अमरावती : 'गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र सरकारने दिलेले आपले एकही आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे रालोआमध्ये असलेल्या सर्व टीडीपीच्या नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी केले आहे. अमरावती येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
भाजपने सत्तेत येण्याअगोदर दिलेल्या आश्वासनांचा भाजपला आता विसर पडला आहे. तसेच आंध्रच्या जनतेच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी देखील सरकारकडे वेळ नाही. त्यामुळे सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी रालोआ सरकारमध्ये असलेल्या सर्व तेलुगु देशम पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, असे आवाहन नायडू यांनी केले आहे. यामध्ये केंद्रीय विमानसेवा मंत्री अशोक गजपती आणि केंद्रीय राज्यमंत्री वाय.एस.चौधरी या टीडीपी नेत्यांनी तातडीने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात न आल्याची खंत नायडू यांनी यावेळी व्यक्त केली. 'सत्तेत येण्या अगोदर आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ व यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न भाजप करेल, असे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु गेल्या चार वर्षांमध्ये यासंबंधी सरकारने एक शब्द देखील उच्चारलेला नाही. उलट आंध्रच्या नेत्यांना या विषयी विचारणा केली असता, त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते, अशी खंत नायडू यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भाजपने आंध्रच्या जनतेचा विश्वासघात केल्याची भावना सह्द्या येतील जनतेच्या मनात निर्माण होत आहे, असे त्यांनी म्हटले.
याचबरोबर मंत्र्यांना फक्त सरकारमधून बाहेर पडण्याचे आदेश असून भाजपबरोबर असलेली युती तोडण्याविषयी पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनी जरी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तरी भाजपबरोबरची युती सध्या तरी कायम राहील, असे देखील नायडू याने म्हटले आहे.