परवेझ मुशर्रफ.....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


सत्तेतून पायउतार झाल्यावर मुशर्रफने पाक राजसत्तेला मौलिक सल्ला दिला होता की, भारतावर दोन-चार अणुबॉम्ब टाकले तर तो पाकिस्तानवर २० अणुबॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान नकाशातूनच हद्दपार होईल. त्यामुळे भारताने अणुबॉम्ब टाकण्याआधी पाकिस्तानने भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावेत आणि भारताचा काटा काढावा. मुशर्रफ नेहमी भारताविरोधी वक्तव्य का करत असतील?


पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेवर साधारण प्रतिक्रिया आल्या त्या अशा की, करावे तसे भरावे किंवा परवेझ यांचा न्यायदानाच्या चौकटीत काटा काढण्यात आला, वगैरे वगैरे चर्चा जोरात सुरू आहेत. सध्या मुशर्रफ दुबईच्या इस्पितळामध्ये दाखल आहेत. पाकिस्तानच्या न्यायालयाने दिलेली शिक्षा त्यांना अविश्वसनीय वाटणार नाहीच. कारण, पाकिस्तानमध्ये नव्या राज्यकर्त्याने राजकीय जुन्या प्रतिस्पर्ध्याला गुन्ह्यात गुंतवून शिक्षा देणे, हे काही आश्चर्य नाही. किंबहुना पाकिस्तानचा हा वारसाच आहे. भारताची फाळणी होत पाकिस्तान जन्मला. अघोरी हिंसेतून, निष्पापांवर अत्याचार करत पाकिस्तान निर्माण झाला. रडणे, कुढणे, कायम अस्थिरतेचे, सत्तेचा प्रचंड हव्यास, ती मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते राक्षसी कृत्य करण्याचे नियोजन हे पाकिस्तानी नेत्यांचे ध्येय आणि प्राक्तनही. याच चिखलातले एक वाटेकरी मुशर्रफसुद्धा. परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानने राष्ट्रदोहाचा खटला चालवला. त्यानुसार त्यांना फाशीची सजा सुनावली गेली आहे. मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्तेतून पायउतार करत, लष्कराच्या बळावर सत्ता हस्तगत केली. पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली. इतकेच नाही तर लष्कराच्या बळावर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होणे, हे संविधानाला धरूनच आहे, असे संविधानामध्ये बदलही केले. पाकच्या सरन्यायाधीशांसह इतर ६० न्यायाधीशांना नजरकैदेत ठेवले. पुढे पाकिस्तानात निवडणूकही लढवली. त्यातही गोलमाल करत मुशर्रफ जिंकले. जवळजवळ एक दशक त्यांनी पाकिस्तानवर राज्य केले. हे राज्य करण्यासाठी मुशर्रफने कायम भारताची निंदा करणे, हा मंत्र आलापला. आपण भारताचे कसे कट्टर द्वेष्टे आहोत, हे व्यक्त करताना त्यांच्या वाणीने कधीही विराम घेतला नाही.

 

सत्तेतून पायउतार झाल्यावर मुशर्रफने पाक राजसत्तेला मौलिक सल्ला दिला होता की, भारतावर दोन-चार अणुबॉम्ब टाकले तर तो पाकिस्तानवर २० अणुबॉम्ब टाकेल आणि पाकिस्तान नकाशातूनच हद्दपार होईल. त्यामुळे भारताने अणुबॉम्ब टाकण्याआधी पाकिस्तानने भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावेत आणि भारताचा काटा काढावा. मुशर्रफ नेहमी भारताविरोधी वक्तव्य का करत असतील? कारण, त्यांचा जन्म १९४३ साली दिल्लीतील दर्यागंज इथे झाला. मुशर्रफची जन्मभूमी भारतीय. पुढे फाळणीनंतर मुशर्रफ परिवार पाकिस्तानात गेला. त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला आपण मुजाहिद म्हणजे पाकिस्तान बाहेरून आलेला वाटू नये म्हणून मुशर्रफ असे बेताल बोलतात. १९६५, १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताविरोधी लढणार्‍या मुशर्रफ यांना भारतीय लष्कराची ताकद माहिती होती. मात्र, तरीही पाकिस्तानी जनतेला कायमच भारतविरोधी ठेवावे म्हणून मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध पाकिस्तान आणि भारत दोघांवरही लादले. अर्थात, भारताने ते युद्ध शौर्याने जिंकले. पाकिस्तान हरला. त्यावर मुशर्रफ यांचे म्हणणे, "आम्ही भारताला त्रास देऊ शकतो." भारताने लक्षात घ्यावे तर मुशर्रफ यांचा असा पाकिस्तानी बाणा. मुशर्रफ यांच्यावर सप्टेंबर २००७ मध्ये झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि बलुचिस्तानचे अदिवासी नेते अकबर बुगती यांच्या खुनाचाही आरोप आहे. बेनझीरचे पुत्र बिलावल यांनी तर स्पष्टच केले की, परवेझ यांनी माझ्या आईला धमकी दिली होती की, पाकिस्तानच्या सत्तेमध्ये मला सहयोग करा; अन्यथा परिणाम भोगा. बुगती यांचा मुलगा तलाल बुगती याने तर मुशर्रफ यांचा खून करणार्याला २०० एकर जमीन आणि २ अब्ज रुपये इनाम देण्याचे जाहीर केले आहे. सत्ताधारी असताना अमेरिकेला दहशतवादमुक्त अभियानामध्ये मदत केली म्हणून जैश-ए-मोहम्मद आणि तालिबान्यांनीही मुशर्रफ यांना मारण्याची धमकी दिली होती. आता पाकिस्तान न्यायालयानेच मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काय म्हणावे याला? हेच मुशर्रफ म्हणाले होते की, "बाळासाहेब ठाकरे दहशतवादी आहेत आणि नरेंद्र मोदी मनोरुग्ण." आता मुशर्रफ यांच्या मते दहशतवादी आणि मनोरुग्ण कोण असेल?

@@AUTHORINFO_V1@@