ठाणे : विधानसभेची हंडी महायूतीच फोडणार, असे मी गेल्यावर्षी इथूनच म्हणालो होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतसुद्धा महायूतीच हंडी फोडणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शनिवार, १६ ऑगस्ट रोजी ठाणे येथे टेंभी नाका मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवास हजेरी लावली.
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विधानसभेची हंडी महायूतीच फोडणार, असे मी गेल्यावर्षी इथूनच म्हणालो होतो. अडीच वर्षांच्या महायूतीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी, अजितदादा आणि मी या आमच्या टीमने महायूतीमध्ये जे काम केले, त्यामुळे महायूतीनेच विधानसभेची हंडी फोडली. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दुसरी इनिंग सुरु झाली आहे. त्याच वेगाने काम सुरु आहे. याची पोचपावती म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतसुद्धा महायूतीच हंडी फोडेल."
आम्ही विकासाचे थर लावले
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख सर्वात मोठी आहे. आमचा विकासाचा अजेंडा असून आम्ही विकासाचे थर लावले. समोरचे लोक विकासविरोधी थर लावतात. म्हणून आम्ही महायूतीची हंडी फोडली. त्याचबरोबर मोदीजींनी आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गर्वाची हंडी फोडली," असेही ते म्हणाले. ठाणे ही गोविंदांची पंढरी झाली
"आपली संस्कृती आणि परंपरा वाढवण्याचा हा सण असल्याने हजारों गोविंदा ठाण्यात येतात. त्यामुळे ठाणे ही गोविंदांची पंढरी झाली आहे. आनंद दिघे साहेबांच्या मानाच्या हंडीचे एक वेगळे वैशिष्ट्य असून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आजही ती परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....