लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव : भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |





हिंदूंचे आराध्य दैवतम्हणून आपल्या देशात गणेशोत्सवाचे पूजन पूर्वापार केले जात असे, आज जसे घरोघर उत्साहाने गणपती बसवले जातात, तसेच पूर्वीही होत असे. त्या काळात राजे-राजवाडे, मोठमोठी संस्थाने यांसारख्या मान्यवर कुटुंबात मात्र गणपती मोठ्या धामधुमीने साजरा होई. मोठ्या संस्थांचा गणपती म्हणून साहजिकच त्या संस्थानचा गणपती हा लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असे. दर्शनाच्या किंवा पूजेच्या निमित्ताने म्हणा, मोठ्या प्रमाणात सामान्य लोक यात सहभागी होत असावेत. पेशवाईनंतर ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली आणि आपल्या ताब्यात घेतली, गणपतीचा राजाश्रय जरासा ढळला. पुढे ब्रिटिश राजवटीचे चटके जाणवू लागल्यानंतर पुन्हा एकदा गणेशोत्सव चर्चेचा आणि चळवळीचा विषय म्हणून समोर आला. नव्या स्वरूपातला हा उत्सव कसा सुरू झाला, हे जाणून घेणे रंजक आहे.



गणेशोत्सव नेमका लोकमान्य टिळकांनी सुरू केला की भाऊसाहेब रंगारी यांनी
, या वादाचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहेच. परंतु, तत्पूर्वी भारतात गणपतीची कशा प्रकारे पूजाअर्चा चालत असे आणि त्या पूजेला धार्मिकतेपलीकडे काही स्वरूप कधी होते का, हेही जरा बघूया.


पेशवाईतील गणेशोत्सव

पेशवे घराण्यातील पुरुषांची गणपतीवर श्रद्धा असल्याने पेशवाईच्या काळात गणेशोत्सव प्रसिद्ध झाला, अशा काही नोंदी इतिहासात सापडतात. महाराष्ट्रात अष्टविनायकांपैकी चिंतामणी गणपतीवर माधवराव पेशवे यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्याही आधीपासून महाराष्ट्रात भट (पेशवे) घराण्यात गणपतीची उपासना चालत असे. पेशवाईत गणेशोत्सवाचे स्वरूप कसे होते, याच्या काही नोंदी सापडतात. त्यातील एक नोंद महत्त्वाची वाटते.


“महाराष्ट्रात गणपतीचे उपासक बरेच आढळतात. श्रीमंत पेशवे सरकार हे गणपतीचे उपासक होते. त्यामुळे त्यांच्या आमदानीत गणपतीच्या उत्सवास भव्य रूप येऊ लागले. श्रीमंत सवाई माधवराव यांच्या आमदानीत गणपती उत्सव शनिवारवाड्यात गणेश महालात फारच भव्य स्वरूपात होऊ लागला होता. त्यावेळी हा उत्सव सहा दिवस होत असे. गणपतीचे विसर्जनही सरकारी लव्याजम्यानिशी श्रीओंकारेश्वराच्या घाटावर नदीत होत असे. श्रीमंतांच्या वाड्यात जसा गणेशोत्सव होत असे, तसाच तो सरदार पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार वगैरे काही सरदार घराण्यात होत असे. या उत्सवात कीर्तने प्रवचने, मंत्रजागर, गायन वगैरे कार्यक्रम होत. पेशवाई गेली तरी अद्यापि ही खाजगी उत्सवाची प्रथा अनेक घराण्यातून सुरू आहे.” 
(गणेशोत्सवाची ६० वर्षे)


यावरून असे म्हणता येईल की
, गणेशोत्सवाचे स्वरूप हे सरदार, राजे किंवा मोठमोठ्या संस्थानिकांपुरते मर्यादित होते. या बड्याबड्या संस्थानांमध्ये गणेशोत्सव साजरा होई, तेव्हा सामान्य लोकही त्यात सहभागी होत. किंबहुना पूजाअर्चा, दानधर्म आणि उपासना इतकेच त्याचे मर्यादित स्वरूप असावे. त्यामुळे याही गणेशोत्सवाला ‘सार्वजनिक’ म्हणावे का, याबद्दल शंकाच आहे. या गणेशोत्सवाचा कल सार्वजनिकतेकडे नसून दरबारी राजेशाही थाटाच्या उत्सवाचा होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. पेशवाईनंतर गणेशोत्सव हा पुण्यातून भारतभर गेला असल्याची चिन्हे आहेत. हा उत्सव कशा प्रकारचा होता हे न. चिं. केळकर यांनी लिहून ठेवले आहे. ते लिहितात, “जुन्या काळी राजेराजवाडे उत्सव करीत, तेव्हा दहा दहा दिवस उत्सव चालत, रंग सफेती लावून वाडे शृंगारले जात, हत्ती घोडे शिपाई, प्यादे यांच्यासह मिरवणुकी निघत व मंडपात गाणे बजावणे पुराण, कीर्तन, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत आणि समाराधना होऊन दक्षिणा, देणग्या दिल्या जात ही गोष्ट प्रसिद्ध आहे. तसेच गणपतीपूजन हे उत्सवाच्या रितीने ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे हिंदू समाजातील यच्चयावत जाती करीत हेही सर्वांना विदित आहे.” महाराष्ट्रातल्या काही सरदार घराण्यातही गणेशोत्सव साजरा केला जात, असे अशा नोंदी असल्यामुळे या दरबारी, राजेशाही किंवा संस्थानाधिष्ठीत गणेशोत्सवापासून प्रेरणा घेऊन असा उत्सव आपल्याही संस्थानात सुरू व्हावा, असे भारतातील इतर संस्थानांना वाटले असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. दुर्दैवाने या मधल्या काळाबद्दल फार चर्चा आपल्याकडे केलीच जात नाही. पेशवाईनंतर थेट आपण सर्वचजण १८९० सालच्या किंवा त्यानंतरच्या गणेशोत्सवाची चर्चा करतो आणि वाद घालतो.



१८९० नंतर
...

असे सांगतात की, पुण्यात १८९३ साली तीन सार्वजनिक गणपती बसवले गेले आणि समारंभपूर्वक हे गणपती रस्त्यारस्त्यातून मिरवत नेण्याची पद्धत सुरू झाली. हा गणपती दहा दिवसांचा होता का, याबद्दल मतभेद असतीलही. मात्र, १८९३च्या या गणेशोत्सवाच्या नोंदी सापडतात. भाऊसाहेब रंगारी यांच्या घरात बैठक भरवली गेली आणि गणपती बसवावा असे ठरले आणि यात पुण्यातील पुढारी, धनिक मंडळी आघाडीवर होती हेही असेही काहींचे म्हणणे आहे. १८९३ सालचा सार्वजनिक गणपती त्यानंतर निघालेल्या मिरवणुकीने आकर्षक स्वरूपाचा झाला असेही म्हणता येईल.


अनंत चतुर्थीच्या दिवशी श्रींची वाजतगाजत मिरवणूक काढली गेली
. मिरवणुकीबरोबर काशिनाथ जाधव यांच्या नेतृत्वात निघालेला एक मेळाही होता. टिळकांच्या ‘केसरी’ पत्रात (दि. २६ सप्टेंबर, १८९३) रोजी उत्तेजनपर स्फुट लिहून आले होते, “यंदा येथे गणपती पोहोचवण्याचा समारंभ दरवर्षीपेक्षा निराळ्या तर्हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे. गणपती सर्व प्रकारचे हिंदूलोक पुजतात, तेव्हा गणपती पोहोचवण्याचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनायसेच करमणूक होऊन लोकसमाजाने एकदिलाने कामे करण्याची हल्लीच्या कालाची जी प्रवृत्ती आहे तिसही थोडीबहुत मदत होईल. आम्ही नव्या सभा व संस्था काढीत आहोत, त्यापेक्षा असल्या जुन्या संस्थांना थोडेबहुत नवे वळण लावून दिल्यास त्या लोकांना अधिक प्रिय होऊन लवकर चिरस्थायी होण्याचा संभव आहे. याकरिता यंदाच्या साली ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे लोकांनी आभार मानले पाहिजेत,” असे म्हणून टिळकांनीही गणपती उत्सवाला प्रोत्साहन दिले असल्याचे दिसते.



या सगळ्या प्रकरणात १८९३ साली गणपती स्थापन झाला हे निर्विवाद आहे
. काही अभ्यासक तर १९९२ साली सुरु झाला असाही दावा करतात. किंबहुना, काही निराळ्या नोंदीही सापडतात. १८९२ की १८९३ याबद्दल मतभेद असुदेत, पण १८९३ साली स्थापन झालेला गणेशोत्सव फक्त भाऊसाहेब रंगारी यांनीच सुरू केला, असा दावा करताना इतरही संदर्भ सापडतात, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्वाल्हेरच्या गणेशोत्सवातून भाऊसाहेब रंगारी यांच्या मनात ही कल्पना येण्याआधी सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले यांनी या गणेशोत्सवाला जरा वेगळे स्वरूप दिले, असे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. असे सांगतात की, १८९२ साली नानासाहेब ग्वाल्हेरला गेले होते. तेथे त्यांनी दरबारात हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात पाहिला. संस्थानिकांच्या दरबारचा गणेशोत्सव सर्व जनता एकत्र येऊन साजरा करत असे. म्हणजे पेशवाईप्रमाणेच त्याचे स्वरूप होते. याची प्रेरणा घेऊन नानासाहेब खाजगीवाले पुण्यात आले आणि त्यांनी ही कल्पना आपल्या सहकार्‍यांना बोलून दाखवली. त्यांचे सहकारी म्हणजेच घोटवडेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध वैद्य भाऊसाहेब रंगारी! या दोघांनाही ही कल्पना आवडली. भाऊसाहेब यांनी लगेचच खटपट करून सभा वगैरे भरवल्या आणि या तीनही मित्रांनी मिळून १८९३ साली पुण्यात आपापल्या वाड्यात गणपती स्थापन केले.



या सगळ्या घटनाक्रमात लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे नानासाहेब खाजगीवाले यांनी हा गणपती ग्वाल्हेर संस्थानात पाहिला
. ते स्वतः धनाढ्य असल्याने त्यांना वाटले की, असा उत्सव आपल्याकडेही सुरू व्हावा. म्हणजेच यावरून असाही निष्कर्ष निघू शकतो की, पेशवाईच्या काळात सुरू झालेला दरबारी संस्थानिकांचा गणेशोत्सव हा ग्वाल्हेरपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे नानासाहेब खाजगीवाले यांनी दरबारी गणेशोत्सवाची संकल्पना महाराष्ट्रात पुन्हा एकदा आणली असे म्हटले, तर मग भाऊसाहेब रंगारींच्याही आधी या उत्सवाचा मान नानासाहेब खाजगीवाले यांना द्यायला हवा. त्यांचे नाव घ्यायलाच हवे. गणपतराव घोटवडेकर यांनाही त्याचे श्रेय द्यायला हवे. कारण, पहिल्या वर्षीच्या गणेशोत्सवात त्यांचाही गणपती होताच. वादच घालायचे झाले तर या तिघांच्या नावावरूनदेखील वाद होऊ शकतात. मात्र, यावरून केवळ भाऊसाहेब रंगारी यांच्याच वाड्यात गणपती बसला, हे सांगणे मात्र चुकीचे आहे. भाऊसाहेब रंगारी हे या उत्सवाचे जनक आहेत, असे म्हणणारे बाकी दोघांच्या नावांबद्दल का गप्प असतात कोण जाणे?



गणेशोत्सवाचे स्वरूप महत्त्वाचे


सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक कोण
? नानासाहेब खाजगीवाले, गणपतराव घोटवडेकर, भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक? या प्रश्नांची उत्तरे शोधताना यापैकी प्रत्येकाचे वैयक्तिक विचार काय होते आणि त्यांच्या विचारातून या गणेशोत्सवाचे स्वरूप कसे आकाराला आले, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. ज्याला आपण ‘सार्वजनिक’ म्हणतो, तो गणेशोत्सव सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये खरोखर कितपत सार्वजनिक स्वरूपाचा होता, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. नानासाहेब खाजगीवाले, भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दलच्या आणखी काही दुर्लक्षित घटनांचा परामर्श ऐतिहासिक कागदपत्रे धुंडाळून घ्यायलाच हवा.



(क्रमशः)

पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@