‘जीआय टॅग’ एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी वापरला जातो. त्यातून संबंधित उत्पादनाच्या दर्जाचेही मापदंड निश्चित होत असतात. याआधी दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची निळी पोटरी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू यासह भारतातील ३२५ उत्पादनांना ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. त्यात आता आंब्यांचा राजा अर्थात कोकणातील हापूसलाही स्थान मिळाले आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाकडून यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश मिळाले आहे. ‘जीआय टॅग’मुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकणार आहे.
या टॅगमुळे कोकणला याचा आर्थिक फायदाही होणार आहे. आंबा बागायतदार शेतकरी तसेच आंबा व्यापारात गुंतलेल्या सर्वच घटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच हापूसच्या जीआय टॅगच्या बोधचिन्ह आणि टॅगलाईनचे उद्घाटन केले. या टॅगमुळे मूळ उत्पादनाला व त्याच्याशी संबंधित घटकांना योग्य मोबदला मिळण्यास हातभार लागेल. आजवर भारतातील अनेक उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे. त्यातून एकप्रकारे उत्पादन प्रक्रियेत सहभागी असलेल्या घटकांना हमीच मिळाली आहे, असे यावेळी प्रभू म्हणाले.
निर्यातवाढ शक्य
कोकणात पिकणारा हापूस जगप्रसिद्ध असून देशात आणि परदेशातही हापूसला मोठी मागणी असते. जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळांमध्ये हापूसचा समावेश आहे. युरोप, कोरिया, जपानमध्ये हापूसची आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती आणि आता अमेरिका व ऑस्ट्रेलियातही हापूसची निर्यात सुरू झाली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/