विरोधकांचा मूळ स्वभाव जाईना...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019   
Total Views |



मोदी सरकार देशातील विविध समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असताना, ते सरकार मूळ मुद्द्यांना बगल देऊन जनतेला चंद्र दाखवत आहे, मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवत आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले राहुल गांधी यांनी केली आहे. पण, विरोधक मोदी सरकारवर टीका करीत असले तरी ते सरकार योग्य दिशेने कार्य करीत आहे, यावर जनतेचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार विविध आघाड्यांवर दमदार पावले टाकत असल्याचा अनुभव सर्व देशवासीय घेत असताना देशातील मोदी विरोधकांना मात्र सरकार काही ठोस कामगिरी करीत असल्याचे दिसत नाही. नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेसह जगातील विविध देशांकडून कौतुक होत असल्याचे पाहून आनंद होण्याऐवजी भारतातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पोटामध्ये दुखत असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप विरुद्ध अपप्रचार केल्याने आपली काय गत होते, याचा अनुभव आला असूनही विरोधक आपला मूळ स्वभाव सोडण्यास तयार नसल्याचेच दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे 'कलम ३७०' रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. सरकारच्या त्या निर्णयास संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पाठिंबा दिला. त्यामुळे तो निर्णय प्रत्यक्षात अमलात आला. जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. आता त्या राज्यामध्ये जे निर्बंध लादण्यात आले होते, ते टप्प्याटप्प्याने उठविले जात आहेत. एखाददुसरी घटना वगळता त्या राज्यात संपूर्ण शांतता असल्याचे दिसून येते. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी, काश्मीरमधील निर्बंध उठविल्यास तेथे 'रक्तपात' होईल, असे जे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले होते, ते खोटे ठरत असल्याचेच स्पष्टपणे दिसून येत आहे. जम्मू -काश्मीरमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तेथे निवडणूक प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. लँडलाईन सेवा तर या आधीच सुरू झाली आहे. आता कालच्या सोमवारपासून तेथील मोबाईलसेवाही सुरू करण्यात आल्याने त्या सेवेवरील निर्बंधही दूर झाले आहेत. तेथील सुधारत असलेली परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनाही राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्या राज्यातील वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तेथील परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येत आहे.

 

जम्मू-काश्मीरसाठीचे 'कलम ३७०' आणि '३५ अ' रद्द करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे नाराजी व्यक्त करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक खुले आव्हान दिले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी, "जर विरोधकांना 'कलम ३७०' आणि '३५ अ' रद्द करण्याचा निर्णय मान्य नसेल, तर त्यांनी ते पुन्हा समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन देशवासीयांना द्यावे," असे आव्हान विरोधकांना दिले. मोदी यांचे आव्हान, जनतेने पार चोळामोळा करून फेकून देण्यात आलेल्या विरोधकांकडून स्वीकारले जाण्याची शक्यता मुळीच नाही! विरोधक लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यामधून अद्याप सावरलेले नाहीत. काही पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे आव्हान उभे केल्याचा आव आणला आहे, पण, विरोधकांची आजची अवस्था पाहता हे आव्हान किती पोकळ, तकलादू आहे, त्याची कल्पना येते. विरोधकांतील काहींची मजल तर केवळ प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभे राहता आले तरी पुष्कळ, असे सांगण्यापर्यंत पोहोचली आहे. भाजप-शिवसेना युतीचा पराभव करून आमच्याच पक्षाला सत्ता मिळणार, असा दावा करण्याच्या जवळपासही महाराष्ट्रातील विरोधक नाहीत.

 

काश्मीरसाठीचे 'कलम ३७०' रद्द करण्याचा विषय राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा होता. देशाचे एकसंध स्वरूप राखण्यासाठी असा निर्णय घेणे अत्यावश्यक होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयास जनतेचा पाठिंबा असल्याचे दिसून आले. निवडणूक प्रचारांमध्ये हा मुद्दा मांडल्याबद्दल काही विरोधी नेत्यांना खुपू लागले. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे प्रश्न जसे महत्त्वाचे असतात, तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या राज्यातील जनतेचा कौलही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा मुद्द्यांची चर्चा विधानसभा निवडणुकीत होणे साहजिकच आहे. त्यात गैर काहीच नाही. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने आपला पाच वर्षांचा कालावधी अत्यंत यशस्वीपणे पार पाडला. विविध मुद्दे उपस्थित करून त्या सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजा-समाजात फूट पाडून सामाजिक वातावरण कसे बिघडेल, असाही प्रयत्न झाला. पण, फडणवीस सरकारने त्या सर्व आव्हानांना अत्यंत समर्थपणे तोंड दिले. त्यावर तोडगेही काढले. त्यामुळे विरोधकांची डाळ काही शिजली नाही. स्वत:ला राजकारणातील 'जाणते नेते' म्हणविणारे नेतेही फडणवीस सरकारपुढे नामोहरम झाले. भाजप-सेना युतीचा आताचा झंझावात पाहता, त्यापुढे विरोधकांचा टिकाव लागण्याची शक्यता दिसत नाही. आम्हीच सत्तेवर येणार, असा दावा कितीही ओरडून केला तरी युतीचे आव्हान पेलणे विरोधकांच्या आवाक्याबाहेरचे आहे.

 

स्वच्छता अभियानाचा कृतीतून पाठपुरावा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात, त्याप्रमाणे वागत असल्याची प्रचिती अनेकदा आली आहे. स्वच्छता अभियानाचा सातत्याने पाठपुरावा करणारे मोदी प्रत्यक्षात स्वत:ही तसे वागतात, याचा अनुभव नुकताच देशवासीयांनी घेतला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीदरम्यान ममलापुरम येथे मुक्काम असताना, तेथील समुद्रकिनार्‍यावरील कचरा पंतप्रधान स्वत: उचलत असल्याचे देशवासीयांनी पाहिले आहे. स्वत:च्या कृतीतून मोदी यांनी स्वच्छतेचा पाठ देशवासीयांपुढे घालून दिला आहे. पण, मोदी यांची प्रत्येक कृती एखाद्या कुसळाप्रमाणे डोळ्यांत खुपणार्या काहींना मोदी यांची ती कृती प्रसिद्धीसाठी असल्यासारखे वाटले. त्याचवेळी मोदी यांनी, आपले शरीर व्यायाम करून सुदृढ ठेवा, या मंत्राचे स्मरण पुन्हा करून दिले. देशाच्या नेतृत्वाने एखादा आदर्श घालून दिला की, देशवासीयांनाही तसे करण्याची प्रेरणा मिळते. पण, केवळ टीकाच करायची हा हेतू पुढे ठेऊन वर्तन करणारे चांगल्या दृष्टीने त्याकडे कसे पाहतील?

 

राफेलपूजनावर नाहक टीका

 

काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पहिले राफेल लढाऊ विमान स्वीकारण्यासाठी फ्रान्समध्ये गेले होते. त्यांनी तेथे त्या लढाऊ विमानाची पूजा परंपरागत पद्धतीने केल्यावरून केवढा गदारोळ माजविण्यात आला. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यास 'तमाशा' असे संबोधले होते. पण, मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने, शस्त्रपूजा करणे हे आमच्या परंपरेला धरून असल्याचे सांगून, त्यांना परस्पर उत्तर दिले होते. समाजमाध्यमांवरूनही राजनाथ सिंह यांनी केलेल्या पूजेला आक्षेप घेणार्‍यांना जोरदार प्रत्युत्तरे देण्यात आली होती. महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून जनतेच्या मनात कसा भ्रम निर्माण करता येईल, याचे हे ताजे उदाहरण. एकंदरीत विचार करता, देशातील विरोधक पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्याच्या स्थितीत सध्या नसल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकार देशातील विविध समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असताना, ते सरकार मूळ मुद्द्यांना बगल देऊन जनतेला चंद्र दाखवत आहे, मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवत आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले राहुल गांधी यांनी केली आहे. पण, विरोधक मोदी सरकारवर टीका करीत असले तरी ते सरकार योग्य दिशेने कार्य करीत आहे, यावर जनतेचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याचे निश्चित प्रतिबिंब पडल्यावाचून राहणार नाही!

@@AUTHORINFO_V1@@