हर्षोल्हास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 


वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या हर्षल भोसलेने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यशोशिखर गाठले. त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...

 
 

लहानपणापासूनच आर्थिक हलाखीत दिवस काढत असलेल्या हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 'आयइएस' परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात हर्षलने या यशाला गवसणी घातली आहे. हर्षल भोसले हा सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील तांडोर गावचा. तीन बहिणी व आई असा हर्षलचा परिवार. हर्षल अवघ्या पाच वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. ग्रामपंचायतीमुळे केंद्र शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेतून सन २०११-१२ मध्ये त्यांना निवारा उपलब्ध झाला. हर्षलच्या आईने तीन मुलींची लग्नंही अगदी थाटात लावून दिली. मुलगा हर्षलनेदेखील आईने घेतलेल्या त्या कष्टाचे चीज केले.

 

हर्षलचे शालेय शिक्षण मंगळवेढ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. त्यानंतर नववी आणि दहावी तो देगाव येथील आश्रमशाळेत होता. दहावीनंतर बीड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून पदविका संपादन करून त्याने कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. येथे ही तीन वर्षे तो महाविद्यालयात 'टॉपर' होता. पदवी पूर्ण करताच त्याला भाभा अणू संशोधन केंद्रात प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली. परंतु, त्या ठिकाणी केवळ एक महिना सराव पूर्ण करत आपल्या पदाचा त्याने राजीनामा दिला. पुण्यातील ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये रुजू होत केंद्रीय लोकसेवा आयोगाची त्याने परीक्षा दिली.

 

शालेय शिक्षण घेताना हर्षल तसा वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांपैकीच एक. इतकचं नाही तर अभ्यासाची गोडी नसल्याने चक्क एक वर्ष शाळा सोडून घरी राहणेच हर्षलने पसंत केले. परंतु, यादरम्यान त्याला पुन्हा अभ्यासात रुची निर्माण झाली व मनाशी ध्येय बाळगून त्याने पुढील प्रवास सुरू केला, जो आजतागायत सुरू आहे. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला असतानाच हर्षलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. परंतु, त्यादरम्यान त्याला अभियांत्रिकी विषयातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात आले व त्याने त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे सुरू केले. २०१८च्या जानेवारीत लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती पार पडल्या. अखेर 'आयईएस'सारख्या कठीण परीक्षेत देशात अव्वल येण्याचा मान हर्षलने मिळवला.

 

हर्षलची गुणवत्ता पाहता हर्षलला खाजगी क्षेत्रातही नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध होत्या, परंतु, त्याने सरकारी क्षेत्रात सेवा करण्याचे ठरविले. याबाबत सांगताना हर्षल म्हणतो,''खाजगी क्षेत्रात भरपूर पैसे आहेत. परंतु, तिथे तुम्हाला कामाचं स्वातंत्र्य नाही. तुमचा प्रमुख तुम्हाला जे काम सांगेल, ते तुम्हाला पूर्ण करावं लागतं. त्यामुळे मी सरकारी क्षेत्रात नोकरी करायचे ठरविले." पुढे तो असंही सांगतो की, "सरकारी क्षेत्रात तुम्हाला सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. हे काम करत असताना तुम्हाला अनेक अधिकार असतात. जे अधिकार वापरून तुम्ही लोकहिताचे काम करू शकता. मला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे."

 

हर्षल भोसलेच्या यशाने तांडोर गावचे नाव संपूर्ण देशभर झळकले. कायमच दुष्काळात होरपळणार्‍या या गावाला हर्षलच्या यशाने एक नवी उमेद मिळाली. हर्षलच्या निकालाची बातमी कळताच, गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. हर्षल ज्या आश्रमशाळेत शिकला, तिथल्या शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून आला. आपण आश्रमशाळांच्या दुरवस्थेच्या, तेथील शिक्षणाच्या निकृष्ट दर्जाच्या बातम्या वारंवार वाचतो, ऐकतो. परंतु, हर्षलसारखे विद्यार्थी परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठण्यासाठी समोर येणार्‍या प्रत्येक आव्हानावर मात करत मार्ग शोधतात, आपल्या निर्धारित लक्ष्यप्राप्तीसाठी सदैव आत्मविश्वासाने पुढे चालत असतात.
 

हर्षलची ही कहाणी अनेक तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल. कारण, आजच्या तरुणांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता फार कमी दिसून येते. पण, हर्षलसारखे काही ध्येयाने झपाटलेले तरुण असतात, जे गरिबी असो वा इतर कोणतीही समस्या, त्यावर मात करत आपला प्रवास अविरतपणे सुरू ठेवतात. हर्षलला मिळालेले यश हे सर्वस्वी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या साथीचे चीज म्हणावे लागेल. डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, तीन बहिणींची लग्ने, त्यात वाईट दिवस दाखणारी गरिबी, या सगळ्यांवर हर्षलने अगदी हर्षोल्हासाने मात केली. निश्चितच हर्षलचा हा प्रवास सुकर नव्हता. पण, हार न मानता, जिद्द कायम ठेवत हर्षल हळूहूळ आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत राहिला.

 

हर्षल आणि त्याच्यासारख्या अशाच असंख्य सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या आणि भारावलेल्या तरुणांनी म्हणूनच अपयश आणि आळस झटकून या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील आत्मविश्वास जागृत करावा, हीच अपेक्षा आणि जिद्दी व प्रेरणादायी हर्षलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून लक्ष लक्ष शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@