दृष्टी नसली तरीही चालेल मात्र दूरदृष्टी हवी, या ओळी आपल्या आयुष्यात तंतोतंत खर्या ठरवत जीवनपटलावर अजिंक्य ठरलेल्या दर्पण इनानीचा प्रवास अनेकांना प्रकाश देणारा आहे.
‘मनुष्याला दृष्टी नसेल तर...’ असा साधा विचारही मनात आला तरीही त्याची कल्पना करवत नाही. मात्र, या कमजोरीवर मात करत आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत दर्पण इनानी हा तरुण बुद्धिबळपटू म्हणून नावारूपास आला. इतकेच नव्हे, तर बुद्धिबळात त्याने भारताला कांस्यपदकही मिळवून दिले. स्वतःसह देशाचे नाव उज्ज्वल करणार्या या अवलीयाचा आजवरचा प्रवासही तितकाच खडतर होता. दर्पण इनानीचा जन्म १४ फेब्रुवारी, १९९४ मध्ये वडोदरा येथे झाला. सतीश इनानी आणि विमला इनानी यांना पुत्ररत्न झाल्याचा आनंद तर होताच, मात्र अवघ्या तीन वर्षांत त्यांच्या या सुखाला दृष्ट लागली.
शाळेत गेल्यावर तिसर्या दिवशीच त्याच्या तब्येतीची तक्रार येऊ लागली. सुरुवातीला साधा ताप असल्याने काही दिवस उपचार सुरू करण्यात आले. त्याला ‘स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम’ नावाचा आजार झाला होता. या व्याधीने ग्रस्त असलेल्या दर्पणला या कोवळ्या वयात यातना सहन कराव्या लागल्या होत्या. दर्पणला झालेल्या आजारामुळे त्याच्या त्वचेवर व्रण उमटू लागले होते. त्वचेतील पेशींचा मृत्यू झाल्याने चेहरा विद्रुप दिसू लागला होता. शरीरातून मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडत होती. हा दाह इतका होता की, इवल्याशा दर्पणचे अश्रूही सुकून जात. काही दिवसांनी डोळ्यांनी दर्पणला अंधूक दिसू लागले. दर्पणला वेदना सांगणेही कठीण होत होते. डॉक्टरांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे पालकांना बोलूनही दाखवले होते. सलग २० ते २५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि एक दिवस दर्पण दृष्टी गमावून बसला. इनानी दाम्पत्यासमोर एकेक संकट आ वासून उभं राहत होतं. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता मुलाला योग्य ते उपचार देत त्याच्या आजारपणात त्याची योग्य काळजी हे दाम्पत्य घेत होतं. स्वतःच्या चेहर्यावर हसू ठेवून ते मुलाला ‘तू लवकरच बरा होशील,’ असे आश्वस्त करत होते.
हळूहळू दर्पण उपचारांना साथ देत होता. मात्र, त्याची दृष्टी परत येणार नव्हती. काहीही झाले तरीही आजवर जसे लढलो, तसेच यापुढेही परिस्थितीशी झुंज देऊ, असा निर्धार दर्पण आणि त्याच्या आईवडिलांनी केला होता. त्यानुसार सारं काही ठरलं. दर्पणला शाळेत पाठवण्याची वेळ आली.दिव्यांग मुलाप्रमाणे दर्पणला विशेष शाळेत पाठवण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. मात्र, माझा मुलगा अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच शाळेत जाईल, तिथेच धडपडत स्वतःला सावरेल. कोणत्याही शाळेत शिकण्याचा त्याला अधिकार आहे, असे म्हणत त्याच्या पूर्वीच्याच अलकपुरीतील वडोदरा हायस्कूल येथे पाठवण्यात आले. दर्पणलाही शाळेची गोडी लागली होती. संपूर्ण शाळेत तो एकमेव दिव्यांग विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार असल्याने तो सर्वांचा लाडका बनला. दर्पण पहिली ते दहावीपर्यंत नेहमी पहिल्या तीन क्रमांकावरच कायम राहिला. त्याला कायम ९० टक्क्यांपर्यंत गुण मिळत. पुढे अकरावी-बारावीत उत्तम यश मिळवत त्याने प्रथम क्रमांक मिळवला. अभ्यासाबरोबरच हार्मोनियमआणि तबलावादन हे छंदही त्याने जोपासले होते. वयाच्या तेराव्या वर्षी शाळेतील एक खेळ म्हणून तो बुद्धिबळ खेळू लागला.
‘ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन’मध्ये जाऊन त्याने दृष्टिहीनांसाठी तयार करण्यात आलेला बुद्धिबळ समजून घेतला. वडिलांनीही तसाच बुद्धिबळाचा संच दर्पणला आणून दिला. नियम आणि सोंगट्यांची चाल, अशा साधारण गोष्टी त्यांनी शिकवल्या. त्यावेळी वडोदर्यात अंध खेळाडू विरुद्ध सामान्य खेळाडू, अशी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. झहीर भाटकर याच्याविरोधात दर्पण खेळत होता. झहीरने चुकीची चाल खेळल्याचे वाटून त्याची तक्रार दर्पणने केली. मात्र, झहीरने त्याला चाल समजवत ती योग्य असल्याचे सांगितले. दर्पण हा डाव जिंकू शकला नाही. मात्र, या प्रसंगानंतर त्या दोघांची चांगली मैत्री झाली. झहीरने दर्पणला बुद्धिबळातील प्रशिक्षक शोधण्यासाठी मदत केली. बुद्धिबळासंबधींची सर्व माहिती झहीरने दर्पणला दिली. युट्युबवर बुद्धिबळपटूंचे असलेले व्हिडिओ दर्पणला पाहणे शक्य नव्हते. झहीरने असे असंख्य व्हिडिओ पाहत दर्पणला त्याविषयी माहिती पुरवली. यानंतर प्रशिक्षणही जोरात सुरू झाले. दर्पणने मागे वळून पाहिले नाही.
आज भारताचा सर्वाधिक मानांकन असलेला अंध बुद्धिबळपटू अशी ओळख दर्पणने निर्माण केली आहे. २०१३ साली त्याने ‘वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशीप’ स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. ‘क्रिओन’ या फ्रान्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याच्या या योगदानाबद्दल ‘मारवाडी युवा मंचा’तर्फे ‘युवारत्न’ पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले आहे. ‘युमा टेलिव्हिजन’तर्फे त्याला ‘नवरत्न’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. ‘एचडीएफसी लाईफ’ने दर्पणवर आधारित एक जाहिरात तयार केली आहे. त्याचे स्वतःचे युट्युब चॅनलही आहे. एक यशस्वी बुद्धिबळपटू असलेल्या दर्पणला सनदी लेखपाल होण्याची इच्छा आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे शुभेच्छा...!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat