स्वत:च्या पक्षाच्या पंतप्रधानाच्या अध्यादेशाला 'नॉन-सेन्स' म्हणणारी व्यक्ती जेव्हा इतरांच्या अपमानाची मोजणी करते तेव्हा हसू अनावर होते. डॉ. मनमोहनसिंग त्यांच्या प्रतिमेचा वापर करून या कुटुंबियांनी त्यांना कळसुत्री बाहुलीप्रमाणे कसे वागवले हा इतिहास ताजाच आहे. पंतप्रधानपदाचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या एवढा आजवर कुणीही केला नसेल. त्यामुळे जगास ब्रम्हज्ञान शिकवण्याच्या भानगडीत राहुल गांधी यांनी न पडलेलेच बरे.
असे म्हणतात की 'बादाम खाने से नाही, ठोकर खाने से अकल बढती है'. गेल्या ४ वर्षांपासून राहुल गांधी निवडणुकांमध्ये जसजशा ठेचा/गटांगळ्या खात आहेत, त्याप्रमाणे त्यांची राजकीय समज देखील वाढत चाललेली आहे असे सध्या दिसत आहे. म्हणूनच तर काल गुजरातमधील बनासकांठा येथे काँग्रेसच्या आय. टी. विभागाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पंतप्रधानांच्या पदाचा मान राखण्याचा सल्ला दिला आहे. केवळ एवढेच नाही तर त्यात ते पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी विरोधी पक्षात असताना तत्कालीन पंतप्रधानांचा अपमान करायचे, तसे आम्ही वागत नाही. आम्ही पंतप्रधान पदाचा मान राखतो. राहूल गांधी यांच्या आजवरच्या वक्तव्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्याकडून इतके शहाणपणाचे वक्तव्य अपेक्षित नाही. पण तरीही एवढे मोठे राजकीय सौजन्य दाखविल्या बद्दल खरंतर त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.
परंतु हे ज्ञान त्यांना २०१४ पूर्वी झाले असते तर कदाचित त्यांच्यावर एवढी जिवाच्या आकांताने ओरडून सांगायची वेळ आली नसती. २०१४ सालापूर्वी संपुआ सरकार असताना या व्यक्तीचा मिजाज काही औरच होता. देशाच्या पंतप्रधानाला राहुल गांधी व त्यांच्या आईने अक्षरशः 'माँ-बेटेका गुलाम' बनवून ठेवल्याचे साऱ्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे अत्यंत ज्ञानी, अनेक विद्यापीठांची मान्यता असूनही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची प्रतिमा व काम नागरिकांच्या मनात टिकाव धरू शकले नाही. राहुल गांधी हे असे उपाध्यक्ष आहेत ज्यांनी स्वत:च्याच सरकारद्वारे काढलेल्या अध्यादेशाला 'नॉन-सेन्स' अशी उपमा दिली होती. याला पंतप्रधानपदाचा अपमान म्हणायचे की सन्मान हे त्यांच्याच समर्थकांनी आता ठरवायचे आहे. कारण गांधी घराण्यातून मिळालेली प्रत्येक गोष्ट अति मौल्यवान असल्याची त्यांची धारणा असते.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे अमेरिका दौऱ्यावर असताना दिल्लीत सुरु असलेल्या एका पत्रकार परिषदेत शहजाद्याप्रमाणे येऊन डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या मंत्रीमंडळाने काढलेला अध्यादेश केराच्या टोपलीत फेकून द्यावा असे मत वजा आदेश राहुल गांधी यांनी दिला होता. मनमोहनसिंग यांना पत्र लिहून, काढलेला अध्यादेश मागे घेण्यास भाग पाडले होते. यामुळे स्वत: डॉ. मनमोहनसिंग यांची गोची झाली होती, गांधी घराण्याच्या दावणीला बांधलेले असल्यामुळे त्यांना तो अध्यादेश नाइलाजाने का होईना मागे घ्यावाच लागला होता.
स्वत:च्या पक्षाच्या पंतप्रधानाच्या अध्यादेशाला 'नॉन-सेन्स' म्हणणारी व्यक्ती जेव्हा इतरांच्या अपमानाची मोजणी करते तेव्हा हसू अनावर होते. डॉ. मनमोहनसिंग त्यांच्या प्रतिमेचा वापर करून या कुटुंबियांनी त्यांना कळसुत्री बाहुलीप्रमाणे कसे वागवले हा इतिहास ताजाच आहे. ते देशाचे पंतप्रधान कमी आणि गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणूनच जास्त नावाजले गेले. पंतप्रधानपदाचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या एवढा आजवर कुणीही केला नसेल. त्यामुळे जगास ब्रम्हज्ञान शिकवण्याच्या भानगडीत राहुल गांधी यांनी न पडलेलेच बरे.
याच संदर्भात आणखी एक दाखला द्यायचे म्हटल्यास, विद्यमान भारत सरकारने डोकालाम विषयी जी भूमिका घेतली होती, त्याविषयी राजकारण करण्याचा प्रयत्न याच राहुल गांधींनी केला होता. डोकालाम विषयी भारत सरकारची भूमिका समजून घेण्याऐवजी थेट चीनच्या राजदूताची भेट घेणे त्यांना जास्त महत्वाचे वाटले होते. स्वत:च्या देशाच्या सरकारच्या भूमिकेची माहिती न घेता थेट परदेशी सरकारच्या राजदूताची भेट घेऊन आपल्याच सरकारचा अनादर केल्याचा दाखला त्यांनी काँग्रेसजनांसह जगभर दिला.
राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना 'मौत के सौदागर' संबोधाल्याचे कदाचित त्यांच्या विस्मरणात गेले असावे. मुख्यमंत्री हे घटनादत्त पद आहे आणि त्या पदावर असलेल्या व्यक्तीला आपल्या राजकीय स्वार्थापायी 'मौत का सौदागर' आणि 'खून की दलाली' म्हणणे म्हणजे अपमान नसतो असे राहुल गांधी यांना वाटते का ? सलग दोन निवडणूक प्रचारात गुजरात दंगलीचा मुद्दा मोठा करून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा प्रकार जेव्हा काँग्रेस करत होती, तेव्हा त्याला राहुल गांधी आणि त्यांच्या दावणीला बांधलेले नेते अपमान ऐवजी रणनीती म्हणणे जास्त योग्य समजत होते. शिवाय गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळू नये म्हणून ज्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिले, तेव्हा पदाच्या मानापमानाची तमा बाळगावीशी वाटली नाही, आणि त्याविरोधात तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी ब्र उच्चारणे देखील योग्य समजले नव्हते. कदाचित ते सोयीचे असल्यामुळे त्यांनी त्यावर मौन बाळगले असेल. त्यामुळे अशी व्यक्ती मानापमानाच्या बाता जेव्हा मारतो तेव्हा तो प्रकार खूप हास्यास्पद वाटतो.
थोडक्यात काय तर राहुल गांधी हे राजकीय दृष्ट्या परिपक्व होत आहेत, असे वाटत असले तरी ते आणि त्यांचे घराणे गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य नेत्यांची सतत पायमल्ली करत आला आहे हा इतिहास आहे. त्यामुळेच तर ग्यानी झेलसिंग सारख्या भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीला राष्ट्रपतीपदापेक्षा गांधी घराण्याची सेवा करणे श्रेयस्कर वाटले होते आणि मनमोहनसिंग यांना अध्यादेश मागे घेणे अधिक सोयीचे वाटले. त्यावेळी सत्तेत असतानाचा जो माज होता तो आता हळूहळू उतरू लागल्यामुळे अचानक पंतप्रधानपदाचा मान राखण्याचे वगैरे ज्ञान होते आहे हे न ओळखण्याइतकी जनता आता दूधखुळी राहिलेली नाही.
महाभारतात कर्ण आणि कृष्णाचा कुरुक्षेत्राच्या मैदानावर झालेला संवाद सर्वविदित आहे. रथाचे चाक चिखलात अडकून पडलेला कर्ण कृष्णाला धर्माची आठवण करून देतो. त्यावेळी कृष्ण त्याला त्याच्याच पूर्वायुष्यातील कर्माची आठवण करून विचारतो ''तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म राधासुता?''. त्यामुळे हाच प्रश्न जनता आता राहूल गांधी यांना विचारणार आहे की राहूलजी तेव्हा कुठे गेला होता पंतप्रधानपदाचा मान?
- हर्षल कंसारा