नवी दिल्ली : बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी वायुसेनेने घुसखोरी केल्यानंतर आता नवी दिल्लीत वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ही बैठक सुमारे तासभर सुरू होती.
दरम्यान पाकिस्तानने चर्चेची तयारी दाखवली आहे. इम्रान खान यांच्याकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात आली आहे. दिवसभरातील ही पंतप्रधानांची दुसरी बैठक आहे. या प्रकरणी अद्याप सविस्तर वृत्त हाती आलेले नाही. या बैठकीला एनएसएचीही उपस्थिती आहे.
सकाळी टेहळणी करणारे भारतीय वायू दलाचे MI-१७ हे हेलिकॉप्टर येथील बडगाम जवळील गारेंद गावात कोसळले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने आता आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव करत आहे. पाकिस्तानने दोन पायलटना ताब्यात घेतल्याचे म्हणत एकावर उपचार सुरू असल्याचे सांगितले होते. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ही माहिती देण्यात आली होती आता मात्र, एकच वैमानिक आमच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान भारताने दोन्ही पायलट आमच्या हवाली करावेत, अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानने पायलट अभिनंदन यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानच्या चर्चेच्या प्रस्तावावर भारत विचार करेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat