मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या भूखंडाची बिनशेती (एनए) परवानगी न घेता, शासकीय मोजणी न करता, नजराणा न भरता आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत १६ तुकडे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे भूखंड खरेदीखतात 'बैल गोठ्यांसाठी' खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे खरे आहे. एकूण २५८ दस्तऐवज (डीड) नोंदवण्यात आले आहेत. मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृत दस्त नोंदणी केल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
२०१३ सालापासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुका केल्याचे त्यांनी नमूद केले. कोणते दस्त चुकीचे नोंदवले आहेत, याची येत्या सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सभागृहात माहिती दिली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच, या प्रकरणात मालेगाव (नाशिक) येथील मुद्रांक अधिकारी (स्टॅम्प व्हेंडर) झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ तसेच त्यांचे साथीदार अपव्यवहारात दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.