डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सर्वार्थाने जागरुक आणि जीवित ठेवणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भडगावची 'जागृती' ही सामाजिक संस्था. अगदी किल्लारीच्या भूकंपापासून ते हल्लीच्या विद्यार्थ्यांना संगणकजागृत करणारा या संस्थेचा कार्यव्याप. तेव्हा, आंबेडकरांच्या विचारांचे बीज समाजमनात आपल्या कार्याने रुजवणाऱ्या या संस्थेविषयी...
जळगाव जिल्ह्यातील भडगाव हे तसे शहरवजा खेडे. लोकसंख्या जेमतेम ६० हजारांच्या आसपास. पुराणकाळापासून इतिहासाचा वारसा लाभलेले आणि साहित्यक्षेत्रात केशवसुतांच्या वास्तव्याने पावन झालेले... पराक्रम म्हणाल तर पेशव्यांची उत्तरेतील स्वारी भडगावला निवासाला होती. जोडीला होता लाडकूबाईचा इतिहास. भृगुऋषींच्या वास्तव्याने आणि स्वामी चक्रधरांच्या स्पर्शाने पावन झालेले, गिरणानदीच्या काठावर वसलेले सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक वारसा लाभलेले असे हे अनुभवसमृद्ध गाव म्हणजे भडगाव. याच भडगावात गेल्या २७ वर्षांपासून थोरामोठ्यांचा वारसा जपत जागृती मित्रमंडळ स्वामी विवेकानंदांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांची समाजक्षेत्रात पेरणी आणि उधळण करीत आहे. विषय कुठलाही असो, त्यात नावातच 'जागृती' असलेली ही मंडळी सदैव जागृत आहेत. मग तो १९९३चा किल्लारीचा भीषण भूकंप असो की मुंबईतील २६/११चा हल्ला अथवा संसदेवरील आक्रमण... उपेक्षितांच्या मदतीला धावून जाण्यापासून ते वाचन संस्कृती संपन्न करणे असो की, सांस्कृतिक कार्यक्रमाचे जागरण असो, 'जागृत' मंडळी सदैव सज्ज असल्याचे आपणास दिसून येईल. १९८५ पासून समाजसेवेचा सुरू झालेला प्रवास हा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक क्षेत्रात आजही अविरतपणे सुरू आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, त्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष दत्तूभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागृती मंडळ' सुरू झाले. खरेतर निमित्त होते गणेशोत्सवाचे, पण पाहता पाहता समाजातल्या सर्व समस्यांना स्पर्श करण्याचा त्यांना ध्यास लागला. त्यातला त्यात जमेची बाजू म्हणजे, सर्व उच्चविद्याविभूषित आणि जात, पात, पंथभेद विसरून काम करणारा तरुणवर्ग असताना काम जोरात होणार, यात शंकाच नव्हती. त्यातल्या त्यात १९९३च्या भूकंपाने मराठवाड्यात कहर केलेला असताना लातूरमध्ये खानदेशातून मदतीचा पहिला हात उभा राहिला, तो 'जागृती'च्या माध्यमातून. मग ओडिशाचे १९९९चे वादळ असो की भूजचा भूकंप, सांगली कोल्हापूरचा पूर असो की ग्रामीण भागात एखाद्याचा संसार उभा करणं असो, 'जागृती' सदैव जागृत आहे.
गरीब शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो की, त्या काळात (१९९० ते २०००) संगणकाची ओळख ग्रामीण भागात व्हावी म्हणून संगणक प्रशिक्षण शिबीर असेल, हे सगळं 'जागृती'ने स्वबळावर 'करून दाखवले.' भडगाव शहर व परिसरात उपेक्षित वस्तीत बाल संस्कार सुरू करण्याचा मान हा 'जागृती'चाच आहे. स्वातंत्र्य मिळून देश पन्नाशी पार करत होता, पण आजही आदिवासी पाड्यावरती या देशाचा तिरंगा फडकला नव्हता. तो तिरंगा वाडी वस्तीत जाऊन फडकवला. आज भडगाव शहरात पुण्या-मुंबईच्या धर्तीवर गणेशोत्सव मिरवणुका निघतात, तेथे गुलाल उधळला जात नाही, तर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो आणि व्यसनाने धुंद होऊन नाही तर स्वप्नांनी न्हाऊन मिरवणूक पार पडते. याचं सारं श्रेय जातं ते 'जागृती' या संस्थेला... कुणाचं दुष्काळात होरपळलेलं घर उभं करायचं असेल किंवा कुणाचे प्राण वाचवायचे असतील; फक्त कळायचा अवकाश, 'जागृती'ची मंडळी तेथे धावून गेली असे अनेक अनुभव मी स्वतः पाहिलेले आहेत. भडगाव तालुक्यात वाक नावाच्या गावात एक निर्वासितांची आश्रमशाळा आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सणावाराला घरपण देणारी आणि जनमानसाच्या आरोग्याचा विचार करणारी, मग त्यात रक्तगट तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, दंतरोग तपासणी शिबीर, एड्स जनजागृती अभियान, कर्करोगविषयक चर्चासत्र, मोतीबिंदू शिबीर, हृदयरोगावरील मार्गदर्शन एवढेच नाही, तर वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून स्वतःच्या मालकीचे १० हजार पुस्तकांचे अद्ययावत वाचनालय आज 'जागृती'च्या मालकीचे आहे, हेही नसे थोडके. गेल्या काही दिवसांपासून संस्थेचे संस्थापक दत्तूभाऊ यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिले जातो. प्रथम पुरस्कार कासूबाई मोरे यांना प्रदान करण्यात आला. कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या भागात २०० महिलांची बाळंतपणाची जबाबदारी सहज स्वीकारण्याचे त्यांचे कार्य स्पृहणीय आहे. सामाजिक चळवळीचे काम हा प्रामाणिक शिक्षकच करू शकतो, या उद्देशाने साहेबराब पाटील यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. आज भडगाव पाचोरा परिसरात जर ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा जपून तरुणांच्या मन, मेंदू, मनगट निरोगी ठेवण्याचे काम कुणी केले असेल तर ते 'जागृती' परिवाराने केले, हे निःसंशय सत्य आहे आणि म्हणूनच की काय, या संस्थेला नाशिक विभागातून गेल्या वर्षी २०१६ या वर्षाचा लोकमान्य महोत्सवातील नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राचे माजी वनविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले आहे. आज सण कुठलाही असो, कारण कुठलेही असो, प्रत्येकाच्या मनात आज 'जागृती' या नावानिशी एक जिव्हाळा निर्माण झालेला आहे.
खरे तर हा जिव्हाळा का निर्माण झाला, हे जर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला किमान ३० ते ३२ वर्ष मागे जावे लागेल, ज्यावेळी समाजक्षेत्रामध्ये सामाजिक चळवळी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा होती, त्या काळात ही माणसं समाजासाठी उभी राहिली. समाजामध्ये जेव्हा दुही पसरायला सुरुवात झाली होती आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हायला लागली, त्याच वेळेस 'जागृती'च्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या वाक्याचा सहज समाजासाठी वापर केला, नव्हे समाजात सलोखा कसा निर्माण होईल, त्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रत्ययही आला. ते वाक्य होतं, “या देशातील सामाजिक एकतेच्या मोबदल्यात कुणी मला स्वर्गातील सिंहासन द्यावयास तयार झाला तरी मला ते नको आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक व्हायचे का विनाशाचे नाईक व्हायचे, हे आपण ठरवावे. तसेच ज्यावेळी स्वतःच्या मालकीचे ग्रंथालय सुरू करावयाचे होते, तेव्हा एक वाक्य आवर्जून प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले, ''मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी रांगा लागण्यापेक्षा ग्रंथालयाच्या बाहेर पुस्तकासाठी रांगा लागल्या तर देशासाठी अधिक सोईस्कर होईल." महामानवाच्या विचारांवर प्रवास करण्याचा संकल्प हा त्याचवेळी घेतला गेला, जेव्हा 'जागृती' बाल्यावस्थेत होते. मलाच माझ्या समाजातील माणसं मोठी करता येतील, त्यांना नावारूपाला आणता येईल, हा समाज सर्वार्थाने संपन्न होईल, हा उद्देश ठेवून काम करणे हा 'जागृती' मित्रमंडळाचा स्थायी भाव सुरुवातीपासून राहिला आहे. मग कुणी प्राध्यापक, शिक्षक तर कुणी डॉक्टर, वकील, तर कुणी व्यावसायिक, शेतकरी, तर कुणी इंजिनिअर, शासकीय अधिकारी या साऱ्याचा समावेश करून शासनाच्या योजनेपासून ते प्रशासनाच्या सवलती मिळवून देण्यापर्यंत 'जागृती मंडळ' अग्रेसर आहे. सर्व जात, पात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन जेथे माझी गरज आहे, तेथे मी नक्की पोहोचले पाहिजे, जेथे माझ्या विचारांची गरज आहे, तेथे माझा विचार पोहोचला पाहिजे आणि जेथे माझ्या मदतीची गरज आहे, तेथे माझा विचार नक्की पोहोचला पाहिजे, या सामाजिक उत्तरदायित्वाने 'जागृती' आजही काम करीत आहे.