मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची सद्यस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019   
Total Views |




मुंबईतील सध्याच्या सार्वजनिक परिवहन सेवेविषयी प्रथमच एका खाजगी कंपनीतर्फे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून समोर आलेले काही निष्कर्ष आणि मुंबईतील वाहतुकीच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...


मुंबईतील प्रचंड विकास व लोकसंख्या यांना योग्य तो न्याय देण्याकरिता सध्याची सार्वजनिक परिवहन सेवा (Public Transport Service) समाधानकारक नसली तरी, पुढील काही वर्षात त्यात भरपूर सुधारणा आवश्यक आहेत. यासंबंधी मुंबईतील पायाभूत कामांविषयी आंतरराष्ट्रीय ‘एईसीओएम’ तज्ज्ञ कंपनीने सर्वेक्षण केले होते. ‘एईसीओएम’ कंपनीने मुंबईतील १ हजार, ८८ लोकांना प्रश्न विचारून सध्याच्या सार्वजनिक परिवहन सेवेविषयी प्रथमच सर्वेक्षण केले. त्यात त्यांना आढळले की,

 

. ७५ टक्के मुंबईकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर सुखी नाहीत व त्यामुळे नागरिकांवर फार ताण पडतो.

. ५८ टक्के लोकांनी सांगितले की, ते प्रवासासाठी अधिक भाडे देण्यास तयार आहेत, पण या परिवहन सेवेत सुधारणा झाली पाहिजे.

. ८२ टक्के लोकांनी सांगितले की, ही सार्वजनिक परिवहन सेवा खाजगी केली, तर जास्त सुखावह ठरेल.

. ६० टक्के लोकांनी सांगितले की, आपला देश इतर देशांपेक्षा चांगली परिवहन सेवा देण्यामध्ये फारच मागे पडला आहे.

. ६९ टक्के लोकांनी सांगितले की, परिवहन सेवेच्या सुधारणांकरिता प्रशासन बऱ्याच वेळेला तात्पुरते मार्ग शोधते.

. ५१ टक्के लोकांनी सांगितले की, या पायाभूत सेवेच्या निधी मिळविण्याच्या कामात प्रशासन योग्य पावले उचलते.

. ४७ टक्के लोकांनी सांगितले की, मोठे प्रकल्प साधारणपणे वेळेत पूर्ण होतात.

. ५० टक्क्यांहून जास्त लोकांनी सांगितले की, प्रशासन लोकांच्या सूचनांना दाद देते व त्यात तात्पुरत्या मार्गांनी सुधारणा घडविते.

 

सार्वजनिक परिवहन सेवेमध्ये रेल्वे, मेट्रो बेस्ट बससेवांचा समावेश होतो. परंतु, मागील पाच वर्षांहून अधिक काळाकरिता ‘बेस्ट’ तोट्यात चालली आहे व त्याकडे सरकार व बृहन्मुंबई महानगरपालिकेने लक्ष दिले नाही. परंतु, या बससेवेतही लक्ष घालून मिनी बससेवा व इलेक्ट्रिकवर चालणारी बससेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. रिअल इस्टेटमधील दर्दी निरंजन हिरानंदानी यांनी चर्चेत स्पष्ट केले की, प्रशासन पुढील काही वर्षांत सार्वजनिक परिवहन सेवेकरिता २.७५ लाख कोटी रुपये खर्च (अमेरिकन डॉलर ३० अब्ज) करणार आहे व त्यातून मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. गेल्या ७० वर्षांत मुंबईकरांच्या वाट्याला या लोकहित परिवहन सेवेकरिता फक्त अमेरिकन डॉलर तीन बिलियन खर्च झाला आहे. मुंबईत ५० टक्क्यांहून जास्त वस्ती झोपडपट्टीची आहे व परिवहन सेवेच्या ‘पीपीपी’ तत्त्वावर चालणारे प्रकल्प या झोपडपट्ट्यांमुळे, जीएसटीमुळे व काही त्रासदायक राजकीय निर्णयांमुळे खंडीत पडण्याची शक्यता निर्माण होते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्य अधिकारी अश्विनी भिडेही चर्चेकरिता उपस्थित होत्या. भूखंडांचा योग्य वापर, ते भूखंड योग्य रितीने जोडले जाणे व निधीचा योग्य वापर हे मुंबईच्या परिवहन क्षेत्रातील मुख्य विकासाचे मुद्दे आहेत. जगभर हल्ली मेट्रोचे प्रकल्प बांधले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. परंतु रेल्वे, मेट्रो प्रकल्प व मोठी रस्त्याची कामे यात केंद्र व राज्य प्रशासनाने भरीव कामगिरी केली आहे. 


रेल्वे सेवा

 

एमयुटीपी प्रकल्प ‘३ अ’ला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून ५४ हजार, ७७७ कोटी किंमतीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच आधी मंजुरी दिलेल्या कामापैकी एमयुटीपी रेल्वे प्रकल्प ‘३’ची १० हजार, ९४७ कोटी किंमतीची कामे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून प्रगतिपथावर आहेत. त्यात नवीन रेल्वे मार्ग खाली दर्शविलेल्या मार्गांकरिता सर्वेक्षण काम सुरू आहे व जमीन ताब्यात घेण्याचे काम आता हातात घेतले जाईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विरार ते डहाणू दोन नवीन रेल्वे ट्रॅक, ऐरोली ते कळवा नवीन रेल्वे ट्रॅक व पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे ट्रॅक

 

मेट्रोची कामे

 

दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या मेट्रो प्रकल्पांना नोव्हेंबर २०१८ पर्यंत मंजुरी दिली आहे. त्यानुसार मेट्रोच्या कामाची प्रगती खालीलप्रमाणे होत आहे.

 

८० ते ९० टक्क्यांहून जास्त प्रगती

 

. मेट्रो ‘मार्ग ७’ (दहिसर ते अंधेरी पूर्व १६.५ किमी उन्नत) व ‘मार्ग २ अ’ (दहिसर ते डीएन नगर १८.५ किमी उन्नत) हा मार्ग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.

. मेट्रो ‘मार्ग ३’ कुलाबा ते सीप्झ ३३.५ किमी भूमिगत) या कामातील बोगद्याची ८० टक्के कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे व पहिल्या टप्प्याचे काम २०२१ मध्ये सुरू होईल.

 

मध्यम प्रगती

 

. मेट्रो ‘२ ब’ (डीएन नगर ते मानखुर्द २३.५ किमी उन्नत)

. मेट्रो ‘मार्ग ४’ (वडाळा ते कासारवडवली ३२ किमी उन्नत) सर्व कामांच्या ठिकाणी मे २०१९ पर्यंत बॅरिकेट्स लावणे अपेक्षित आहे.

. मेट्रो ‘मार्ग ५’ (ठाणे-भिवंडी-कल्याण २४ किमी उन्नत)

. मेट्रो ‘मार्ग ६’ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी १४.५ किमी उन्नत)

 

नियोजनातील मेट्रोची कामे

 

. मेट्रो ‘मार्ग ४ अ’ (कासारवडवली ते गायमुख ३ किमी उन्नत)

. मेट्रो ‘मार्ग ७ अ’ (अंधेरी ते मुंबई विमानतळ तीन किमी उन्नत, अंशत: भूमिगत)

. मेट्रो ‘मार्ग ८’ (मुंबई विमानतळ ते प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ ३५ किमी उन्नत, अंशत: भूमिगत)

. मेट्रो ‘मार्ग ९’ (दहिसर ते मीरा रोड १०.५ किमी उन्नत)

. मेट्रो ‘मार्ग १०’ (गायमुख ते मीरा रोडमधील शिवाजी चौक ९ किमी उन्नत)

. मेट्रो ‘मार्ग ११’ (वडाळा ते सीएसएमटी १४ किमि उन्नत)

. मीरा रोड ते विरार ३७ किमी उन्नत

 

मोठे महत्त्वाचे रस्ते प्रकल्प

 

. मुंबई ट्रान्स हार्बर सी-लिंक : अंदाजे प्रकल्पाचा खर्च रुपये १७ हजार, ८४३ कोटी. एमएमआरडीएकडून सप्टेंबर २०२२ पर्यंत या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे मुंबई व दक्षिणेकडील नवी मुंबई क्षेत्र जोडले जाईल.

 

. पश्चिम किनारा मुक्त मार्गाचे काम - (प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली) : १० किमी लांब किनारा रस्ता प्रकल्पाचे काम सुमारे ४ हजार कोटी रुपये मुंबई महापालिका बघणार व सी-लिंकचे काम सुमारे १० किमी काम एमएसआरडीसीकडून बघितले जाणार आहे व सी-लिंक प्रकल्पाची स्थूल किंमत ७ हजार कोटी आहे. रस्त्याच्या कामाला नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरुवात झाली. वांद्रे ते वर्सोवा सी-लिंक पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 

. समृद्धी द्रुतगती मार्ग : हा मार्ग सुमारे ७१० किमी लांबीचा असून तो जवाहर पोर्ट ट्रस्ट (गछझढ) ते नागपूरपर्यंत असेल. या प्रकल्पाला लागणाऱ्या खाजगी ७,२९० हेक्टर जमिनींपैकी ८० टक्क्यांहून जास्त जमीन सरकारने संपादित केली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम केव्हाही सुरू होऊन तीन ते चार वर्षांत ते पूर्णत्वास जाईल, असे प्रकल्पचालक एमएसआरडीसी म्हणत आहेत. प्रकल्पाची स्थूल किंमत ४९ हजार, २५० कोटी रुपये आहे. या मार्गालगत २२ स्मार्ट शहरे वसविली जाणार आहेत. याशिवाय या प्रकल्पामुळे जेएनपीटी बंदराचा फायदा २४ जिल्ह्यांना होणार आहे.

 

. विरार ते अलिबाग मार्ग : हा प्रस्तावित मार्ग अनेक शहरांचा विकास साधणारा व जेएनपीटी बंदर व नवीन विमानतळाला जोडणारा आहे. याची लांबी १२६ किमी असून, रूंदी ट्रकच्या सोयीसाठी आठ पदरांची ९९ मीटर राहणार आहे. अंदाजे प्रकल्पाची किंमत १४ हजार कोटी रुपये आहे.

 

. भिवंडी-कल्याण-शीळफाटा उन्नत मार्ग : १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सहा पदरी २१ किमी मार्गाच्या नूतनीकरण प्रकल्पकामाला एमएसआरडीसीकडून सुरुवात होऊन लवकरच ते पूर्ण होईल. प्रकल्पाची किंमत ३८९ कोटी रुपये आहे. हा प्रस्तावित मार्ग अनेक मार्गांना जोडणारा ठरणार आहे.

 

. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावरील सुधारित कामे : वाहतूक वाढल्यामुळे मुंबई-वाशीकरिता ७७५ कोटी रुपये किंमतीचा तिसरा दुहेरी पूल सध्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूंना बांधला जाणार आहे, ज्यामुळे सध्याच्या १० मार्गिका असलेल्या पुलाच्या १४ मार्गिका होतील. मुंबई-पुणे गर्दीच्या रहदारीला चांगलाच दिलासा मिळेल.

 

. ऐरोली ते काटई मार्ग : एमएमआरडीए सहा पदरी १२.३ किमी मुक्त मार्गाचे काम सुरू करणार आहे. यातून मुंबई, ठाणे-बेलापूर, कल्याण व बदलापूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. प्रकल्पाची स्थूल किंमत ९५० कोटी रुपये आहे व हा प्रकल्प पुढील ४० महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@