शिवभक्त... रामभक्त आणि आता दुर्गाभक्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018   
Total Views |

 


 
 
 
राहुल गांधी यांना आपण ‘हिंदू’ असल्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागल्याचे आणखी एका उदाहरणावरून लक्षात येते. प. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या निमित्ताने आपणही ‘दुर्गाभक्त’ असल्याचे राहुल गांधी हे त्या राज्यातील जनतेला दाखवून देणार आहेत. राहुल गांधी यांनी प. बंगालमधील काँग्रेस नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी राज्यातील नेत्यांनी त्यांना दुर्गापूजा उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले.
 

आपल्या विरोधकांवर अनेक खोटे आरोप करण्याची ख्याती प्राप्त केलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मतदारांना भुलविण्यासाठी विविध रूपे धारण करण्याची सवय भारतीय मतदारांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. देशातील हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरातमधील निवडणुकीपासून आपण ‘मवाळ’ हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्याचे दाखविण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी ही खेळी उपयुक्त ठरत असल्याचा त्यांचा समज झाल्याने त्याचा अन्यत्र वापर करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. गुजरात निवडणुकीच्या वेळी सोरटी सोमनाथ मंदिरास भेट दिल्यानंतर आपण ‘जनेऊधारी ब्राह्मण’ असल्याचा साक्षात्कार त्यांना आणि त्यांची तळी उचलणार्‍या काँग्रेस नेत्यांना झाला होता. पण, हे सर्व हिंदू समाजाची मते मिळविण्यासाठी चालले असल्याचे गुजरातमधील मतदारांनी ओळखल्याने त्या राज्यात सत्तेवर येण्याची जी स्वप्ने काँग्रेसकडून पाहिली जात होती, ती धुळीस मिळाल्याचे देशवासीयांना पाहावयास मिळाले. पण, त्यानंतर कर्नाटकमधील निवडणुकीच्या वेळीही राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी द्यायचा सपाटा लावला होता. पण, त्या राज्यातील हातातील सत्ता गेली, पण भाजपला दूर ठेवण्याच्या हेतूने कुमारस्वामी यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्या राज्यातील सत्तेत वाटा मिळविला. त्याच दरम्यान एका संभाव्य विमान दुर्घटना टळल्याने त्यांना एकदम कैलास मानस सरोवराची यात्रा करण्याचा साक्षात्कार झाला. त्याप्रमाणे ते यात्रेसाठी जाऊन आले. त्यानंतर सर्व काँग्रेसवासी मंडळींना राहुल गांधी हे खरेखुरे ‘शिवभक्त’ असल्याची खात्री पटली. अलीकडेच ते मध्य प्रदेशात प्रचारासाठी गेले असता भोपाळ शहरात ‘शिवभक्त’ असे विशेषण लावून त्यांच्या स्वागताचे फलक रस्त्यांवर लावण्यात आले होते. मध्य प्रदेशातील निवडणुका तोंडावर आल्या असल्याने तेथील मतदारांवर प्रभाव पडण्यासाठी या ‘शिवभक्त’ विशेषणाचा वापर केला जात आहे, हे उघडच आहे. या ‘शिवभक्त’ राहुल गांधी यांना, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे नर्मदा परिक्रमा करण्याचा सल्ला अजून कसा देत नाहीत, याचे आश्चर्य वाटते!

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मध्यंतरी आपल्या अमेठी या मतदारसंघात गेले होते. हा नेहरू घराण्याचा परंपरागत मतदार संघ मानला जातो, पण अनेक वर्षे काँग्रेसकडे सत्ता असताना, त्या पक्षाने या मतदार संघासाठी विशेष असे काहीच केले नाही, ही वस्तुस्थिती. पण, राहुल गांधी यांनी आपल्या अमेठी दौर्‍यात, भाजप सरकारने या मतदार संघासाठी काहीच केले नाही, असा आरोप करण्याचे सोडले नाही. असो. आपला मुद्दा ‘शिवभक्त’ राहुल गांधी यांच्यासंदर्भातील आहे, सतर या अमेठी मतदारसंघात, अचानकपणे उगवलेल्या एका ‘कावडिया संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. या कथित ‘कावडिया संघा’चे नावही अनेकांना ठाऊक नव्हते. पण, राहुल गांधी यांची ‘शिवभक्ती’ सर्वदूर पोहोचावी या हेतूने हा सर्व खटाटोप करण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या शिवभक्तीची चर्चा चालू असताना त्यांना भगवान श्रीरामाची आठवण झाली. आपण ‘रामभक्त’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले! आपल्या ‘मिशन मध्य प्रदेशदरम्यान राहुल गांधी यांनी चित्रकूटला आणि तेथील प्रसिद्ध भगवान कामतानाथ मंदिरास भेट दिली आणि तिथे विशेष पूजाअर्चा केली. राहुल गांधी आतापर्यंत कधी त्या मंदिरात गेले होते की नाही ते माहीत नाही, पण यावेळी त्यांना भगवान कामतानाथाचे दर्शन घ्यावेसे वाटले किंवा त्यांना तसे करण्यास त्यांच्या आयोजकांनी भाग पाडले असावे! राहुल गांधी यांच्या या भेटीदरम्यान भगवान राम की तपोभूमि पर काँग्रेस पार्टी के अध्यक्ष रामभक्त पंडित राहुल गांधीजी का स्वागत वंदन’ असे फलक लावण्यात आले होते! राहुल गांधी हे ‘पंडित’ कधी झाले की त्यातून, ते पंडित म्हणजे ब्राह्मण असल्याचे काँग्रेसच्या मंडळींना दाखवून द्यायचे होते? कशासाठी हा सर्व खटाटोप? हिंदू मतदार आपल्याकडे वळावा, हाच त्यामागील हेतू आहे ना! मध्यंतरी काँग्रेसने ‘राम वनगमन मार्ग यात्रा’ काढण्याचे ठरविले होते, पण तूर्तास ती यात्रा बाजूला पडली आहे.

 

काँग्रेसकडून हिंदू मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न गुजरात निवडणुकीपासून चालू आहेत. आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीसही जास्त काळ राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून ‘मवाळ हिंदुत्व’ मोठ्या प्रमाणात वापरले जाईल हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यातूनच हे देवदर्शन चालू आहे! काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपण हिंदू असल्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागल्याचे आणखी एका उदाहरणावरून लक्षात येते. आता पितृपक्ष संपला की सर्वत्र नवरात्र चालू होईल. प. बंगालमध्ये तर दुर्गापूजा अत्यंत महत्त्वाची. या दुर्गापूजेच्या निमित्ताने आपणही ‘दुर्गाभक्त’ असल्याचे राहुल गांधी हे त्या राज्यातील जनतेला दाखवून देणार आहेत. राहुल गांधी यांनी प. बंगालमधील काँग्रेस नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी राज्यातील नेत्यांनी त्यांना दुर्गापूजा उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार येत्या १७ ऑक्टोबर रोजी महाअष्टमीच्या दिवशी ते दुर्गापूजा उत्सवास येणार आहेत. कोलकात्यातील कॉलेज स्क्वेअर सार्वजनिक दुर्गोत्सवास ते भेट देणार आहेत. महाअष्टमीच्या दिवशी ते न येऊ शकल्यास महानवमीस ते तेथे येतील, अशी माहिती प. बंगालच्या काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली.

 

पण, राहुल गांधी यांचा मानस सरोवर ते दुर्गापूजा असा जो प्रवास दिसतो तो म्हणजे आपण ‘हिंदू’ असल्याचे दाखवून देण्याचा खटाटोप असल्याची टीका भाजपनेते राहुल सिन्हा यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे जे काही चालले आहे ते म्हणजे एका कुटील राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष एकीकडे आपण ‘हिंदू’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना खोटे बोलण्यामध्ये आपला हात कोणी धरू शकणार नाही, हे ते दाखवून देत आहेत. मोदी सरकारने केलेली चांगली कामे त्यांना दिसत नाहीत. तसेच राफेल विमान व्यवहारात काहीही गैरव्यवहार झाला नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सांगूनही त्यांचे आरोप करणे चालूच आहे. गोबेल्सचे प्रचारतंत्र सदासर्वकाळ खरे ठरत नाही, हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे! आपल्या पक्षाची झालेली दयनीय स्थिती, विरोधी ऐक्याचा अद्याप पत्ता नाही अशी स्थिती, भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीका करून बदलणार आहे का? जाता जाता... पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेऊन केलेली टीका लक्षात घेऊन, आमच्या देशाचे आम्ही बघून घेऊ, त्यात तुम्ही नाक खुपसण्याची गरज नाही, असे पाकिस्तानला एका तरी काँग्रेस वा विरोधी नेत्याने खडसावून सांगितले आहे का? भाजप- संघ विरोधकांना, झाले ते बरेच झाले, असे वाटून आतून उकळ्या फुटत असतील! देशातील सूज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी या सर्व घटनांकडे लक्ष ठेवून आहे, हे या मंडळींनी लक्षात घ्यावे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@