देशात दोन दिवसात आढळले दीड लाख फ्लेमिंगो

    19-Nov-2019
Total Views | 177


'बीएनएचएस'च्या दोन दिवसीय मोजणी मोहिमेतील निष्कर्ष


लोणावळा (अक्षय मांडवकर) : 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) अंतर्गत देशातील दहा राज्यांमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय रोहित पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) मोजणी मोहिमेत दीड लाख फ्लेमिंगो पक्षी आढळून आले आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून (सिटीझन सायन्स) अशा प्रकारे देशात प्रथमच फ्लेमिंगो पक्ष्यांची मोजणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या मोजणीअंतर्गत फ्लेमिंगो पक्ष्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे.

 

'बीएनएचएस'ने 'मध्य-आशिया हवाई मार्गावरील स्थलांतरित पक्षी आणि पाणथळ जागा' या विषयावर पाच दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. मंगळवारी या परिषदेचा दुसरा दिवस पार पडला. यावेळी 'फ्लेमिंगो संवर्धन' या चर्चासत्रात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मोजणीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. 'बीएनएचएस'ने २३ आणि २४ फेब्रुवारी, २०१९ रोजी देशातील दहा राज्यांमध्ये दोन दिवस फ्लेमिंगो मोजणीची मोहिम आयोजित केली होती. यासाठी पक्षीनिरीक्षणामध्ये रस असणाऱ्या लोकांना 'सटिझन सायन्स' अभियानाअंतर्गत सहभागी करुन घेण्यात आले होते. फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्थलांतर होणाऱ्या देशातील ११३ जागांवर ही मोजणी पार पडली. या मोजणीच्या माध्यमातून दोन दिवसांमध्ये १ लाख ४० हजार ५६१ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ५१ हजार ६५५ मोठे (ग्रेटर) आणि ८८ हजार ९०६ छोट्या (लेसर) फ्लेमिंगोचा समावेश आहे.





 

देशभरातील मोजणीअंतर्गत फ्लेमिंगोंची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे. महाराष्ट्रात ११ जागांवर लोकांनी ही मोजणी करण्यात आली. यामध्ये ठाणे खाडी, शिवडी, तलावे, टी.एस.चाणक्य, भांडुप उद्दचन केंद्र, पांजे-डोंगरी, जायकवाडी, हिप्परगा तलाव (सोलापूर), सोनवाड टॅंक, पालखेड धरण आणि एकबुरजी या जागांचा समावेश होता. याठिकाणी एकूण १ लाख ३ हजार १९६ (छोटे-मोठे) फ्लेमिंगो आढळून आले. मात्र, लोकसहभागातून सुरू असलेल्या या मोहिमेला काही मर्यादा आहेत. कारण, या मोजणीला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि मोजणीच्या जागांची मर्यादा आहे. असे असली तरी लोकसहभागातून अशी मोहिम पार पडल्याने पक्षी संवर्धनासंबंधी प्रबोधनाला हातभार लागतो. 'बीएनएचएस'कडून ठाणे खाडीत दहा वर्षांकरिता फ्लेमिंगो मोजणीचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. याकरिता शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. गेल्यावर्षी या अभ्यासाअंतर्गत १ लाख २१ हजार फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबईत स्थलांतर केल्याचे जाहिर करण्यात आले होते.

 

पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतर पट्ट्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पाच वर्षांसाठी राष्ट्रीय कृती आरखड्याला मान्यता दिली आहे. या आरखड्याअंतर्गत २० स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आराखड्याचे काम सुरू असून त्यातील पाच प्रजातींचा आराखडा पूर्ण झाला आहे. त्यामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने निरनिराळे आणि त्यातही लोकसहभाग असलेले उपक्रम राबवून त्यांची संख्या मोजण्याचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेली मोजणी मोहिम त्याचा एक भाग आहे.

- डॉ. दिपक आपटे, संचालक, बीएनएचएस

 

सिटीझन सायन्स म्हणजे काय ?

सामान्य लोकांनी निसर्गात अथवा इतर वैज्ञानिक विषयात केलेली कोणत्याही स्वरूपातील निरिक्षणे, नोंदी त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या पुनरावलोकना नंतर इंटरनेट किंवा डिजिटल स्वरूपात सर्वांना सहजगत्या पाहता येईल अशा स्वरूपात जतन करणे म्हणजे सिटीझन सायन्स होय.


तीन वर्षात भारतातील स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रवासमार्ग ‘थ्री-डी’ स्वरुपात !





अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121