मुंबई : राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा आयोजित केला आहे. दरम्यान, भाजप आ. परिणय फुके यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी विधानपरिषदेत आपल्या कवितेतून या मेळाव्यावर जोरदार टीका केली.
शनिवार, ५ जुलै रोजी उबाठा गट आणि मनसेच्या वतीने वरळी डोम येथे संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले असून पावसाळी अधिवेशनात हा विषय चांगलाच गाजला. आमदार परिणय फुके यांनी एक कविता सादर करत ठाकरे बंधूंवर टीका केली.
परिणय फुके म्हणाले की, "मागील उद्धव ठाकरे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भातील अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय देण्याचे काम केले. मनसे आणि उबाठा गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे. उद्या होणारी सभा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारी सभा म्हणून त्यांनी घोषित केली पाहिजे," असे म्हणत त्यांनी सभागृहात एक कविता सादर केली.
आ. परिणय फुके यांची कविता
घरात आईला म्हणणार मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप सत्तेसाठी वेगळे झालो, आता सत्तेसाठीच एकत्र आलो लाथाडलेले जनतेने, काय करतील कोण जाणे हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारे टिपू सुलतान कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वरळी धारावीत दाखवला रुबाब, लुंगी बहाद्दूर छोटे नवाब भारत भर भाराभर चिंध्या, एक ना धड अस्तित्वाची धडपड बुडाखालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा मोडीत काढला ठाकरे ब्रँड, चहू बाजूने वाजला बँड
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....