‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाही – परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

    30-Jul-2025   
Total Views | 9

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून २०२५ दरम्यान कोणताही संवाद झालेला नाही, हे विरोधकांनी आपले कान उघडे ठेवून ऐकावे; असा घणाघात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत केला आहे.

'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेत राज्यसभेत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या युद्धबंदीच्या दाव्यांवर सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आणि गोंधळ निर्माण झाला. यावर जयशंकर यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगितले की, विरोधी पक्षांनी आपले कान उघडे ठेवून ऐकावे. २२ एप्रिल ते १६ जून या काळात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात एकही फोनवर चर्चा झाली नाही. पाकिस्तानच्या डीजीएमओने युद्धबंदीची विनंती केली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशनला स्थगिती दिली, असे परराष्ट्रमंत्र्य़ांनी स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झाले तेव्हा अनेक देशांना परिस्थिती किती गंभीर आहे आणि ही परिस्थिती किती काळ चालू राहील हे जाणून घ्यायचे होते, परंतु आम्ही सर्वांना एकच संदेश दिला की आम्ही कोणत्याही मध्यस्थीसाठी तयार नाही. आमच्या आणि पाकिस्तानमधील कोणताही करार फक्त द्विपक्षीय असेल. आम्ही पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहोत आणि देत राहू. जर ही लढाई थांबवायची असेल तर पाकिस्तानला ती विनंती करावी लागेल आणि ही विनंती फक्त डीजीएमओमार्फतच येऊ शकते, असे भारताने स्पष्ट केल्याचेही परराष्ट्र मंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसला फटकारले आणि सिंधू पाणी करार, मुंबई दहशतवादी हल्ला आणि चीन-पाकिस्तान संबंधांवरून विरोधी पक्षावर टीका केली. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 'सिंधू पाणी करार हा अनेक प्रकारे एक अद्वितीय करार आहे. जगात असा कोणताही करार मला माहित नाही जिथे एखाद्या देशाने आपल्या प्रमुख नदीचे पाणी दुसऱ्या देशात वाहू दिले आहे. यासाठी जयशंकर यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आणि आरोप केला की तत्कालीन सरकारने स्वतःच्या देशाच्या हिताकडे दुर्लक्ष करून शेजारी देशाचे हित जपले, असाही टोला त्यांनी लगावला.

भारताचे परराष्ट्र धोरण यशस्वीच

राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) अहवालाचा उल्लेख करत भारताच्या दहशतवादविरोधी राजनयिक कामगिरीची ठळक उदाहरणे मांडली. भारताच्या परराष्ट्र धोरणावर अपयशी झाल्याची टिका करणाऱ्यांनी अमेरिकेने टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणे, युएनएससीच्या निरिक्षण पथकाने टीआरएफ ही जागतिक दहशतवादी संघटना असणे मान्य करणे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला परराष्ट्र मंत्र्यांनी दिला.

‘चायना गुरु’ – जयराम रमेश यांना टोला

राज्यसभेत चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यावर उपरोधिक हल्ला चढवताना त्यांना ‘चायना गुरु’ असे संबोधले. आज काही लोक चीनबाबत खूप मोठे ज्ञान वाटू लागले आहेत. काही जण तर म्हणतात की मला चीनबाबत फार माहिती नाही,असे सांगून जयशंकर म्हणाले, "आपण केवळ ४१ वर्षे परराष्ट्र सेवेत काम केले आहे आणि चीनमध्ये सर्वाधिक काळ भारताचा राजदूत राहिलो आहे. पण आता 'चायना गुरु' आले आहेत. एक सदस्य तर असे आहेत की ज्यांचे चीनप्रेम इतके जास्त आहे की त्यांनी 'चिंडिया' हा शब्दच तयार केला," असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा घेतला आणि सत्तापक्षाच्या बाकांवर हास्याची लाट उसळली.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121