दोन निसर्गमैत्रिणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018   
Total Views |



नुसती झाडं लावली म्हणजे पर्यावरणरक्षण झालं, असं होत नाही. ‘निसर्गपुनरुज्जीवन’ ही वृक्षलागवडीच्याही पलीकडे जाणारी, खूप व्यापक संकल्पना आहे. त्याचाच ध्यास घेतलेल्या केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या दोन निसर्गमैत्रिणींची ही छोटीशी मुलखात...


मागील लेखात म्हटल्याप्रमाणेच पुण्यात सकारात्मक आणि कृतिशील अशा पर्यावरण चळवळीने बाळसं धरलं आहे, ज्यात प्रकाश गोळे यांनी स्थापन केलेल्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा मोठा वाटा आहे. केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या इकॉलॉजिकल सोसायटीच्याच माजी विद्यार्थिनी आणि सध्या तिथेच प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या दोघीजणी ‘ऑयकॉस’ नामक एक ‘पर्यावरण सल्लागार कंपनी’ (Environmental Consultancy Firm) चालवतात, असं ऐकिवात होतं. त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घ्यावं म्हणून गेल्या आठवड्यात त्यांच्या ऑफिसला भेट दिली. ऑफिसमध्ये बांबूच्या खुर्च्या, खिडकीवर बांबूपासून बनवलेला पडदा, असं सगळं ‘इको फ्रेंडली’ फर्निचर होतं. एसी नव्हता. (बऱ्याच कार्यालयांमध्ये तो ‘गरज’ म्हणून नव्हे, तर लावायचा म्हणून लावला जातो!) चहा आणि केक यांचा आस्वाद घेत तासभर त्या दोघींशी छान गप्पा झाल्या.

 

मी : आज ‘सामाजिक कार्य’ म्हणून निसर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण तुम्ही निसर्गसंवर्धन ‘व्यवसाय’ म्हणून करता, हे तुमचं वेगळेपण आहे. त्याबद्दल सविस्तर सांगा...

 

केतकी / मानसी : Oikos ही निसर्गसंवर्धनाची सेवा देणारी आमची कंपनी आहे, जी आम्ही २००२ साली सुरू केली. निसर्गपुनरुज्जीवन (Eco-restoration), पर्यावरणपूरक बागा तयार करणं (Eco-landscaping) अशा सेवा आम्ही देतो. हल्ली शहरातल्या लोकांनी खेडेगावांमध्ये जमीन घेऊन तिथे फार्महाऊस बांधणं, बागा करणं हे खूप वाढलं आहे. पण हे करताना त्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा होत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते पण, नेमकं काय करायचं ते माहीत नसतं. अशा लोकांना निसर्गपुनरुज्जीवनाची सेवा अथवा त्यासंबंधी योग्य सल्ला देण्याचं काम आम्ही करतो. २०००-०१ साली आम्ही जेव्हा ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा कोर्स केला तेव्हा आमचे गुरूवर्य प्रकाश गोळे यांनीच अशा प्रकारच्या ‘Environmental Consultancy’ची लोकांना गरज असल्याचं आम्हाला सांगितलं होतं. आम्हालाही निसर्गासाठी पूर्णवेळ काम करायची इच्छा होती. उत्पन्नाचं साधन म्हणून काहीतरी वेगळं करायचं आणि उरलेल्या वेळात पर्यावरणासाठी काम करायचं, यापेक्षा दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होऊ शकतात का, हा विचार करून आम्ही ही कंपनी सुरू केली. शिवाय निसर्गसंवर्धानाच्या कामाला व्यावसायिक स्वरूप दिलं, तर ते काम अधिक जबाबदारीच्या भावनेने केलं जाईल, हाही हेतू कंपनी सुरू करण्यामागे होता. ही संकल्पनाच नवीन असल्यामुळे सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद कमी होता पण, नंतर प्रतिसाद वाढला आणि निसर्गपुनरुज्जीवनाची कामं आम्हाला मिळत गेली. २००६ साली वनकुसवडे या गावी सुरू केलेला निसर्गपुनरुज्जीवनाचा प्रकल्प हे आमच्या एका यशस्वी प्रकल्पाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. पानशेतजवळ शिरकोली या गावी आम्ही ६० एकर जमिनीवर एक खासगी अभयारण्य उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अशा प्रकारे आमच्या कंपनीची वाटचाल सुरू आहे.

 

मी : ‘वृक्षलागवड’ आणि ‘निसर्गपुनरुज्जीवन’ या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे?

 

केतकी / मानसी : वृक्षलागवडीने नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली दिसेल पण, जैवविविधता नाही जोपासली जाणार. निसर्गपुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्गपुनरुज्जीवन करायचं आहे तिथली जमीन, हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्गपुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथे कुंपण घालायचं, बायोमास जमिनीवर पसरायचं, जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा येतो. त्यानंतर आपोआप तिथे गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमाने वेली, छोटी छोटी झुडूपं तिथे वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी तिथे हळूहळू येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीजप्रसारामुळे मोठ्या झाडांची रोपटीही तिथे उगवतात आणि वाढू लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जरूर असेल, तर आपण तिथे काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्गपुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्याने होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवडीला (Natural Selection) प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्गपुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सर्व स्तर निसर्गपुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होतात. वृक्षलागवड चांगलीच, फक्त ती शास्त्रीय पद्धतीने आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी.

 

मी : गुरेचराईचा जैवविविधतेवर काय परिणाम होतो? निसर्गपुनरुज्जीवनात गुरेचराई अडचण ठरते का? त्याला उपाय काय?

 

केतकी / मानसी : गुरेचराईचा जैवविविधतेवर बऱ्यापैकी परिणाम होतो. एखाद्या जमिनीवर गवत-छोटी झुडूपं-मोठी झाडं यांची वाढ क्रमाक्रमाने होत असते, ज्याला Succession म्हणतात. आता, गुरं गवतच सगळं खाऊन टाकत असल्याने पुढची प्रक्रियाच खुंटते. जितकी जास्त गुरं चरतील तितकी जमीन कडक होते आणि तिथे काही उगवत नाही. म्हणूनच आम्ही कुठेही निसर्गपुनरुज्जीवनाचा प्रकल्प करताना आधी त्या जमिनीला कुंपण घालून तिथली गुरेचराई बंद करतो. अर्थात, वनकुसवड्याला आम्ही जो २४ एकर जमिनीवर प्रकल्प केला त्या जमिनींत गुरांची जाण्यायेण्याची वाट होती. त्यांची पंचाईत होऊ नये म्हणून त्या वाटेच्या दोन्ही बाजूंना कुंपण करून फक्त वाट तेवढी मोकळी ठेवली. बाकी त्या जमिनीवरची चराई बंद केली. असंही करता येऊ शकतं. जैवविविधतेचा र्‍हास होऊ नये यासाठी एकाच जमिनीवर वर्षानुवर्षे गुरेचराई होत राहू देण्याऐवजी चराऊ क्षेत्राचे दोन-तीन भाग करून दरवर्षी आळीपाळीने एकेका भागावर गुरं चरवायची किंवा एखाद्या जमिनीवर गुरं अजिबात न नेता तिथला चारा फक्त कापून गुरांना आणून घालायचा, असं योग्य व्यवस्थापन गावपातळीवर केलं जायला हवं. मग जैवविविधतेचा र्‍हास टाळता येईल.

 

मी : रानावनांत फिरतानाचा एखादा गंमतीशीर प्रसंग ऐकायला आवडेल...

 

केतकी / मानसी : तसे खूप प्रसंग आहेत! ‘जळू’ हा प्राणी जेव्हा आम्ही पहिल्यांदा पहिला तेव्हा आमची जी घाबरगुंडी उडालेली, तो प्रसंग कायम लक्षात राहण्याजोगा आहे. साधारणत: १७-१८ वर्षांपूर्वी आम्ही पश्चिम घाटातल्या एका सुंदर जंगलात गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. फिरताना एक ओढा दिसला म्हणून आम्ही तिथेच एका ओंडक्यावर बसलो. पण सहज पायाखाली बघितलं तर तिथे ५० च्या दरम्यान जळवा होत्या! आमची चाहूल लागल्यावर त्या पटापट सगळ्या बाहेर यायला लागल्या. तेव्हा आम्ही ज्या प्रचंड वेगाने तिथून पळ काढला! तिथला एक अतिशय तीव्र उतार, जो उतरायला आम्हाला दोन तास लागले होते, तो आम्ही एका तासात चढलो. तेव्हा आम्ही भयानक घाबरलेलो. जंगलात फिरताना आपल्याला कशाची काही माहिती नसते तेव्हा भीती वाटते. एकदा सगळ्या गोष्टी माहीत झाल्या की, आपोआप भीती जाते. आता आम्ही जळू हातातही घेतो!

 

मी : निसर्गसंवर्धनात पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व काय आहे? पारंपरिक ज्ञानाच्या संकलनासाठी तुम्ही काही प्रयत्न करता का?

 

केतकी/मानसी : पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व तर खूपच आहे. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षांच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कलाही असते. उदा. भातखाचरांमध्ये जी ताल (दगडी भिंत) बांधलेली असते ती पिढ्यानपिढ्या टिकते. सिमेंटची भिंत फार फार तर वीस-एक वर्षं टिकेल पण, या ताली पिढ्यान्पिढ्या टिकतात. म्हणजेच स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं शहाणपण असतं, जे निसर्गसंवर्धनाला पूरक ठरतं. आम्हीसुद्धा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा इ. गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीने करून घेतो. त्यामुळे त्या पक्क्या होतात. आज जशी जीवनशैली बदलते आहे, तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय. म्हणून त्याचं संकलन होण्याची गरज आहे. मध्यंतरी आम्ही ‘वारसा’ नावाचा ग्रामीण जीवनशैलीचं दार्शन घडवणारा एक माहितीपट बनवला होता. त्याच नावाने आम्ही एक पुस्तक लिहीत आहोत, ज्यात पारंपरिक गोष्टींचं संकलनच केलं आहे.

 

मी : पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत शासनाकडून आणि नागरिकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

 

केतकी / मानसी : आज ‘विकास’ या शब्दाची पुनर्व्याख्या होण्याची गरज आहे. नुसता ‘जीडीपी’ वाढला म्हणजे खरंच विकास झाला का? हे शासनस्तरावर तपासलं जाण्याची जरूर आहे. आपल्याकडे सुमारे २७-२८ टक्के जमीन पडीक आहे. तिच्यावर निसर्गपुनरुज्जीवनाचे प्रकल्प केले तरी त्यातून भरपूर रोजगारनिर्मिती होईल. सरसकट सगळीकडे औद्योगिकरण करण्याऐवजी अशा प्रकारची काहीतरी वेगळी विकासनीती आपण राबवू शकतो का? याचा विचार शासनाकडून केला जायला हवा. निसर्गसंवर्धनासाठी उत्तमोत्तम कायदे आहेत. त्यांची नीट अंमलबजावणी केली जायला हवी. नागरिकांकडून अपेक्षा म्हणायची झाली, तर जीवनशैलीतला बदल हीच मुख्य अपेक्षा आहे. आपल्या उपभोगाच्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. मी जर रोज चारचाकी गाडी घेऊन ऑफिसला जात असेन आणि आठवड्यातून एक दिवस जर सायकलने जायला लागलो तरी ते दोन झाडं लावण्याइतकंच महत्वाचं आहे, हा विचार प्रत्येक नागरिकाने करून आपला ऊर्जेचा आणि संसाधनांचा उपभोग कमीत कमी पातळीवर ठेवायला हवा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@