नवी दिल्ली : बनावट पासपोर्ट ओळखता यावे याकरिता पासपोर्टवर कमळाचे चिन्ह छापण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. केरळमध्ये पासपोर्टवर कमळाचे चिन्ह छापण्यात आले आहे. परंतु भाजपचे चिन्ह असलेल्या या कमळावर आक्षेप घेत विरोधकांनी कमळाचेच चिन्ह का असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित याबाबतचा खुलासा केला.
यावर खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले," कमळ हे देशाचे राष्ट्रीय फुल आहे. त्यामुळे पासपोर्टवर हे चिन्ह छापण्यात आले आहे. यापुढेही पासपोर्टवर वेगवेगळी राष्ट्रीय चिन्हे छापण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट पासपोर्ट ओळखता यावे, याकरिता यापुढे पासपोर्टवर वेगवेगळी चिन्हे छापण्यात येतील.यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाणच्या परवानगीनेच हे सिक्युरिटी फिचर छापण्यात आले आहे. या पुढेही देशाची राष्ट्रीय प्रतीके, प्राणी, फळ यांसारखी चिन्हे तुमच्या पासपोर्टवर छापण्यात येतील."