संतापजनक! नांदेडमध्ये ४०० जणांचा पोलिसांवर हल्ला

    30-Mar-2021
Total Views |
Nanded_1  H x W

 
 
नांदेड : होळी सणानिमित्त दरवर्षी शीख बांधव ‘हल्ला-महल्ला’ मिरवणूक काढतात. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, परवानगी नसतानाही काही तरुणांनी मिरवणुकीची तयारी केली होती.



याच दरम्यान, सायंकाळी ४.३० - ५ वाजताच्या सुमारास पोलीस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी ४०० जणांच्या जमावाने लाठ्या - तलवारींसह तेथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता १७ जणांवर कारवाई केली असल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये 'लॉकडाऊन' असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्ला-महल्ला मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच सर्व धर्मगुरू यांच्याशी चर्चा करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तसेच गुरुद्वारामध्येच हा उत्सव करण्याचे ठरले होते. मात्र, तेथील एका जमावाने वाद घालत पोलिसांशी हुज्जत घातली आणि वाद चिघळला होता. 



सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा होते. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. पोलिसांशी हुज्जत घालून जमावाने बॅरिकेड्स तोडले. यामुळे तणाव निर्माण झाला. दरम्यान, यामध्ये चार पोलीस जखमी झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी दिली. एक पोलीस महिला गंभीर जखमी असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.