घरचं कार्य !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018   
Total Views |
 

 
’अरे, तु इकडे कसा ?’
 
- प्रवेशद्वाराशी यजमानाच्या थाटात पाहुण्यांचं स्वागत करणाऱ्या माझ्या त्या मित्राला मी थोडंसं आश्चर्यानेच विचारलं. या लग्नात त्याचं दिसणं मला एकदम अनपेक्षित असल्याने सहजच माझ्याकडुन हा प्रश्न गेला.
 
'म्हणजे काय ? अरे हे तर घरचं कार्य आहे आमच्यासाठी. मुलीचं कुटुंब अनेक वर्षे आमच्या शेजारीच होतं रहायला. आत्ता दोन वर्षाखाली तर त्यांनी घर बदललं.' मित्राने उत्साहात माहिती पुरवली आणि पुन्हा तो त्याच्या नियोजित कामात गुंतला.
 
अनेक वर्षांचा शेजार या लग्नकार्यास एकदम 'घरचं कार्य' बनवून गेला होता आणि 'घरचं कार्य' म्हटलं की ज्या ज्या जबाबदाऱ्या येतात त्या सर्व अगदी आनंदाने स्वीकारल्याही गेल्या होत्या. घरचं कार्य या शब्दांमध्ये खरोखरीच जादु आहे. आपल्या जाणिवा नकळत विस्तारणारे हे दोन शब्द आहेत. माझ्या घराव्यतिरिक्त अन्यही घरे माझ्या घरासारखीच आहेत किंबहुना माझीच आहेत, हे सांगणारे हे शब्द आहेत. त्यात आत्मीयताही आहे आणि जबाबदारीचे भानही आहे.
 
अशी आत्मीयता आपल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणीही जेव्हा जपली जाते, तेव्हा एरवी नीरस वाटणारे आपले दैनंदिन कामही आनंददायी होऊन जाते. जनकल्याण रक्तपेढीचा कर्मचारी वर्गही अशीच आत्मीयता जपणारा आहे. रक्तपेढीचे सर्व कार्यक्रम घरच्या कार्याइतक्याच तन्मयतेने करण्याची मानसिकता इथे सर्वांकडेच आहे. शिवाय ही ओढ केवळ काही कार्यक्रमांपुरतीच मर्यादित नाही तर एकूणच स्वेच्छा रक्तदान चळवळीशीच सर्वांची मनापासून बांधिलकी आहे. अगदी अलिकडे म्हणजे जून महिन्यात एका प्रसंगाच्या निमित्ताने या बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले. झाले असे – उन्हाळ्यातील महिन्यांत विशेषत: एप्रिल, मे महिन्यांमध्ये उन्हाळा आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते, पण मागणी मात्र कमी होत नाही. उलट सुट्ट्यांमध्येच अनेक शस्त्रक्रियांचे मुद्दाम नियोजनही केले जाते. अशावेळी रक्ताचा तुटवडा भासु नये याकरिता जनकल्याण रक्तपेढीने जानेवारीमध्येच नियोजन केले आणि एप्रिल व मे या दोनच महिन्यांमध्ये सुमारे साडेपाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले. सामान्यत: दर महिन्याची रक्तसंकलनाची सरासरी १५०० ते १७०० असते, या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे मधील हे संकलन खरोखरीच विक्रमी होते. त्या आधारावर आम्हाला पुण्यातील रुग्णालयांची निकड तर भागवता आलीच शिवाय पुण्याबाहेरीलही काही रक्तपेढ्यांना मदत करता आली. एवढे सगळे झाल्यावर जूनमध्ये रक्तघटकांच्या मागण्या आटोक्यात येतील असा आमचा अंदाज होता. परंतु तसे झाले नाही. जूनमध्येही मागण्यांचे प्रमाण तसेच राहिले. पुण्याबाहेरच्या काही रक्तपेढ्यांनीही जूनमध्येदेखील आपापल्या मागण्या मोठ्या अपेक्षेने आमच्यापर्यंत पोहोचविल्या. मग मात्र आमची धावपळ वाढली. परिस्थिती ओळखून काही शिबिरसंयोजकांनी अचानकपणे शिबिरांचे आयोजन करुन काहीप्रमाणात हातभार लावला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र 'मागण्या कायम आणि संकलन अपुरे' अशी परिस्थिती आली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही शिबिरे होणार होतीच. पण तोवरही आपण कमी पडता कामा नये, असे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक होते.
 
अशा परिस्थितीत रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी एक अभिनव कल्पना सर्वांपुढे मांडली. ते म्हणाले, 'दर वेळी रक्तदान शिबिर आयोजित करणारी संस्था ही बाहेरची असते. आताची परिस्थिती लक्षात घेता आपणच एक शिबिर घ्यायचे, असे ठरवता येईल का?’ चटकन कुणाला बोध न झाल्याने डॉ. कुलकर्णींनी आणखी सोप्या भाषेत ही कल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, ’…म्हणजे असं, की आपल्यापैकी प्रत्येकाचं एक स्वतंत्र असं वर्तुळ आहेच, ज्यात नातेवाईक, मित्र अशी मंडळी येतात. तर आपापल्या वर्तुळामधून काही नावे निश्चित करुन त्यांना ठरलेल्या दिवशी रक्तदानासाठी बोलवायचं. अशा पद्धतीने चाळीस एक रक्तदात्यांनी जरी एका दिवशी रक्तदान केलं तरीही आपल्याला येणाऱ्या मागण्यांना 'नाही' म्हणावं लागणार नाही.’ कल्पना पुरेशी स्पष्ट झाली आणि सर्वांनीच ती तातडीने उचलुनही धरली. दोनच दिवसांनंतरची तारीख ठरली. तो तसा वर्किंग डे होता, पण इलाज नव्हता. कारण ती वेळ महत्वाची होती. प्रत्येकाने आपापली नावे निश्चित केली आणि त्वरेने फोनाफोनी सुरु झाली. या दोन दिवसांतच ज्याच्या त्याच्या तोंडी हा विषय झाला आणि कुणा-कुणाच्या माध्यमातून किती जण येणार याचे सोशल मीडियावर अपडेट्स यायला लागले. सर्वांच्या घराघरांमध्येही हा विषय तीव्रतेने पोहोचला आहे, हे एका प्रसंगातून मला चांगलंच जाणवलं. माझ्या घराजवळच राहणारी आमच्या रक्तपेढीतील एक महिला तंत्रज्ज्ञ-अधिकारी मला संध्याकाळी तिच्या छोट्या मुलीसह रस्त्यात भेटली. आमचे बोलणे चालु असताना ही छोटी मुलगी आपल्या आईला हळुच म्हणाली, 'आई, या काकांना विचार ना, रक्तदान कराल का म्हणून?' आम्ही दोघेही यावर खूप हसलो. तिचे हे एकच वाक्य तिच्या आईची या विषयातील गुंतवणुक सांगुन गेली. 'मी रक्तपेढीतच काम करतो आणि त्यामुळे मीही सध्या याच मिशनवर आहे', हे या छोटीला बहुधा माहिती नसावे. असो. पण एकंदरीत उत्साहाचे वातावरण तयार झाले. प्रत्यक्ष या दिवशी तर दिवसभर रक्तपेढीत वर्दळ चालु होती, ती अपेक्षितही होतीच. कुणाचा मित्र, कुणाचा भाऊ, कुणाचे वडील तर कुणाचा पती असे कितीतरी संबंधी त्या दिवशी रक्तपेढीत येऊन गेले. त्यातील अनेकांनी आयुष्यात प्रथमच रक्तदान केले. आपल्याशी संबंधित कुणी ना कुणीतरी रक्तदान करायला येणार असल्याचे माहिती असल्याने जवळ-जवळ प्रत्येकच जण वेगवेगळ्या वेळात स्वागतासाठी प्रवेशद्वारी थांबत होता. भरपूर हास्यविनोद, गमती-जमती अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात कार्यक्रम संपन्न होत होता. 'या कार्यक्रमामुळे आमच्या नातलग/मित्रांचे एक छोटेसे 'गेट-टुगेदर'च झाल्यामुळे आम्हाला खूप छान वाटले’ अशाप्रतिक्रियाही बऱ्याच जणांकडुन आल्या. कार्यकारी संचालकांपासून ते चालकापर्यंत सर्वच जण कुणाला ना कुणाला तरी रक्तपेढीत घेऊन आले होते. रक्तदानाच्या निमित्ताने रक्तपेढीचं एक कौटुंबिक मिलनच पार पडलं. सामान्यत: रोज सहा ते आठ रक्तदाते प्रत्यक्ष रक्तपेढीत येऊन रक्तदान करतात असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र या दिवशी रक्तदानासाठी नोंदणी केली सुमारे नव्वद एक रक्तदात्यांनी आणि दिवसाअखेरीला म्हणजे साधारण रात्री ८.३० च्या सुमारास साठावा रक्तदाता रक्तदान करुन गेला. या रक्तदानात महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते. सर्वांच्या दृष्टीने हे 'घरचं कार्य' होतं. या घरच्या कार्यामुळे पुढील मागण्या परिपूर्ण करण्यासाठी विपुल रक्तघटक उपलब्ध झाले. त्यानंतरही कुठल्याच मागणीला नाकारण्याची वेळ आली नाही.
 
अर्थात ही बांधिलकी एखाद्या इव्हेंटपुरती मर्यादित नाही, तर ती स्थायी स्वरुपाची आहे. प्लेटलेटदानासारख्या महत्वाच्या विषयाशी रक्तपेढीचे दहा-बारा कर्मचारी प्लेटलेटदाते म्हणून जोडले गेलेले आहेत आणि नियमितपणे हे सर्वजण प्लेटलेटदानाचे कर्तव्य बजावतात. काही डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या तर परिचयामध्येच 'हे घरी कमी आणि रक्तपेढीतच जास्त असतात' यासारखं वाक्य सहजपणे जोडलं गेलं आहे. डॉ. अतुल कुलकर्णींना तर मागे काही तंत्रज्ज्ञांनीच 'सर, तुम्ही घरी नक्की कुठल्या वेळात असता?’ असा गमतीशीर प्रश्न केला होता.
 
अनेक छोट्या छोट्या प्रसंगांमधून सर्वच कर्मचाऱ्यांकडुन या बांधिलकीचे दर्शन घडते. कधी व्यक्त तर कधी अव्यक्त स्वरुपात. वर म्हटल्याप्रमाणे 'घरचं कार्य' हे शब्द जाणिवा विस्तारणारे आहेत. ज्ञानदेवांसारखे विरागी तर 'हे विश्वचि माझे घर' पर्यंत या जाणिवेचा विस्तार करतात. सामाजिक प्रकल्प म्हणून काम करत असताना तर अशी 'विस्तारलेली जाणिव' हे मोठेच बलस्थान असते. जनकल्याण रक्तपेढी याबाबतीत सुदैवी आहे. केवळ कर्मचारीच नव्हे तर रक्तदाते, शिबिर संयोजक, आर्थिक सहकार्य करणाऱ्या अनेक संस्था, रुग्णालये अशा सर्व संबंधितांना रक्तपेढीच्या संदर्भात कुठलेही आवाहन केले तरी त्यांचा प्रतिसाद असतो, 'करायलाच हवं, शेवटी हे घरचंच तर कार्य आहे !'
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@