लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव : भाग ४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


tilak_1  H x W:


एखादे सार्वजनिक कार्य हाती घेतल्यावर त्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेत ते कार्य पुढे न्यावे लागते, वाढवावे लागते. आपण सुरू केलेले कार्य मोठ्या प्रमाणात वाढवले तर ते नेतृत्व यशस्वी झाले असे समाज मानतो. कार्य अर्धवट टाकून गेलेल्यांना ‘आरंभशूर’ म्हणतात. सार्वजनिक गणपती पहिल्या वर्षी ज्यांनी बसवला त्यांच्यात टिळकांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी टिळकांनी या उत्सवाचे तोंड भरून कौतुक केले. दुसर्‍या वर्षी टिळकांनी बारीकसारीक गोष्टीत स्वतः लक्ष घातले, या उत्सवासाठी मेहनत घेणार्‍यांची ‘केसरी’तून जाहीर पाठ थोपटली, जिथे काही कमी-जास्त झाल्यासारखे वाटले त्यांचे कानही धरले. तिसर्‍या वर्षी तर टिळकांनी उत्सवाची सगळी सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. टिळक गणेशोत्सवाचे प्रणेते ठरले.



सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल चर्चा करताना आतापर्यंत बर्‍याच ऐतिहासिक घटनांचा वेध आपण घेतला
. अगदी पेशवाईच्या काळात साजरा होणारा दरबारी थाटाचा गणेशोत्सव, त्यानंतर ब्रिटिश राजवटीमुळे गणेशोत्सवाचे बदलत गेलेले स्वरूप आणि १८९० नंतरच्या काळात या गणेशोत्सवाचे सार्वजनिकरीत्या झालेले पुनरुज्जीवन! १८९३ साली साजरा केल्या गेलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा ग्वाल्हेरच्या दरबारात साजरा होणार्‍या गणपतीच्या उत्सवापासून नानासाहेब खाजगीवाले यांनी घेतली आणि इकडे तशाच पद्धतीचा उत्सव सुरू करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांना गळ घातली. यातूनच भाऊ रंगारींच्या घरी सभा भरली आणि सार्वजनिक स्तरावर गणपती बसवण्याचे नक्की होऊन तसा तो उत्सव साजरा झालाही. लोकमान्य टिळकांनी जरी आपला स्वतःचा सार्वजनिक स्वरूपाचा गणपती १८९४ साली विंचूरकर यांच्या वाड्यात बसवला असला तरी त्यापूर्वीच पुण्यात नानासाहेब खाजगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि भाऊ रंगारी यांनी १८९३ साली गणपती बसवला होता, याचे संदर्भ पूर्वी सांगितले आहेत. गणपतीच्या मिरवणुकीला आलेले वेगळेपण खुद्द लोकमान्य टिळक मान्य करतात, तर मग आम्ही तरी त्यावर वाद कशाला घालावा? टिळकांनी त्यावर लेखनही केले आहे, त्यामुळे टिळकांच्याही पूर्वी पुण्यात सार्वजनिक गणपती बसवला जाऊ लागला होता हे मान्य करायलाच हवे. टिळकांच्या पूर्वी पुण्यात सार्वजनिकरित्या गणपती बसवला जात असे हे मान्य केले तरी, त्याचे स्वरूप नेमके कसे होते? पुढे स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी टिळकांनी या उत्सवाचा जसा साधन म्हणून वापर करून घेतला तसा काही हेतू या उत्सवकर्त्यांचा होता का, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.



गणेशोत्सवाचा विचार करताना आपण सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की
, या उत्सवाला सुरुवातीच्या काळात धार्मिक पार्श्वभूमी होती. किंबहुना पूजा-अर्चा, भजन-पूजन हे सर्व या उत्सवाचा अविभाज्य भाग होता. उत्सवाचे सुरुवातीचे स्वरूप हे बव्हंशी धार्मिक होते. हिंदू-मुसलमान दंगे एकीकडे सुरू असताना हिंदूंना एकत्र येण्यासाठी त्यांच्या हक्काचे एक साधन, व्यासपीठ या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिळाले होते. त्यामुळे गणपतीच्या या नव्या सार्वजनिक उत्सवाला वेगळेपण आपोआपच आले होते. गणेशोत्सवाचे महत्त्व टिळकांनासुद्धा वाटत होते. ते लिहितात, ‘ठिकठिकाणी बसविलेले सार्वजनिक गणपती, त्याजपुढे हौसेने लोकांनी केलेली आरास, शेकडो भजनी मेळ्यांचे सुबक व सुरेख पोशाख आणि मधुर गाणी ही ज्यांनी प्रत्यक्ष पहिली किंवा ऐकली असतील त्यांस राष्ट्रातील सर्व लोकांकरीता व सर्व जातीकरिता गणपत्युत्सवासारखा एखादा सार्वजनिक उत्सव असणे किती जरूर आहे हे तेंव्हाच कळून येईल.’ (केसरी - इ. ३ सप्टेंबर १८९५)



आजवर हिंदूंच्या धर्मिक बाबतीत ब्राह्मण समाजाचे वर्चस्व अधिक असल्याने हा नवा उत्सव ब्राह्मणांनी सुरू केलेला आहे
. उच्चवर्णीयांची ही नवी टूम आहे असा लोकांचा भ्रम होऊ शकला असता. तसे जर झाले तर ते उत्सवाचा दृष्टीने धोक्याचे असेल. अशाने लोकांच्या मनात जातीय द्वेष निर्माण झाला. भाऊ रंगारी, घोटवडेकर, खाजगीवाले, यांनी गणपती बसवला तेव्हा सर्व जातींची मंडळी बैठकीस हजर होती हे मागे सांगितले आहेच. तरीही पुढे जसजसे गणपतीचे स्वरूप वाढू लागले तसे गणपती ही केवळ ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी न होता तो उत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी टिळकांनी फार मोठे प्रयत्न केले, किंबहुना त्यांना ते जाणीवपूर्वक करावे लागले. ब्राह्मण, मराठे हा वाद तयार होऊ नये म्हणून टिळकांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन त्यांच्या एकोप्याचा आदर्श दोन्ही समाजापुढे जाणीवपूर्वक घालून दिला होता. सुरुवातीची दोन-तीन वर्षं नव्याची नवलाई होती. या काळात या नव्या उत्सवाची वाढ हळूहळू टप्प्या-टप्प्याने होत असल्याने या उत्सवाबद्दल लोकांच्या मनात जातीय करणारे गैरसमज तरी तयार होऊ नयेत याची खबरदारी टिळकांनी घेतली. टिळकांना हा उत्सव जमेल त्या मार्गाने लोकप्रिय करायचा होता. जातीपातींमध्ये तेढ उत्पन्न होऊ न देता उत्सवाला लोकप्रियता मिळवून द्यायची, अशी योजना त्यांच्या मनात होती.



मुसलमान दंग्याची पार्श्वभूमी असल्याने गणपतीच्या निमित्ताने लोक एकत्र येऊन त्यांच्यात स्वधर्माचा अभिमान जरी बळावला तरी पुरे
, अशा आशेने सुरुवातीच्या काळात टिळक गणेशोत्सवाची योजना करत होते, असे दिसते. सुरुवातीच्या काळात टिळकांनी लिहिलेल्या लेखांमध्ये भजन-पूजनाचा थाट, स्वधर्माचा गौरव, भक्तीरसाने ओथंबलेली गाणी असे शब्द अधिक दिसतात, यावरून हा उत्सव सुरुवातीला कसा धार्मिक स्वरूपाचा होता आणि या धार्मिकतेमधून लोकांची जूट साधली जावी, असा त्यांचा हेतू होता याची खात्रीच पटते. यातला दुसरा मोठा भाग मेळ्याचा होता, त्या मेळ्यात सोंगाचे खेळ होत असत, त्यानिमित्ताने लोक एकत्र येत असत, हे मेळे म्हणजे केवळ मनोरंजन असाही लोकांचा समज होण्याची शक्यता होती. हे मेळे पाहून हा उत्सव म्हणजे केवळ मनोरंजनासाठीचे काहीतरी आहे - धर्माचा, परंपरेचा यात काय संबंध? स्वधर्माची याला जोड नाही असेही लोकांना वाटणे स्वाभाविक होते, पण तसे होऊन चालणार नव्हते. गणेशोत्सवात मेळे वगैरे होत तेही लोकांना फारसे पचनी पडत नसत, त्यामुळे गणपती उत्सवाबद्दल लिहिताना हे केवळ नाचगाणी आणि करमणुकीचे साधन म्हणून हा उत्सव नाही तर लोकांनी एकत्र येण्यासाठीचा, आपल्या धर्माचा, आपल्या देवाचा हा मोठा उत्सव आहे हे लोकांच्या पचनी पाडण्यासाठी टिळकांना भरपूर लेखन करावे लागले. मेळ्याचे स्वरूप जरासे बिघडू लागले की प्रसंगी मेळेवाल्यांना टिळक तसा इशारा द्यायलाही कमी करत नसत. उत्सवाच्या काळात समाजात जे घडत होते ते टिळक आपल्या लेखणीने लिहीत होते, सांगत होते. टिळकांनी लिहिलेले बोल सर्वदूर जात, ज्या प्रांतात गणपती उत्सव होत नव्हता, पण टिळकांचा ‘केसरी’ पोहोचत असे त्या लोकांना या उत्सवापासून प्रेरणा मिळावी, सर्वदूर हा उत्सव सुरू व्हावा, ही त्यांची भूमिका होती.



गणेशोत्सवाकडून टिळकांच्या भरपूर अपेक्षा होत्या
. त्यांच्या मनात फार दूरवरच्या योजना आजच तयार होत्या. एका अग्रलेखात टिळक लिहितात, ‘हिंदू धर्मात सण कमी आहेत असे नाही. पण त्यापैकी एक-दोन सणांखेरीज बाकी सण प्रत्येकाने आपापल्या घरी करण्याचे आहेत. त्यामुळे त्यापासून जितका सार्वजनिक फायदा व्हावयाचा तितका होत नाही. पंढरीच्या विठोबाच्या उत्सवासारखा एखादा दुसरा उत्सव सर्व लोकांना प्रिय होण्यासारखा आहे. पण हे उत्सव अथवा यात्रा पुरातन असल्याने त्याचे स्वरूप आपल्याला पाहिजे, तशा रितीचे करणे अशक्य नसले तरी बहुतेक असाध्यच आहे असे म्हटले तरी चालेल. त्यातून जो सार्वजनिक उत्सव असावयाचा तो ठिकठिकाणच्या लोकांना आपापल्या गावी करता येण्यासारखा पाहिजे, तसा विठोबाच्या यात्रेचा प्रकार नाही. ही उणीव गणपतीच्या उत्सवाने नाहीशी होईल, अशी आमची समजूत आहे. वर्षातून दहा दिवसच का होईना, पण एका प्रांतातील सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गढून गेलेले असावे, ही लहानसहान गोष्ट नव्हे व ही जर साध्य झाली तर आपल्या भावी अभ्युद्ययाचा आपण पाया घातल्यासारखे होईल.’ (केसरी - इ. ३ सप्टेंबर १८९५)




पुरातन उत्सव असल्याने आपल्याला हवे तसे स्वरूप त्यास देणे अवघड आहे
, असे टिळक म्हणतात. याचे कारण टिळकांना गणेशोत्सवाला पुरातन रूपापुरते मर्यादित ठेवायचे नव्हते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. टिळकांना वेगवेगळ्या मार्गाने या उत्सवाचा उपयोग करून घ्यायचा होता. सुरुवातीची वर्षं यासाठी त्यांना महत्त्वाची वाटत होती. अगदी आरंभीच्या एक-दोन वर्षात उत्सव पार पडल्यानंतर टिळक स्वतः ‘केसरी’त अग्रलेख लिहून मिरवणुकीत गैरप्रकार होऊ न दिल्याबद्दल आणि शांतता व सुव्यवस्था राखल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानत असत. देखावे, मेळे यांचे ‘केसरी’तून जाहीर कौतुकही करत. प्रसंगी काही चुकीचे घडताना दिसले तर त्यावर बोट ठेवून ते सुधारण्याचा मार्गही टिळक सांगत. टिळकांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाची ही पावती म्हणावी लागेलतुम्ही म्हणाल, या सगळ्यात भाऊसाहेब किंवा त्यांचे सहकारी कुठेच दिसत नाहीत. सार्वजनिक उत्सवाच्या आरंभाचे श्रेय त्यांना दिले तरी लोकजागरणाचे आणि पुढच्या नेतृत्वाचे काय? सुरू केलेल्या कार्याला नेतृत्व नसेल तर ते कार्य पुढे कसे चालणार? केवळ उत्सव सुरू करून फायदा, काही साधले जात नसते तर हाती घेतलेले कार्य पुढेही तसेच सुरू राहावे यासाठी लढावे लागते, खरी कसोटी तेव्हा लागते. भाऊसाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा उत्सव सुरू केला खरा पण त्याचे नियोजन, आयोजन आणि सर्वसमावेशक नेतृत्व करायला टिळक पुढे झाले नसते तर.....?

(क्रमशः)

-पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@