भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी सुरु झालेला काँग्रेस पक्षाचा आज १३३ वा स्थापना दिवस दिल्लीतील २४ अकबर रोड, या मुख्यालयात साजरा केला गेला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रथमच ध्वजारोहण पार पडले. नेहरू-गांधी घराण्याची मक्तेदारी म्हणून जरी हा पक्ष आज लौकिक मिळवत असला तरी याचे मूळ स्वरूप काय होते हे नक्की जाणून घेतले पाहिजे.
१८८५ साली ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीच्या विरोधात एकत्रितपणे लढा देता येण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेने देशभक्तांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. अॅलन ह्यूम या निवृत्त ब्रिटीश आय.ए.एस. अधिकाऱ्याने ब्रिटीश सरकार आणि भारतीय लोकनेते यांच्यात संवाद निर्माण करण्यासाठी याची स्थापना केली होती. पुढे याची कमान भारतीय लोकनेत्यांच्या हातात आल्यानंतर हे स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य व्यासपीठ बनले.
दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, पंडित मदनमोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वतंत्र चळवळीचे अग्रणी नेते कधीकाळी काँग्रेसच्या प्रमुख पदी होते. यांच्या विचारांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळी दिशा लाभली होती. त्यामुळे सामान्य भारतीयांचे हे हक्काचे व्यासपीठ बनले होते.
मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याची कमान नेहमीच एका कुटुंबाच्या हातात राहिली. पंडित नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा त्यांच्या हातात आली. लोकचळवळ असलेली काँग्रेस देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. या पक्षाने देशाच्या राजकीय पटलावर जवळपास ६० वर्षे सत्ता गाजवली. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग हे काँग्रेस या राजकीय पक्षाने दिलेले पंतप्रधान आहेत.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख व्यासपीठ असलेली काँग्रेस स्वातंत्रोत्तर काळात मात्र एका घराण्याची मक्तेदारी बनून राहिली. यामुळे या पक्षाला फायदा आणि नुकसान दोन्ही झालेले देशाने पहिले आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत झालेली युद्धे हा पक्ष सत्तेत असतानाच झालेली आहेत. त्याचबरोबर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली लोकशाहीला काळे फासणारी आणीबाणी लादलेली देखील देशाच्या स्मरणात आहे.
केवळ नेहरू-गांधी घराणेच या पक्षाला सांभाळू शकतात, अशी सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याची समज बनली आहे, त्यामुळे के. कामराज, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, सीताराम केसरी, शरद पवार, प्रणब मुखर्जी, ममता बॅनर्जी, यांसारख्या अनेक धडाडीच्या नेत्यांना पूर्णपणे डावलले गेले, पर्यायाने यातून अनेक कर्तबगार लोकनेते देखील वेळोवेळी पक्षातून बाहेर पडत राहिले. ९० च्या दशकात काँग्रेस पक्षाला भाजप सारखा देशव्यापी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे जनतेचा कौल त्याबाजूने गेला, तसेच प्रादेशिक पक्षांना देखील वाव मिळाला, पर्यायाने हळूहळू काँग्रेसला सत्तेसाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ लागली. मात्र २००४ साली सोनिया गांधींच्या नेतृत्वात या पक्षाने पुन्हा एकदा देशभर आपले प्रस्थ स्थापित केले, ते २०१४ साल पर्यंत. या कालावधीत यातील अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लागले, देशाला स्वच्छ कारभार देऊ शकण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या लोकप्रिय नेतृत्वाचा उदय भारतीय जनता पक्षात झाल्यामुळे काँग्रेसला कधीनव्हे एवढा मोठा संघर्ष सत्ता मिळविण्यासाठी करावा लागला. त्यानंतर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपली असलेली सत्ता गमावत बसला. पक्षाचे युवराज आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, केरळ, मणिपूर यांसारख्या सत्ता असलेल्या राज्यात निवडणुकांमध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.
आज देशात केवळ ४ राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश निवडणुकीत देखील सत्तेतून बाहेर पडावे लागले असून गुजरात येथे गेल्या २२ वर्षाची भाजप सरकार उलथवून पाडण्यात देखील अपयश आले आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व देशभरात खूप कमी झाले असून, हे टिकविण्यसाठी आज संघर्ष करावा लागत असला तरी देखील घराणेशाहीच्या कायद्यानुसार सोनिया-राजीव पुत्र राहुल गांधी यांच्या हाती अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. अनेक कर्तबगार नेत्यांची कमतरता आज मोठ्याप्रमाणात या पक्षाला भासत असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सलग पराभवाला सामोरे जावे लागत आहे.
देशभक्तांचे प्रमुख व्यासपीठ ते एका घराण्याची मक्तेदारी असा प्रवास करत काँग्रेस पक्ष आज मोठ्या अस्तित्वाच्या लढाईतून जात आहे. देशात पुन्हा सत्ता स्थापन करण्यापेक्षा देखील पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आज १३३ वर्षानंतर काँग्रेस समोर उभे ठाकलेले दिसत आहे.
- हर्षल कंसारा