदी घातली आहे. अशा बंदी घातलेल्या संघटनेशी कुठलाही भारतीय संबंध ठेवू शकतो का? हे देशद्रोही कृत्य नाही का?

 

भरकटलेले विचारवंत आणि शहरी माओवादी

 

संविधानावर आधारित भारतीय लोकशाही पद्धत उद्ध्वस्त करून माओवाद आणणे, हे माओवाद्यांचे लक्ष्य आहे. माओवाद ही राजकीय चळवळ नाही. कारण, आपल्या व्यवस्थेमध्ये हिंसाचाराला स्थान नाही. परंतु, माओवादी समर्थक शहरी बुद्धिजीवींकडून हेतुपूर्वक त्यांचे समर्थन केले जाते व ग्रीन हंट ऑपरेशन थांबवून वाटाघाटी करा, असे सांगितले जाते. बुद्धिजीवी दबाव गटाचे काम करतात. वृत्तपत्रे, सामाजिक संस्था, विश्वविद्यालये यांचा उपयोग करून समाजात वैचारिक भ्रम पसरवणारेच हे विचारवंत निरपराध आदिवासींच्या हत्याकांडाला जबाबदार आहेत. समाज त्यांना मोठे लेखक, पत्रकार, विचारवंत म्हणून आदर देतो पण, हे मानवतावादी देशाचे प्रचंड नुकसान करीत आहे. माओवाद्यांकडून मरणाऱ्या निर्दोष नागरिकांबद्दल ते कधीच बोलत नाहीत. यांच्यामागे पाकिस्तान, चीन आणि अनेक भारतविरोधी आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. सारांश, माओवाद्यांच्या क्रौर्याला प्रोत्साहन देण्याचेच काम हे बुद्धिवंत करतात! या बुद्धिवंतांची मुले मात्र माओवादाच्या लढाईत सामील होत नाही. ती बहुधा अमेरिका किंवा परदेशात शिकत असतात किंवा काम करीत असतात.

 

जंगलातील शस्त्रधारीपेक्षा शहरी माओवादी अधिक धोकादायक

 

दुर्गम भागात चालू असलेल्या माओवाद्यांच्या कुटील कारस्थानांना वैचारिक बैठक देण्याचे काम शहरी भागातील बुद्धिजीवींनी केले, हाच तो शहरी माओवाद. जंगलातील शस्त्रधारी माओवाद्यांपेक्षा शहरी माओवादी हे अधिक धोकादायक आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी, वैद्यकीय मदतीसाठी,अर्थव्यवस्थापनासाठी, माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, परदेशी संपर्कासाठी माओवाद्यांना शहराशी असणारा हा संबंध उपयोगी पडतो. माओवादाच्या समर्थनार्थ विविध पोस्ट लिहिल्या जातात. या साऱ्यांचा समाजावर, विशेषतः तरुणांवर काही वेळा प्रभाव पडतो. माओवाद्यांकडून दलितांचा गैरवापर करून घेतला जात आहे. साधारणत: २००१ पासून माओवादी गटांनी शहरांत हातपाय पसरण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातून होणाऱ्या सशस्त्र लढ्याला शहरी भागातून पाठबळ पुरविण्याचे काम करायचे, ही रणनीतीही उघडपणे मांडण्यात आली आहे. आदिवासी मुलखातून जो सशस्त्र लढा चालवायचा त्यासाठी मनुष्यबळ, सामग्री, गुप्त कारवायांसाठी आश्रयस्थाने, चकमकींमधून जखमी होणाऱ्यांसाठी उपचार व्यवस्था इ. सर्व पुरविण्याचे कामही नागरी माओवादी गटांकडे सुनियोजित पद्धतीने दिले जाते. शहरांमधून जी कामे पार पाडायची त्यांच्या यादीत अधिकृतपणे शत्रू संघटनांमधून शिरकाव करणे या कामाचाही समावेश आहे. माओवाद्यांचे शहरी समर्थक सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करताना दिसतात. सामान्य लोकांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करणे व एकत्र करणे, कामकरी, अर्धकुशल कामगार, विद्यार्थी, मध्यमवर्गातील चाकरमानी व बुद्धिजीवी यांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे, हे त्यांचे मुख्य काम आहे.

 

पाच-सहा मंडळी पकडणे म्हणजे हिमनगांची टोके

 

खूप आधीपासून माओवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत. शहरी माओवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल, अशा भ्रमात कुणीच राहू नये. कारण ही पाच-सहा मंडळी म्हणजे हिमनगांची टोके आहेत. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत न आलेले असंख्य शहरी माओवादी आपल्या आसपास वावरत असतील. त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? या शहरी माओवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. पोलिसांनी या कामाला सुरुवात केली असली तरी, त्याचा शेवट सहजसाध्य नाही. माओवाद्यांच्या तुलनेत शासन यंत्रणेजवळ शस्त्रबळ जास्त आहे. असे असतानाही माओवादी समस्या मात्र संपत नाही. प्रश्नाचे उत्तर शोधले तर लक्षात येते की, संख्येने कमी असले तरी माओवादी सैनिक हे ध्येयाने प्रेरित आहेत आपण नाही.

 

काय करावे-कोणी करावे?

 

माओवादाशी संबंध असलेल्या विचारवंत आणि संस्थांच्या विरुद्ध कायद्याप्रमाणे कारवाई करायला हवी. सर्व राज्य सरकारांनी या संघटनांविरुद्ध कारवाई करावी. राजकिय पक्षांनीही हे समजणे गरजेचे आहे की, माओवाद्यांचे लक्ष, सर्व देशात अराजक माजवणे हे आहे. सगळ्या राजकीय पक्षांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. विदेशातून येणारा पैसा थांबवला पाहिजे. वसतिगृहे, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयातील तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी यांना लक्ष्य केले जाते. यापासून दूर राहण्याकरिता तरुणांचे उद्बोधन करणे गरजेचे आहे. झोपडपट्टीवासीयांचे संघ, चाळ समित्या, कामगार यांचे उद्बोधन करणे गरजेचे आहे. शहरी माओवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. माओग्रस्त भागामधून जातीय वाद, उच्च-नीच संपवून देशभक्ती आणि राष्ट्रीय शिक्षणावर भर देणे. लोकशाहीचे बीज खोलवर रुजवणे.

 

बेरोजगारी दूर होण्याकरिता उपाययोजना

 

वाढत्या शहरीकरणामुळे शहरांमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वर्गांना मार्गदर्शन करून माओवादी प्रभावाखाली न जाऊ देणे. सर्व संशयित व्यक्तींचा पुरेसा डेटा सरकारकडे आणि सुरक्षा एजन्सीकडे असणे. समाजामध्ये ठीकठिकाणी नाट्यरूपाने, फलक नोटीस बोर्ड व इतर साधनांमार्फत शहरी माओवादाविरुद्ध जन जागृती करणे. वंचित असलेल्या घटकांची चर्चा करत राहणे यामुळे ते वाईट मार्गाला जाणार नाही. समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण करणे. माओवाद्यांच्या मार्गावर असलेल्या युवकांवरती लक्ष ठेवून त्यांना तिथे जायच्या आधीच योग्य मार्गदर्शन करुन ते थांबवणे. शासन आणि माओवादग्रस्त भागातील नागरिक यांच्यातील दुरी कमी करणे. माओवादी कारवाया करणाऱ्यांना आणि त्यांना मदत देणाऱ्यांना कठोर शिक्षा करणे. माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरता गुप्त संघटना कार्यरत करणे.

 

नागरिकांना योग्य बक्षीस देणे

 

दुर्गम भागात काम करणाऱ्या उद्योजकांवर लक्ष ठेवणे. कारण, त्यातील अनेक माओवाद्यांना खंडणी देतात. माओवादग्रस्त भागातून बाहेर येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचे चेकिंग पूर्ण पद्धतीने करणे. यामुळे कुठलेही सामान, संपत्ती किंवा संशयित व्यक्ती तिथून जात असतील तर त्यांना पकडणे. सोशल मीडियावर वेगवान लक्ष ठेवून वाईट मार्गाला लागणाऱ्या युवकांना रस्ता चुकायच्या आधीच थांबवणे. वर दिल्याप्रमाणे अनेक उपाय आपण अंमलात आणू शकतो. या उपायांवर सतत चर्चा करून अजून नवीन उपाययोजना शोधणे. शहरी माओवादी समाजामध्ये आपला प्रभाव वाढविण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतात. यावर लक्ष ठेवून योग्य प्रत्युत्तर देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्याला माओवाद्यांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे, तरच आपण त्यांची वाढणारा प्रभाव थांबवू शकतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@